| | | |

चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? तर मग या गोष्टी जरूर खा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर दिसण्यावर प्रत्येकाचा हक्क असतो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. पण रोजच्या धावपळीमुळे आणि उलट सूलट आहारामुळे सुंदर दिसण्याचे स्वप्न कधी भंगते ते सूतभरही कळत नाही. अशा परिस्थितीत आपला आहार संतुलित ठेवणे आणि आहारात शक्य तितका त्वचेसाठी पूरक असणारा बदल करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेची आंतरिक काळजी घेणे सोपे होईल. यासाठी त्वचा तज्ञ सांगतात कि, त्वचेची बाहेरून जितकी काळजी घेता तितकीच काळजी आतूनही घेतली पाहिजे. तरच त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल. कारण त्वचेसाठी जे पोषण गरजेचे आहे ते आहारामुळेच शक्य आहे. म्हणून त्वचा आतून-बाहेरून चमकण्यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळेल आणि त्वचा बाहेरून नैसर्गिकरित्या ग्लो करेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) ताज्या हिरव्या भाज्या – हिरव्या भाज्या आपल्या शरीराच्या आणि अगदी त्वचेच्याही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. आपल्या त्वचेला योग्य पोषण मिळावे यासाठी आपल्या दैनंदिन आहारात मेथी, पालक, चाकवत, तांदळी, दुधी भोपळा इत्यादीं भाज्यांचा प्रामुख्याने समावेश करा. कारण या भाज्यांमध्ये अँटि ऑक्सिडंट्स, लोह आणि ए आणि सी सारखी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे अश्या भाज्यांचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. परिणामी चेहऱ्यावरील मुरुमे, पुरळ हि समस्या दूर होऊन चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो.

२) हर्बल ग्रीन टी – हर्बल ग्रीन टी पिण्यामुळे शरीरात मुरुमांच्या हार्मोन्सचे उत्पादन कमी होते. शिवाय ग्रीन टी’च्या पिशव्या डोळ्याखालील काळे चट्टे कमी करण्यास मदत करतात. यासाठी ग्रीन टी’च्या पिशव्या ३० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि दिवसातून २वेळा २० मिनिटांपर्यंत डोळ्यावर ठेवा. अशाप्रकारे हर्बल ग्रीन टी चेहऱ्याला ग्लो देण्यासाठी मदत करते.

३) डाळिंब – डाळिंबाच्या दाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे डाळिंबाचे सेवन करणे शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यास सहाय्यक ठरतात. सोबतच शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते. तसेच डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास लवकर भरून येते.

४) टोमॅटो – टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे टोमॅटोला त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. टोमॅटोचा रस प्यायल्याने वा चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकतो. शिवाय पिंपल्स आणि चेहऱ्याची त्वचा निघणे या समस्यांवर टोमॅटो प्रभावीरीत्या कार्य करतो. तर टोमॅटोची साल चेहऱ्यावर फेसपॅक म्हणून वापरली जाते. कारण यामुळे अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.

५) ब्राऊन राईस – ब्राऊन राईस खाणे त्वचा निरोगी बनवण्यासाठी उत्तम आणि हेल्दी असा उपाय आहे. कारण ब्राऊन राईसमध्ये लिपिड्स रेणू असतात, ज्यामुळे त्वचेतील ओलावा कायम राहतो. शिवाय त्यामध्ये आढळणारे कॅरामाइड्स त्वचेला नवी ऊर्जा आणि नैसर्गिक चमक देतात.

६) मासे – त्वचेसाठी मासे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण माशांमध्ये ओमेगा – ३ मुबलक प्रमाणात असते. यामुळे फ्री रॅडिकल्स टाळायचे असतील आणि त्वचा चमकदार बनवायची असेल तर मासे खायला हवेत. इतकेच नव्हे तर केस काळे आणि दाट होण्यासदेखील मदत होते.