| |

मधाचा असा वापर कराल तर मुरुमांची समस्या होईल कायमची दूर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपला चेहरा इतरांपेक्षा उजळ आणि सुंदर असावा असे कुणाला वाटत नाही सांगा बरं. मुळात चांगलं दिसण्याची इच्छा वाईट नसतेच. उलट चांगलं आणि इतरांपेक्षा हटके दिसणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबत महिला विशेष सतर्क असतात. त्या नेहमीच आपले सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक पद्धतीने उपाय करत असतात. पण असं असूनही चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या काही केल्या जात नाही. खरतर ही समस्या तेलकट त्वचा असल्यामुळे सहन करावी लागते. पण असे नाही कि कोरडी त्वचा आहे म्हणून हि समस्या उदभवतच नाही. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणे आणि व्यवस्थित चेहरा स्वच्छ न करणे यामुळे चेहऱ्यावरील सूक्ष्म जागांमध्ये बॅक्टेरिया जमा होतो आणि मुरुमांची समस्या उफाळते. हि समस्या काही केल्या पिच्छा सोडत नाही अशीच असते.

पण मैत्रिणींनो आता काळजी करण्यापेक्षा आणि बाजारातील अतिशय महागडी सौंदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक तसेच घरगुती उपायांचा अवलंब करा. आज असाच एक जालीम उपाय घेऊन आम्ही आलो आहोत. मुख्य म्हणजे हा उपाय तुमच्या परिचयातील आहे आणि अगदी नैसर्गिक आहे. त्यामुळे त्वचेची हानी होत नाही. हा उपाय म्हणजे मध. होय. त्वचेच्या कोणत्याही समस्यांवर मध हा अत्यंत उत्तम आणि प्रभावी उपाय आहे. कारण, मधामध्ये मॉईस्चराईजिंग घटक असतात. शिवाय हे अँटिबॅक्टेरियल आहेत. त्यामुळे मधाचा वापर करून त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवता येतो. फक्त त्याचा वापर कसा आणि कश्यासोबत करायचा इतके माहित असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

१) मध आणि हळद पावडर – मध आणि हळद पावडर हे दोन्ही पदार्थ चेहऱ्यावरील मुरूमं काढून चेहरा उजळ करण्यास मदत करते. यातील हळद अँटिसेप्टिक असून चेहऱ्यावरील मुरूमं नष्ट करण्यासाठी मधाची मदत करते यामुळे चेहऱ्यावरील मुरूम तर जातातच शिवाय त्याचे डागसुद्धा रहात नाही.
० साहित्य – चिमूटभर हळद, २ थेंब मध

० कृती – हातावर चिमूटभर हळद पावडर घ्या आणि त्यात २ थेंब मध मिसळा. आता हे मिश्रण हलक्या हाताने मुरूमं आलेल्या ठिकाणी लावा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही प्रक्रिया नियमित करा आणि अगदी काहीच दिवसात परिणाम मिळवा.

० फायदा – मधासह हळद चेहऱ्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे मुरूमांची समस्या त्वरीत बरी होते. कारण हळदीतील अँटिसेप्टिक गूण मुरूमांना नष्ट करण्यास सक्षम असतात. तसेच हळदीमुळे मुरूमांनी तयार होणारे चेहऱ्यावरील काळे डागही जातात.

२) मध आणि बेसन – मध आणि बेसन यांचे एकत्रित येणे चेहऱ्यावरील मुरूमं घालवण्यासाठी अतिशय प्रभावी औषध मानले जाते. बेसनमुळे चेहऱ्याला विशेष चमक येते तर मधातील गुणधर्म चेहऱ्यावरील डाग घालवतात.
० साहित्य – १ लहान चमचा बेसन, १/२ चमचा मध, १/२ चमचा गुलाबपाणी

० कृती – एका वाटीत बेसन, मध आणि गुलाबपाणी व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण मुरूमं आलेल्या ठिकाणी लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मुख्य म्हणजे चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील तर हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा चोळू नका. यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते. त्यामुळे मुरूमांचे डाग असतील तर तुम्ही हे मिश्रण लावा आणि हलक्या हाताने चेहऱ्याला अलगद मसाज करा.

० फायदा – बेसन त्वचेवरील मुरूमांची वाढ रोखते. शिवाय स्किन पोअर्स खुले करून त्वचेला आतून शुद्ध करते. इतकेच नव्हे तर डेड स्किन काढून टाकण्यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे. तर, मधामुळे त्वचा अधिक मऊ आणि तितकीच तेजस्वी होते. याशिवाय त्वचेची पीएच लेव्हल संतुलित राखण्यासही मध मदत करते. यामुळे मुरूमांच्या समस्येमुळे चेहऱ्याला आलेली सूज कमी करण्यास मदत होते.

३) कोरफड जेल आणि मध – कोरफड जेल आणि मध या दोन्ही पदार्थांमुळे त्वचेला नैसर्गिक चमक आणि तजेलदारपणा येतो. तसंच चेहऱ्यावरील डाग निघून जातात.
० साहित्य – १ लहान चमचा कोरफड जेल, २-३ थेंब मध

० कृती – एका वाटीत ताजी कोरफड घ्या आणि त्यात मधाचे थेंब मिसळून मुरूमांवर लावा. पुढे साधारण २ मिनिट हलके मसाज करा आणि १५ मिनिटे असेच सुकल्यानंतर चेहरा धुवा. हा प्रयोग नियमित दिवसातून दोनदा करा आणि लवकर परिणाम मिळवा.

० फायदा – मधातील नैसर्गिक घटक त्वचा अधिक मुलायम करण्यास मदत करतात. तर कोरफडमध्ये असणारे अँटीअॅक्ने घटक त्वचेतील बॅक्टेरियाचा नाश करतात. त्यामुळे मुरूम निघून जातात आणि परत येत नाही.

० अत्यंत महत्वाचे – मुरूम अधिक असतील तर मधाचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करून घ्या. थेट हे उपाय वापरू नका. याआधी त्वचेसंबंधित कोणती ऍलर्जी तर नाही ना हे तपासून घ्या.