| | |

आयुर्वेदातही दह्याच्या ताकाचे विशेष महत्व आहे; का? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दह्यामध्ये अनेक गुणकारी घटक असतात. यामुळे दहयाचे सेवन करणे हे आरोग्यदायक असते. मात्र दही आणि पाणी एकत्र घुसळून तयार होणाऱ्या ताकाचे सेवन त्याहीपेक्षा लाभदायक आहे हे कोणाकोणाला माहीत आहे? ताक कसे बनवायचे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे पण त्याचे गुणधर्म मात्र फार कमी लोक जाणतात. शिवाय ताकाच्या या तत्वांचा उल्लेख आयुर्वेदातही केला आहे. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत ताकाचे प्रकार, गुणधर्म आणि फायदे. शिवाय ताक केव्हा प्यावे आणि केव्हा पिऊ नये याहीसंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मात्र त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल.

अ) ताकाचे प्रकार :- मुळात ताकाचे प्रकार हे दहयाच्या आंबटगोड चवीवर अवलंबून असते. यामुळे ताकाचे गोड ताक, आंबट ताक आणि खूप आंबट ताक असे प्रकार आहेत. शिवाय सायीला विरजण लावून केलेल्या ताकाचेही अन्य काही प्रकार आहेत. सामान्यपणे बोलीभाषेत आपण सर्व प्रकारच्या ताकाला “ताक” हाच शब्द वापरतो:
– केवळ दही घुसळून पाणी न मिसळता तयार केलेल्या टाकला ‘घोल’ म्हणून ओळखले जाते.
– दहयाच्या साधारण एक चतुर्थांश अर्थात पाव प्रमाणात पाणी त्यात मिसळून ताक केल्यास त्याला ‘तक्र’ असे संबोधले जाते.
– तसेच दहयाच्या अर्ध्या प्रमाणात पाणी मिसळून ताक घुसळले असता त्यास ‘उदश्वीत’ म्हणतात
– लोणी काढून झाल्यावर खाली उरणाऱ्या ताकास ‘मथीत’ असे म्हणतात.

ब) ताकाचे गुणधर्म :-
– आयुर्वेदात ताकाचे अनेक गुणधर्म विविध स्वरूपात सांगण्यात आले आहेत. ताकात मधुर रस, आम्लता, पाचक रस याशिवाय शरीराची पचनक्रिया स्वच्छ आणि सुरळीत ठेवणारी विशेष तत्वे असतात.
– जेवण झाल्यानंतर हलके काळे मीठ घातलेले एक ग्लास ताक पिण्याने खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते.
– लोणी काढल्यावर खाली राहणारे ताक हे अत्यंत गुणकारी, पाचक रस वाढवणारे आणि पथ्यनियम पालनात बसणारे आहे.
– लोणी न काढता दही घुसळून तयार केलेले ताक हे पौष्टिक परंतु पचण्यास जड आणि कफकारक असते.

क) ताक पिण्याचे फायदे :-

१) कफ दोष – कफाच्या समस्येवर ताक अत्यंत गुणकारी आहे. याकरिता त्यात सुंठ, काळी मिरी आणि पिप्पली घालून सेवन करणे आवश्यक आहे.

२) पित्त दोष – गोड ताक हे पित्तशामक असते. यासाठी गोड ताकात साखर घालून प्यावे.

३) वात दोष – अधमुरे ताक सुंठ व सैंधव घालून प्यायल्याने वाताच्या समस्यांवर आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करता येते.

४) बद्धकोष्ठता – ताकामध्ये पचनसंस्थेच्या प्रक्रिया सुरळीत करण्याचे विशेष गुणधर्म समाविष्ट असतात. यामुळे नियमित ताक प्यायल्याने पचन शक्ती सुधारते व बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

५) मूळव्याध – मूळव्याध होण्याचे प्रमुख कारण बद्धकोष्ठता आहे आणि त्यास आपल्या शरीराची कमकुवत पचनसंस्था कारणीभूत असते. याकरिता नियमित ताक पिण्याने पचन शक्तित सुधार होतो आणि पर्यायाने मूळव्याध बारा होतो. याविषयी आयुर्वेदात लिहून ठेवलेले आहे.

६) पंडूरोग – पंडूरोग म्हणजेच ऍनिमिया. या आजारामध्ये ताक पिण्याचा खूप फायदा होतो. मात्र हा एक गंभीर आजार आहे, त्यामुळे घरगुती उपायांपेक्षा वेळीच तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

७) लघवी करताना जळजळणे, वेदना होणे – लघवी करताना वेदना होत असतील किंवा जळजळ होत असेल तर यासाठी ताजे ताक नियमित पिणे लाभदायक असते. याशिवाय लघवी सुरळीतपणे उत्सर्जित होत नसेल तर ताजे आणि पातळ ताक प्यावे याचा फायदा होतो.

८) जुलाब/ मुरडा/ अपचन – याकरिता ताकामध्ये हिंग, जिऱ्याची पूड आणि सैंधव घालून सेवन केले असता त्वरित आराम मिळतो.

ड) ताक केव्हा प्यावे?
– दुपारचे जेवण झाल्यानंतर प्यायलेले ताक हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आणि गुणकारी मानले जाते. शिवाय सकाळच्या न्याहारीवेळी घेतलेले ताक देखील प्रकृतीस उत्तम असल्याचे तज्ञ सांगतात.

इ) ताक केव्हा पिऊ नये?
– सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या दिवसात ताक पिण्याचे प्रमाण कमी असावे किंवा टाळावे. यामुळे कफ आणि सर्दी यांसारख्या समस्या बळावतात. तसेच ताक प्यायचेच असेल तर अति आंबट झालेले ताक पिणे टाळावे.