|

लहान बाळाला गुदगुल्या करणे अमानुष कृत्य; जाणून घ्या काय होतात परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरात सानुले बाळ जन्माला येणे म्हणजे अगदी आनंदी आनंद असतो. घरातील प्रत्येकाचे मन आनंदाने आणि उत्साहाने तुडुंब वाहू लागते. एकदा का बाळ घरात आले का मग घरातील थोरामोठ्यांपासून लहानग्यांपर्यंत सारेच आणखी लहान होतात. त्या चिमुकल्या बाळाला सतत घेऊन बसावे, त्याच्यासोबत खेळावे असे प्रत्येकाला वाटते. बाळाचे हसणे आणि इतर बाललीला पाहून सारेच थक्क होत असतात. बाळाचे गोड हास्य पाहून जो तो हरवून जातो. एकदा का बाळ रुळले आणि खेळू लागले कि सारेच जण आपापल्या हातातील काम ठेवून अगदी त्याच्याकडे टक लावून पाहत राहतात. जणू काही त्यांची शुद्ध हरपली आहे.

बाळाला सतत हसत ठेवण्यासाठी टिवल्या बावल्या करणे, वाकुल्या दाखवणे आणि हळुच त्याला गुदगुल्या करण्याची सवय लागते. कारण असे केल्यावर बाळ खुदकन हसते आणि मग तुम्हालाही जणू असे करण्याची परवानगीच मिळते. त्यामुळे बाळाला गुदगुदल्या करणे तुम्हाला बाळाला हसविण्यासाठी सोप्पा पर्याय वाटू लागते आणि असे सतत करावे वाटते. पण तुम्हाला काय वाटतं गुदगुल्यांमुळे बाळ सतत हसतमुख राहिल? तर तुम्ही एका स्पष्ट आणि शुद्ध भ्रमात आहेत. जर तुम्हाला अशी सवय असेल तर लगेच थांबवा… कारण बाळाला गुदगुलया करणं बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. याचे गंभीर दुष्परिणाम होतात. माहित नसतील तर लगेच जाणून घ्या.

० बाळाला गुदगुल्या करण्याबाबत असलेले सर्वसामान्य समज कोणते?
– बाळ किमान ६ महिन्याचे झाले कि भावनेतून प्रतिक्रिया देण्यास शिकते. मात्र या वयात त्याला गुद्गुल्यांमुळे होणाऱ्या संवेदना समजत असतीलच असे नाही. कोणत्याही बाळासाठी गुदगुल्या केवळ एक स्पर्श असतो. त्यामुळे बाळाला होणारे स्पर्शाचे ज्ञान गुद्गुल्यांमधून मिळाल्यास त्याच्या मनावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या स्पर्श ज्ञानावर त्याची प्रतिक्रिया उलट असण्याची शक्यता असते. काही लोकांना वाटतं की, बाळाला गुदगुल्या केल्यामुळे ते लवकर प्रतिक्रिया देण्यास शिकते. यासाठीच बाळाला हसवण्यासाठी, त्याला लवकर बोलायला शिकवण्यासाठी, एक प्रकारचा व्यायाम म्हणून त्याला गुदगुल्या केल्या जातात.

० बाळाला गुदगुल्या केल्यामुळे काय दुष्परिणाम होतात?
– गुदगुल्या केल्यामुळे शरीरात संवेदना निर्माण होतात ज्यामुळे बाळ हसू लागते. पण वास्तविक बाळ हसणं किंवा रडणं या दोन गोष्टी प्रतिक्रिया देण्यासाठी असतात. त्यामुळे तुम्ही केलेल्या गुदगुल्यांना बाळ हसून केवळ प्रतिक्रिया देत असते. मात्र ही गोष्ट बाळाला आवडतेय असे नाही, हे आधी समजून घ्या. ज्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत अशा मुक्या प्राण्याला वा बोलू न शकणाऱ्या तान्हुल्या बाळाला गुदगुल्या करणं वास्तविकपणे अमानुष कृत्य आहे. शिवाय गुदगुल्या केल्यावर बाळ जोरजोरात हसते. कारण त्याला होणाऱ्या संवेदना असह्य असतात. असे हसल्याने बाळाला ठसका लागू शकतो किंवा त्याचा श्वासदेखील अडकू शकतो. अनेकदा गुदगुल्या केल्यामुळे बाळाला अचानक उचकी लागते. शिवाय बाळ सतत गुदगुल्यांना हसून प्रतिक्रिया देत नाही. तर यामुळे बाळ चिडचिड करू लागते. शिवाय भरपूर हसण्यामुळे बाळ थकते. तसेच गुदगुल्या होताना अंग चोरण्यासाठी बाळ जोरात अंग झटकते. यामुळे बाळाला कदााचित आतून वा बाहेरून दुखापत होऊ शकते. म्हणूनच कृपया आपल्या बाळाची काळजी घ्या आणि बाळाला मुळीच गुदगुल्या करू नका.

महत्वाचे – पालकांनी याचा नीट विचार करावा आणि बाळाला योग्य मार्गाने हाताळावे. गुदगुल्या करण्याऐवजी बाळाला कुरवाळून त्याचा पापा घेत अगदी हलक्या हाताने मसाज करत त्याला स्पर्श ज्ञान द्या आणि एक प्रेमाचे गोड नाते निर्माण करा.