| |

इन्फ्लुएन्झा लस कुणासाठी? कोरोनाशी इन्फ्लुएन्झाचा संबंध काय?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून आपण कोरोना विषाणूशी लढत आहोत. नुकतीच त्याची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे मात्र त्याचसोबत तिसऱ्या लाटेचे वारे वाहू लागले आहेत. हि लाट लहान मुलांवर परिणाम करण्याची गंभीर शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे तिसऱ्या लाटेची उपाययोजना म्हणून बालरोगतज्ज्ञ टास्कफोर्स व सरकार लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालये व उपचार केंद्रे सुरू करीत आहेत.

चिंतेचा विषय म्हणजे १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण उपलब्ध नाही. मात्र केंद्र सरकारने १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची लस कंपन्यांना चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. पण अजूनही १२ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाच काय? म्हणूनच तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्‍याची तयारी म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लहान मुलांना इन्फ्लुएन्झा लस द्यावी, असे राज्य सरकारच्या कोविड व बाल रोगतज्ज्ञ टास्क फोर्सने सरकारला शिफारस केली होती. या लसीमुळे इन्फ्लुएन्झा वायरसमूळे होणारे गंभीर आजार रोखता येतील.

इन्फ्लुएन्झा म्हणजे काय? आणि हि लस कोणासाठी?
– इन्फ्लुएन्झा हा कोरोनासारखा श्‍वसनाची लक्षणे असणारा फ्लू आजाराचा एक प्रकार आहे. यात सर्दी, ताप, खोकला, न्यूमोनिया, जुलाब अशी सामान्य लक्षणे आढळतात. पावसाळ्यात असे साथीचे रोग डोके वर काढतात, म्हणून फ्लूसारखे आजार रोखण्यासाठी इन्फ्लुएन्झा लस बालकांना देणे गरजेचे आहे.

कोरोनाशी इन्फ्लुएन्झाचा संबंध काय?
– मुळात या लसीचा कोरोनाशी काहीही संबंध नाही. या लसीमुळे कोरोनाचे संक्रमण रोखता वा थोपवता येत नाही. यामुळे सद्यपरिस्थितीत सर्दी किंवा तापसुद्धा कोरोनाचे संक्रमण असल्याचे भासते. इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आजार असून त्याची लक्षणे कोरोना काळात आलीच तर कारण नसताना कोविडसाठी तपासण्या केल्या जातील आणि याचा पूर्ण भार आरोग्य यंत्रणेवर पडेल. इन्फ्लुएन्झा लस ही राष्ट्रीय लसीकरणात समाविष्ट करण्यात आलेली नाही. मात्र हि एक सुरक्षित व प्रभावी लस आहे. हि लस १२ महिने म्हणजे वर्षभर संरक्षण करण्यात सक्षम आहे. यात इन्फ्लुएन्झा ए व बी, अशी दोन स्ट्रेन असतात.

लहान बालकांसाठी ‘इन्फ्लुएन्झा’ लस उपयोगी ठरेल का?
– निश्चितच हि लास लहान बालकांसाठी उपयोगी आहे. मात्र ज्या बालकांना जन्मजात आजार आहे किंवा त्या आजारावर औषधे सुरू आहेत त्या मुलांसाठी हि लास आवश्यक देखील आहे आणि ती उपयुक्त सुद्धा ठरेल. हृदयविकार, किडनी विकार, मधुमेह, ऑर्गन ट्रान्सप्लांट, रक्‍ताचे विकार, कॅन्सर, टीबी, एड्‌स, प्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्या लहान मुलांना कोणतेही संक्रमण वा आजार होण्याचा तीव्र धोका असतो. यामुळे इन्फ्लुएन्झा लस फ्लूसारखी लक्षणे व त्याची तीव्रता रोखण्याकरिता उपयोगी ठरेल.

कोणती काळजी घ्याल?
– अश्या संक्रमणांपासून दूर राहण्यासाठी आपण स्वतः स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मोठ्यांनी आणि लहानांनी सगळ्यांनीच वारंवार हात धुणे, हात निर्जंतुक करणे, मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे, डोळे, नाक आणि तोंडाला सतत स्पर्श करणे टाळणे अश्या गोष्टी पाळा. यासाठी पालकांनी स्वतः मुलांच्या स्वच्छतेकडे जातीने लक्ष द्यावे.