Dates Laddoo
| |

थंडीच्या दिवसात खजुराचे लाडू घरगुती पद्धतीने बनवा आणि फस्त करा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खजूर खायला जितके गोड आरोग्यासाठी तितकेच फायदेशीर असतात. त्यात थंडीचे दिवस असतील तर शरीराच्या आरोग्यासाठी खजूर खाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण स्वभावाने खजूर उष्ण असतात. शिवाय खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. तसेच ऊर्जा, साखर, आणि फायबर यासाठी खजूर एक उत्तम स्रोत आहे. शिवाय शरीरात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त यांची मात्रा सुरळीत ठेवण्यासाठी खजूर मदत करतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात खजूर खाणे लाभदायी ठरते. यासाठी तुम्ही असेच खजूर खाऊ शकता. पण याचे अधिक फायदे मिळवण्यासाठी खजुराचे लाडू बनवून खा. शिवाय हे लाडू दिसायला इतके आकर्षक आणि चवीला इतके उत्तम असतात कि लहान मुलेदेखील आराम चवीने हे लाडू फस्त करतात. चला तर जाणून घेऊयात खजुराचे लाडू कसे बनवायचे ते खालीलप्रमाणे:-

० साहित्य:
२५ खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप)
१/२ कप बदाम, भरडसर वाटून
१/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून
१ टेस्पून तूप
१ टीस्पून खसखस

० कृती – सर्वात आधी खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे. आता हे नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवा. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधा. शक्यतो एक ते दोन घासात संपेल इतपतच लाडूचा आकार ठेवा म्हणजे लहान मुलं एका घासत खाऊ शकतील.

० टीप:
– लाडूमध्ये जास्त ड्राय फ्रुट्स वापरायचे असतील तर खजूराचे प्रमाणही वाढवा. नाहीतर लाडू बांधताना फुटतील.
– तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार घ्या.
– खजूराला ओलसरपणा असेल याची काळजी घ्या. नाहीतर खडखडीत खजुराचे लाडू चवीला चांगले लागत नाहीत.

० फायदे –
१) खजूर उष्ण असतात. त्यामुळे एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतो.
२) हृदय विकारांपासून संरक्षण होते.
३) खजुरातील कॅल्शियम हाडांमध्ये मजबुती आणते आणि स्नायूंचे रक्षण करते.
४) खजुराचे लाडू रक्तदाबाच्या समस्येवर अतिशय परिणामकारक आहेत.
५) स्नायूंची सूज वा शरीराच्या कोणत्याही भागावरील सूज कमी करायची असेल तर खजूर खाणे फायदेशीर आहे.
६) रोग प्रतिकार शक्ती वाढते.
७) मासिक पाळीच्या त्रासांवर खजुराचे लाडू खाणे अतिशय लाभदायी आहे. यामुळे यावेळी मासिकपाळीच्या त्रासापासून सुटका होते.