| |

वाढते वायू प्रदूषण म्हणजे श्वसनक्रियेसाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाचा स्तर इतका वाढत चालला आहे कि सरकारला अक्षरशः प्रदूषणामुळे लॉक डाऊन लावण्याची गरज भासू लागली आहे. हा काही मजेचा भाग नाही तर चिंतेची बाब आहे. कारण दिवसेंदिवस सगळीकडेच वायू प्रदूषणात इतकी भर होत आहे कि याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे. फक्त मानवीच काय? अगदी प्राणी मात्रांमध्ये देखील प्रदूषणामुळे गंभीर प्रकारचे परिणाम दिसून येत आहे. वाढत्या वायू प्रदूषणाची कारणे अनेक आहेत. यामुळे दिवसागणिक प्रदूषणाची मात्रा वाढतेय आणि लोकांचे जीवनमान कमी होत आहे.

परिणामी श्वसनक्रियेसंबंधित त्रास असणाऱ्या रूग्णांची संख्यादेखील वाढत आहे. यात डोकेदुखी, अ‍ॅलर्जी, ताप, श्वास घेण्यास त्रास आणि सुका खोकला यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे वायु प्रदूषण थेट आपली फुफ्फुसे आणि हृदयाला वाईट प्रकारे प्रभावित करत असते. यामुळे अकाली वृद्धत्व आणि मृत्यूचा धोका वाढतो. चला तर जाणून घेऊयात वायु प्रदूषणामुळे होणार्‍या श्वसनक्रियेशी संबंधीत आजारांची प्रमुख लक्षणे –

१) फुफ्फुसांचे वय वाढणे – अगोदरचे श्वसनासंबंधित आजार असणाऱ्या व्यक्तीसाठी वायु प्रदुषण धोक्याचे कारण ठरते. कारण यामुळे फुफ्फुसांवर सूज येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी फुफ्फुसाचे वय वाढवण्याची प्रक्रिया जलद होते. फुफ्फुसाचे वय वाढल्याने जुन्या आजारांशी लढणे कठिण होते. शिवाय श्वास घेणे कठीण होते. तसेच आजारांची तीव्रता हि गंभीर होण्याची शक्यता असते.

२) फुफ्फुसाची कार्यक्षमतेत घट – प्रदुषण वाढल्याने आपली झोप प्रभावित होते. परिणामी फुफ्फुसांची कार्य क्षमता हळूहळू लोप पावते आणि खुप कमी होते. यामुळे सीओपीडी, फायब्रोसिस यांसारख्या गंभीर श्वसन समस्या होऊ शकतात.

३) अस्थमा – आजकाल लहान मुलांमध्ये अस्थमासारखी श्वसन संबंधित समस्या वाढत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वायू प्रदूषण. अगदी निरोगी व्यक्तींमध्येसुद्धा वायू प्रदुषणामुळे श्वास घेण्याचा त्रास आणि अस्थमा यांसारखी लक्षणे दिसून येतात.

४) ब्रोंकायटिस आणि सीओपीडीचा धोका – प्रदूषण सीओपीडी आणि ब्रोंकायटिस यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमुख कारण वायू प्रदूषण ठरते. यामुळे रूग्णाची स्थिती अचानक गंभीर होण्याची शक्यता असते.

० श्वसन समस्या असल्यास खालील गोष्टी करायला विसरू नका.

१) श्वसनाची समस्या असलेल्या लोकांनी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका.

२) औषधे सुरु असल्यास वेळेवर औषधे घ्या.

३) इन्हेलरचा सक्रिय प्रकारे वापर करा.

४) बाहेर पडताना मास्क घाला.

५) वायु प्रदूषणाचे प्रभाव कमी करण्यासाठी उपचारात्मक पावले उचला.