| |

चालाल तर वाचाल; जाणून घ्या चालण्याचे फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांना चालायचा अतिशय कंटाळा आहे. टीचभर बाहेर जायचं असलं तरीही या लोकांना गाडी घोडे लागतात. पण यामुळे शरीराची हालचाल कमी होते आणि परिणामी पायांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य चाला. मुख्य बाब अशी की, यासाठी कोणतीही विशेष वेळ ठरवण्याची गरजच नाही. असे कुठेही लिहिलेले नाही की सकाळीच चालणे गरजेचे आहे किंवा असा कोणता नियम देखील नाही. नियमित चालण्यासाठी ठराविक वेळेपेक्षा निश्चय महत्वाचा आहे. कारण, हार्ट अँटॅक आणि ब्लड प्रेशरसारख्या आजारांपासून आपले शरीर जपायचे असेल तर नियमित चालायलाच हवे.

० हे योग्य आहे की, सकाळीच चालावे असा कोणताही नियम नाही. परंतु सकाळी चालल्याने हवामानातील शीतलता आणि सकाळच्या वेळी झाडांच्या माध्यमातून मिळणारा शुद्ध ऑक्सिजन हा आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतो.

० कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे जर आपण बाहेर चालण्यासाठी जाऊ शकत नसाल तर घरीच ट्रेडमील आणा आणि त्यावर चाला किंवा घरातल्या घरात, रूममध्ये दररोज ३० मिनिटे अर्थात अर्धा तास साधारण ३ ते ४ किलोमिटर जलद गतीने चाला.

० नियमित चालल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीत राहते. हे कोरोनरी आर्टरीज मधून आपल्या हृदयाला ऑक्सिजन पोहोचवते. शिवाय रक्ताभिसरण सुरळीत होत असल्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालू राहते.

० ब्लड प्रेशर, शुगर आणि कोलेस्ट्रॉलमुळे येणारा हार्ट अटॅक दररोज चालण्यामुळे रोखता येऊ शकतो. कारण दररोज चालल्याने शारिरीक ऊर्जा कायम राहते. तसेच रक्ताभिसरण आणि शारीरिक आंतरक्रिया व्यवस्थित सुरू राहतात.

० दररोज चालल्यामुळे शरीरात ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. परिणामी रोगप्रतिकार शक्ती देखील सुरक्षित राहते आणि आपल्या शरीरावर रोगांचा मारा होत नाही.