| |

हाई हिल्स वापरत असाल तर ‘या’ समस्यांना सामोरे जायला तयार राहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा पहिले असाल कि कुणाची तरी उंची लहान म्हणून त्यांना वेगवेगळ्या नावाने चिडवले जाते. परिणामी न्यूनगंडाची भावना इतकी मोठी होते कि यावर तोडगा म्हणून व्यक्ती उपाय शोधू लागतो आणि यातील सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे हाई हिल्स अर्थात उंच टाचेच्या चप्पल . हो. कारण यात कोणतेही औषध न घेता उंच दिसता येत. तात्पुरते का होईना आपण थोडे उंच झालो असे वाटू लागते. तसे पाहता आजकाल सर्वच स्त्रियांना हाई हिल सँडल्स घालणे फार आवडते.

यामागे विशेष कारण म्हणजे व्यक्तिमत्वाची विशेष छाप पाडणे. पण व्यक्तिमत्व आणि आवड सांभाळताना आपण आरोग्याचा विचार करायला विसरताय का? यावर विचार करणं गरजेचं आहे. असे म्हणण्यामागील कारण म्हणजे उंच टाचांच्या चप्पल दैनंदिन जीवनात वापरणे कुठे ना कुठे नुकसानदायी आहे. आता यामुळे नक्की काय होऊ शकत हे जाणून घ्यायचं असेल तर यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचायला हवा. चला तर जाणून घेऊयात उंच टाचांच्या चप्पल वापरल्यामुळे होणारे आरोग्याचे नुकसान खालीलप्रमाणे:-

१) पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येणे – दररोज उंच टाचांच्या सॅंडल वापरल्यामुळे पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याची समस्या होऊ शकते. याचे कारण म्हणजे, आधीच आपल्या संपूर्ण शरीराचा भर आपल्या पायांवर असतो. मात्र टाचेच्या चप्पल घातल्यामुळे आपण तोल सावरताना पायाच्या खालील भागांवर लक्ष केंद्रित करतो. अश्यावेळी जपून चालताना शरीराचा भार पायाच्या मध्यावर येतो. परिणामी पायाच्या पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याची समस्या उदभवते.

२) पायांचे स्नायू दुखावणे – टोकदार टाचांच्या चप्पलमुळे पायांच्या स्नायूंवर विशेष ताण येतो. परिणामी पाय दुखणं सुरु होतं. तसेच टोकदार टाचांमुळे पायांच्या नसा दुखायला सुरुवात होते. परिणामी पुढे पायाच्या नसा ताणल्या गेल्यामुळे असह्य वेदना जाणवतात.

३) पायांच्या बोटांचे नुकसान – जेव्हा तुम्ही उंच टाचांच्या चप्पल वापरता तेव्हा साहजिकच पायांच्या बोटांवर उंच टाचांचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. शिवाय उंच टाचांच्या चपलांना समोरुन वेगवेगळे आकार असल्याने पायाची बोटे आकसतात आणि काही कालावधीनंतर ती दुखण्यास सुरूवात होते.

४) रक्तवाहिन्यांचे आकुंचन – उंच टाचांच्या चप्पल घातल्याने पाय आकर्षक दिसतात. मात्र शरीराचे वजन पायांवर असताना तोल सांभाळण्याच्या नादात पायाच्या नसांवर तीव्र ताण पडतो. यामुळे पायातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्त पुरवठाही कमी होण्याची शक्यता असते.

५) पायाच्या टाचांना दुखापत – पायांच्या टाचांना ताण देऊन अधिक वेळ चालल्याने टाचांना दुखापत होते. याचे कारण म्हणजे चालताना टाचांवर ताण येतो. मात्र उंच टाचांच्या चप्पल घातल्यामुळे चप्पलच्या टाचेमुळे पायाची टाच अधिक दुखावते. यामुळे टाचांमध्ये तीव्र वेदना होतात. शिवाय कंबरेपासून टाचांपर्यंत दुखणं चालू होतं.

६) कंबरदुखी – उंच टाचांच्या चप्पलचा प्रभाव थेट आपल्या कंबरेवर होतो. तसेच उंच टाचांच्या चप्पल पायाला पूर्ण आधार देत नाहीत. यामुळे शरीराचा संपूर्ण तोल कंबरेला सांभाळावा लागतो. परिणामी कंबरदुखीला सुरूवात होते.

७) अपघाताची शक्यता – टोकदार टाचांच्या चप्पल घालून चालताना एखादा दगड पायाखाली आल्यास तोल जाऊन तुम्ही पडण्याची शक्यता असते. यामुळे गंभीर दुखापत वा मुका मर लागू शकतो. याशिवाय खूप वेळ टाचेची चप्पल घालून चालण्यामुळे पाय व कंबर दुखू लागतात. यामुळे पायात किंवा कंबरेत लचक जाऊ शकते.