|

आपल्या मुलांचे केस कुरळ असतील तर अशी घ्या काळजी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केस सुंदर असतील तर सौंदर्याला जणू चार चांद लागतात. केसांचेदेखील विविध प्रकार असतात. जसे कि- सरळ केस, लांबसडक केस, दाट केस, विरळ केस आणि कुरळ केस. प्रत्येक केसाच्या प्रकारांची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यातील कुरळ केस अनेकांची विशेष पसंती आहे. पहा ना कित्येक तरुण मुली आणि स्त्रिया वेगवेगळ्या हेअर स्टायलर मशिन्सचा वापर करून आपल्या केसांना कुरळ करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सध्या कुरळ किंवा कर्ली अश्या केसांचा लुक जास्तच ट्रेंडमध्ये आहे. पण खरं सांगायचं तर विशेष करून कुरळ केसांचीच काळजी घेणे फार कठीण असते. त्यात जर लहान मुलांचे केस कुरळ असतील तर बापरे बाप!

एकतर लहान मुले दिवसभर ऊन आणि मातीत खेळतात. त्यामुळे त्यांच्या केसांत जमा होणार घाम आणि माती यामुळे केसांचे आरोग्य धोक्यात येते. परिणामी केस गळती आणि केसांच्या इतर समस्यांना उभारी येते. त्यामुळे लहान मुलांच्या केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात जर आपल्या मुलांचे केस कुरळ असतील, तर आणखीच काळजी घेणे आवश्यक आहे. कारण कुरळ केसांमध्ये लगेच गुंता होतो आणि केस खराबदेखील लवकर होतात. पण आता यासाठी चिंता करायची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्याय देणार आहोत ज्यांच्या वापराने तुम्ही आपल्या कुरळ केसांचे सौंदर्य राखू शकता.

१) केसांना नियमित तेल लावा – लहान मुलांच्या केसांना आठवड्यातून किमान दोनवेळा तरी साधे खोबरेल तेल लावा. कारण या तेलामुळे केसांना पोषण मिळते. शिवाय कुरळ केस असतील तर जास्त तेलाचा वापर करावा आणि एक दिवसाआड केसांची मालिश करावी. लहान मुलांच्या केसांसाठी बदामतेल, खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईलदेखील उपयुक्त ठरेल.

२) हातांची फणी करा – असे अनेकदा होत कि, लहान मुलं केस विंचरू देत नाहीत. त्यात जर केस कुरळ असतील तर नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच. कारण कुरळ केसात फणी घालताच त्यात झालेला गुंता आधी सोडवावा लागतो. मग गुंता सोडवायला घेतला का मग मुलं आरडाओरड करून इकडे तिकडे पळू लागतात. यामुळे लहान मुलांचे कुरळ केस विंचरण्यासाठी हाताच्या बोटांचा वापर करा. मुलांच्या हातांची फणी फार आवडते.

३) केस बांधण्यासाठी जबरदस्ती नको – कुरळ केस असणाऱ्या लहान मुलं शक्य तो केस बांधून ठेवण्यासाठी जबरदस्ती करू नका. कारण जबरदस्ती केस बांधताना वेदना होण्याची शक्यता असते. ज्यामुळे केसांत जखम होऊ शकते. त्यात कुरळ केसांची दाटी असेल तर जखम दिसून येणार नाही. त्यामुळे शक्य असल्यास हातांची फणी करीत घट्ट वेणी घालू शकता.

४) केस बांधताना रबरचा वापर टाळा – कुरळ केसांमध्ये लवकर गुंता होतो हे आपण जाणतोच. पण असे केस बांधण्यासाठी जर रबराचा वापर केला तर हे नुकसानदायी ठरते. यामुळे केस गळती तर होतेच. शिवाय रबर काढताना केस ओढले जातात आणि तुटतात.

५) सौम्य शॅम्पूने केस धुवा – कुरळ केस दिसायला जितके सुंदर तितके लवकर कोरडे होतात. त्यामुळे सौम्य शॅम्पूचा वापर करून केस धुवावेत. यामुळे केस कोरडे न होता मऊ होतील आणि सुंदर- सतेजदेखील दिसतील.

६) नैसर्गिक कंडिशनरचा वापर करा – लहान मुलांच्या केसांसाठी बाजारात मिळणारे कंडिशनर वापरू नका. यामुळे केसांचे नुकसान होते. त्याचबरोबर लहान मुलांसाठी नैसर्गिक गोष्टी अधिक फायदेशीर आणि सुरक्षित असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुलांचे केस कंडिश करण्यासाठी दह्याचा वापर करा. यामुळे लहान मुलांचे केस मऊ होतील आणि विंचरणे सोपे होईल.