| |

संगीताची असेल साथ तर आजारांवर कराल मात; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एखादी व्यक्ती मानसिक ताण सहन न झाल्यामुळे नैराश्य अर्थात डिप्रेशन या भावनेच्या आहारी जाते. अनेक सुशिक्षित आणि प्रसिद्ध व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊन टोकाची पाऊले उचलल्याचे आपण अनेकदा बातम्यांमध्ये पाहतो. याचे कारण असे कि, एकदा का एखादी व्यक्ती नैराश्याच्या आहारी गेली की त्याला त्यातून बाहेर काढणे जणू अशक्यच होते. त्यामुळे नेहमी मन प्रसन्न ठेवण्यासाठी तसेच ताणतणावापासून अंतर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. मित्रांनो अगदी छोट्या छोट्या गोष्टी करून हा ताणतणाव कमी करता येतो. यांपैकी एक उत्तम उपाय म्हणजे संगीत. होय. कारण संगीतामध्ये आपल्या आरोग्याशी संबंधित अनेको आजारांवर मात करीत शारीरिक स्वास्थ्यात अफलातून बदल करण्याचे सामर्थ्य आहे. विशेष म्हणजे, संगीत ऐकण्यामुळे शरीरात एका विशिष्ट प्रकारची कंपने निर्माण होतात जी चांगले हॉर्मोन्स निर्माण करण्यासाठी मदत करतात. शिवाय ताणातून निर्माण होणारे स्ट्रेस हॉर्मोन्स दूर ठेवण्यासाठी हे हार्मोन्स विशिष्ट पद्धतीने कार्यरत असतात. अनेकदा आपण आपली आवडती गाणी ऐकत असलो कि मन शांत होते आणि झोप येते. कारण गाणी ऐकल्यामुळे मानसिक समस्यांवर एखादी थेरपी जशी काम करते तसेच संगीत काम करते. चला तर जाणून घेऊयात संगीताचे अद्भुत लाभ खालीलप्रमाणे:-

१) नैराश्यावर मात करता येते – नैराश्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. मात्र शांत संगीत ऐकल्यास डिप्रेशनमधून बाहेर पडण्यास लाभ होतो. कारण यामुळे मन शांत आणि विचारांचे प्रलय थांबते. त्यामुळे रिकाम्या वेळी म्युजिक ऐकणं हे थेरेपीप्रमाणे प्रभावी ठरते.

२) शांत निद्रा मिळते – काळजी, चिंता, कामाचा ताण यांमुळे झोपेचा सत्यानाश होतो. यामुळे निद्रानाशाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. अशावेळी झोपेसाठी औषधांची सवय लावून घेण्यापेक्षा शांत संगीत ऐकण्याची सवय लावावी. कारण संगीतामुळे मन आणि डोकं शांत होते. परिणामी गाढ झोप येते. मात्र लक्षात ठेवा यासाठी नेहमी मंद संगीत ऐकावे. कारण तीव्र संगीतामुळे झोप येत नाही व डोकेदुखीचा त्रास संभवतो.

३) रक्तदाबावर नियंत्रण राहते – रक्तदाबामुळे ह्रदयावर ताण येतो. परिणामी हृदयसंबंधित समस्यांना उभारी येते. त्यामुळे ज्यांना रक्तदाबासंबंधित समस्या जाणवतात त्यांनी नियमित संगीत ऐकावे ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय मनही शांत होते. संगीतामुळे हार्ट स्ट्रोकसारख्या शारीरिक समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

४) मन आनंदी आणि उत्साही राहते – आवडती गाणी ऐकण्यामुळे आपल्या मनाला आनंद आणि उत्साह प्राप्त होतो. कारण गाण्यामध्ये स्ट्रेस लेव्हल कमी करण्याचे सामर्थ्य आहे. परिणामी दिवसभर उत्साही राहण्यासाठी संगीत ऐकण्याचा फायदा होतो.

५) शारीरक व मानसिक थकवा कमी करण्यासाठी लाभदायक – एखाद्याचा मानसिक त्रास वा मानसिक त्रासातून निर्माण झालेलं शारीरिक दुखणं, वेदना संगीतामुळे कमी होतात. कारण संगीतात गुंतल्यामुळे काही काळ सर्व वेदनांचा विसर पडतो. यामुळे मानसिक त्रासातून बाहेर काढण्यासाठी रूग्णाला म्युझिक थेरपी दिली जाते.