| |

हिवाळ्याच्या दिवसात कोणती फळे खावी?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता पावसाळा सरला आहे त्यामुळे आता हिवाळ्याच्या ऋतूचे वेध लागले आहेत. या दिवसात दिवस देखील लहान होतो. तसेच हिवाळ्याच्या दिवसात आपण खाल्लेले अन्न पचविण्यास बराच वेळ अधिक लागतो. कारण थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान कमी असते. यामुळे शरीराला ऊर्जेची जेव्हा जेव्हा गरज भासते तेव्हा साहजिकच भूक लागल्यासारखे वाटते. यामुळे कमी वेळात अधिक पदार्थांचे सेवन केले जाते. परिणामी खाल्लेल्या अन्नाचा पोटाला भार होतो. याशिवाय थंडीच्या दिवसात आपली रोग प्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत झाल्याचे आढळते. यामुळे अश्या पदार्थांचे सेवन करा ज्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत राहील आणि आपल्या शरीराचे संसर्गांपासून रक्षण होईल. यासाठी प्रामुख्याने दैवानंदीं आहारात फळांचा समावेश जरूर करा. पण कोणती फळे खावी असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

० थंडीच्या दिवसात कोणती फळे खावी?
– थंडीच्या दिवसात आपल्या शरीराच्या आंतरक्रिया व्यवस्थित सुरु राहाव्या याकरिता सकस आहार आवश्यक आहे. यात फळांचा समावेश उपयुक्त ठरतो. म्हणूनच या दिवसात कोणती फळे खावी हे आपण जाणून घेणार आहोत खालीलप्रमाणे:-

१) सफरचंद – सफरचंद हिवाळ्याच्या दिवसात खाणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. अशा स्थितीत बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. यावर आधीच उपाय म्हणून सफरचंद खाणे फायद्याचे ठरते. कारण, सफरचंदांमध्ये पेक्टिनचे प्रमाण जास्त असते. जे बद्धकोष्ठता आणि अतिसार दोन्हीपासून मुक्त होण्यासाठी मदत करते.

२) संत्र – हिवाळ्याच्या दिवसात संत्र बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारे फळ आहे. शिवाय हे फळ आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. याचे कारण म्हणजे संत्र हे सर्व आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. जसे कि, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात आजारी पडायचे नसेल तर संत्र जरूर खा.

३) सिताफळ – सिताफळ हे फळ अत्यंत चविष्ट असून व्हिटॅमिन सीचा एक उच्च स्त्रोत आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात आहारात सिताफळ असेल याची काळजी घ्या. तसेच सीताफळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसह व्हिटॅमिन-बी6 सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. यामुळे हे फळ शरीराच्या दृष्टीने उत्तम व आरोग्यदायी आहे.

४) अंजीर – अंजीर पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. जो शरीराला रक्तदाब राखण्यासाठी आवश्यक असलेले खनिज पुरवठा करतो. शरीराला गरमी मिळावी म्हणून हिवाळ्याच्या दिवसात गरम, वाफेदार, तिखट व तेलकट पदार्थ जास्त खाल्ले जातात. शिवाय त्यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटॅशियम समृध्द आहार घेणे आवश्यक आहे.

५) डाळिंब – हिवाळ्यामध्ये डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण डाळिंब खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वेगाने वाढण्यास मदत होते. यामुळे या हिवाळ्यात दररोज किमान एकतरी डाळिंब खा.