|

कोरोनाचा हाहाकार!!! लहान मुलांच्यात संक्रमण वाढले, ‘ही’ घ्या खबरदारी आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन । साल 2020 मध्ये फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी आपल्याकडे कोरोना व्हायरस तेव्हा असे म्हटले गेले  की कोरोना लहान मुलांसाठी फार धोकादायक नाही आणि विशेष म्हणजे त्या काळात जास्त मुलांना संसर्ग झाले नव्हता. परंतु कोरोनाच्या आताच्या या दुसर्‍या लाटेत (Second wave of covid-19) विषाणूचा नवा व्हेरिएंट B.1.1.7 आणि B.1.617 हा लहान मुलांसाठी अधिक धोकादायक होऊ लागला आहे आणि या दुसर्‍या लहरीमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

मुलांमधील या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

गतवर्षी लहान मुले एसिम्प्टोमॅटिक होती म्हणजेच, त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसली नाहीत. परंतु यावर्षी मोठ्या संख्येने लहान मुलांच्यात प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. कोरोना व्हायरसमध्ये बदल घडून झालेले नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास, त्याचप्रमाणे सुरू झालेले लसीकरण त्यामुळे वाढलेली बेफिकीर वृत्ती  ही कारणं या रुग्णसंख्येमागे असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि चिंताजनक बाब म्हणजे लहान मुलांच्या मुळे प्रौढ लोकांच्यात मात्र विषाणूचे संक्रमण वेगाने वाढू लागला आहे. आपल्याला ही पुढील लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करा. चाचणी करण्यास उशीर करू नका. उपचार लवकर सुरू करणे महत्वाचे आहे

 • ताप
 • सर्दी आणि खोकला
 • कोरडा खोकला
 • जुलाब
 • उलटी होणे
 • भूक न लागणे
 • जेवण नीट न जेवणे
 • थकवा जाणवणे
 • शरीरावर पुरळ उठणे
 • श्वास घेताना अडचण जाणवणे

MISC ठरतोय धोकादायक:

कोरोना विषाणूमुळे एक गंभीर आणि धोकादायक गुंतागुंत पहायला मिळत आहे, ज्याला मल्टिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रेन (MISC) म्हणतात. हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, त्वचा, पचनाशी संलग्न अवयव किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होण्याची समस्या असू शकते.

पालकांनी या गोष्टी ठेवा लक्षात

दुर्दैवाने कोविड संसर्ग झाल्याची खात्री झाल्यास आणि डॉक्टरांनी मुलास घरात एका बाजूला ठेवण्याचा सल्ला दिला तर मुलाला घरात इतर लोकांपासून दूर ठेवा. शक्य असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांकडून मुलासाठी स्वतंत्र बेडरुम आणि बाथरुमची व्यवस्था करा. संक्रमित मुलाची काळजी घेताना, पालकांनी डबल मास्क घालावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.

जर पालकांपैकी किंवा घरातील जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर ते मूल पॉझिटिव्ह असण्याची शक्यता दाट असते. कारण अगदी लहान मुलं आई-वडिलांच्या आजूबाजूलाच असतात. आपण मोठ्यांच्या टेस्टिंगवर भर देतो, कारण त्यांची तब्येत बिघडल्यास त्यांच्यावरच्या उपचारांमध्ये तसे बदल करावे लागू शकतात.लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर बहुतेक मुलांना वेगळ्या उपचारांची गरज भासत नाही. त्यामुळे त्यांच्या टेस्टिंगची गंभीर गरज नसते. पण अनेकदा पालक गोष्टी स्पष्ट व्हाव्यात म्हणून लक्षणं दिसत नसताना मुलांचीही टेस्ट करतात. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली, तरी मुलांना फार मोठी ट्रीटमेंट लागत नाही. पण असं मूल बाहेर जाऊन खेळलं, मित्रांच्या घरी गेलं, तर त्या मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका असतो. पण मुलांमध्ये लक्षणं दिसत असल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी.

मुलांना लक्षणं आढळल्यास घ्यायची खबरदारी

 • मुलांना ताप आला तर त्यांना घरीच ठेवा. ताप उतरल्यावर खेळायला पाठवू नका. हा ताप हवामान बदलामुळे आलेला असू शकतो, पण सोबतच कोरोना व्हायरसच्या संसर्गाचंही हे लक्षण असू शकतं. लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
 • मुलांमध्ये कोरोनासारखी लक्षणं वाटत असल्यास घराबाहेर पडू नका. अनेक डॉक्टर्सनी पुन्हा एकदा व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून कन्सलटिंग सुरू केलेलं आहे. कोरोनाची लक्षणं असताना मुलाला क्लिनिकमध्ये नेणं इतर मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलावलं, तरच क्लिनिकमध्ये जा.
 • लहान मुलांमध्ये ताप किंवा इतर लक्षणं दिसू लागल्यास, त्याची कागदावर व्यवस्थित चार्ट करून नोंद ठेवा. यामध्ये तारीख, वेळ, किती ताप होता, SPO2 (रक्तातील ऑक्सिजन पातळी), पल्स रेट या गोष्टींची दर 7-8 तासांनी अशी दिवसातून साधारण तीन वेळा (सकाळी – दुपारी – रात्री) अशा प्रकारे नोंदी ठेवा.
 • लहान मुलं हात हलवत असल्यास पल्स ऑक्सिमीटर योग्यरीतीने बोटावर बसलाय का, ते तपासून पहा. SPO2 वरील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी दाखवत असल्यास तातडीने तुमच्या फॅमिली डॉक्टरना / बालरोग तज्ज्ञांना संपर्क करा.
 • लहान मूल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एका खोलीत थांबवून ठेवणं कठीण असतं. अशा घरात आजी-आजोबा असतील तर त्यांनाही हा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशा वेळी या कालावधीसाठी आजी-आजोबांचा वावर एका खोलीपुरता सीमित करावा, त्यांना एका खोलीत क्वारंटाईन करावं, आणि मुलाला घरात वावरू द्यावं.
 • लहान मुलांचे साबण, कंगवे आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवा.
 • लहान बाळांना दूध पाजताना, अन्न भरवताना, कपडे बदलण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
 • मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
 • मुलांनी कमीतकमी 20 सेकंद तरी हात धुवावेत.
 • डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधं सुरू करा. कारण औषधांचं हे प्रमाण मुलांच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे बदलतं. उदा. एखाद्या मुलाला किती प्रमाण दररोज झिंक वा व्हिटॅमिन – सी गेलं पाहिजे हे त्याचं / तिचं वय आणि वजन यावरून डॉक्टर ठरवतात.