Sweet Potato Halwa
| | |

थंडीत रताळ्याचा हलवा शरीराला देतो हवीहवीशी ऊब; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन| उपवासाला हमखास खाल्ली जाणारी रताळी थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मिळतात याचे कारण म्हणजे थंडीमधे सारखं गोड खावंसं वाटतं. पण आता गोड खावं वाटल आणि खाल्ल तर शरीराचे नुकसान होणार नाही. याची खात्री कोण देणार? तर याची खात्री देतो रताळ्याचा हलवा. म्हणून हिवाळ्यात पौष्टिक आणि चविष्ट काही खायचं मन झालं तर रताळ्याचा हलवा जरूर खा. तो कसा बनवायचा हे माहीत नसेल तर काळजी नको. कारण आज आपण रताळ्याचा हलवा कसा बनवतात ते जाणून घेणार आहोत शिवाय त्याचे फायदेही जाणून घेऊ.

० रताळ्याचा हलवा बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
5 मध्यम आकाराची रताळी,
1 वाटी गूळ,
4 चमचे साजूक तूप,
3 ते 4 वेलच्यांची पूड,
1 चिमूटभर केशर,
10 ते 12 काजुंचे तुकडे
1 कप दूध वा साय.

० कृती –

रताळ्यांचा हलवा करताना सर्वात आधी रताळी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे रताळ्यांवरची माती निघून जाते. आता रताळी धुवून पुसून घ्या आणि कुकरमधे उकडायला ठेवा. 
उकडलेली रताळी थंड झाली की सोलून चांगली कुस्करुन घ्या. यानंतर कढईत साजूक तूपात काजू आणि केशर काड्या घाला. काजू थोडे लालसर परतले की त्यात कुस्करलेली रताळी घाला. 
कुस्करलेली रताळी परतताना एका बाजूला एका भांड्यात थोडं पाणी उकळायला ठेवा. हे पाणी उकळायला लागलं की त्यात गूळ   आणि वेलची पावडर घालून त्याचा पातळ पाक करुन घ्या. 
रताळ्यांचा रंग बदलायला लागला की त्यात १ कप गरम करुन ठेवलेलं दूध घाला वा साय घाला. ते रताळ्यात चांगलं मिसळून घ्या. यानंतर त्यात वेलची पूड आणि गुळाचा पाक घालून हलवून घ्या. थोडा वेळ गॅस मंद करुन कढईवर झाकण ठेवा. 
आता हलवा दाट होऊ लागला की त्यात थोडं साजूक तूप घालून पुन्हा चांगला परतून घ्या. नंतर यात आणखी आवडीचा सुका मेवा बारीक तुकडे करुन घाला. आता हा हलवा गरम गरम खा आणि मस्त चवीचा आस्वाद घ्या.

० फायदे –

१) रताळ गुणधर्माने उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात रताळ्यांचा हलवा शरीराला आवश्यक तितकी ऊर्जा आणि ऊब देतो.
२) रताळ्याच्या हलव्यातील गूळ, साजूक तूप आणि सुकामेव्यामुळे शरीराला मिळणाऱ्या पौष्टिक गुणधर्मांत दुप्पट वाढ होते.
३) रताळ्यांमधे ॲण्टिऑक्सिडण्टस भरपूर असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय यात प्रथिनेदेखील भरपूर असतात. त्यामुळे हिवाळ्यात रताळ्याचा हलवा खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते. रताळ्यात असलेलं क आणि ब जीवनसत्वं विविध आजारांपासून आपलं संरक्षण करतात.
४) रताळ्याचा हलवा आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण या हलव्यातून आपल्याला बीटा केरोटीन आणि एंथोसायनिन हे घटक मिळतात. हे दोन्ही घटक आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त घटक आहेत शिवाय रताळ्यांमधे असणारे अ जीवनसत्त्वं नजर सुधारण्यास मदत करतात.
५) रताळ्यांमध्ये असणारे फायबरचं प्रमाण हे खूप असते. ज्यामुळे रताळी खाल्ल्याने एकतर बराचवेळ पोट भरलेले राहते. शिवाय रताळ्याचा कोणताही पदार्थ म्हणजे अगदी हलवादेखील हा पचनास हलका असून तो पचन सुलभ होण्यास मदतच करतो. तसेच रताळ्यांमधील ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असल्यामुळे रताळ्याचा हलवा प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेची लेव्हल लगेच वाढत नाही.