| |

प्राणी घरात असणे चांगले की वाईट? आपणच ठरवा यातील फायदे आणि तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाईन । नातेसंबंध जोडणे माणसाला आवडते. माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशीपण नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते. त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी हे जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा आपल्या जवळच्या माणसासारखीच त्यांची काळजी घेणे भाग पडते. आज व्यक्ती कोणत्याही कारणाने प्राण्यांचे पालन करीत असला तरी पाळीव प्राणी आणि मनुष्य या परस्परांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते निर्माण होते. अशाच वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांची ओळख, त्यांचे खाद्यपदार्थ, या प्राण्यांच्या सवयी, त्यांना होणारे आजार, त्यासाठी घ्यावयाची काळजी या सर्व बाबींबद्दल माहिती देणार आहोत.

प्राचीन काळापासून माणूस आणि प्राणी दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले आहे. मानव प्राणी ज्यावेळी आपले भटकेपण सोडून वस्ती करून राहू लागला. त्यावेळ पासून त्याला पाळीव प्राण्याची गरज वाटू लागली.  शेतीतील कष्टाची कामे, घराची राखण, धान्याचे संरक्षण आदि कामांसाठी वेगवेगळ्या जातींच्या प्राण्याची गरज भासू लागली. या सहचर्यातून माणूस आणि प्राण्यातील मैत्री वाढू लागली. निसर्ग नियमानुसार माणूस आणि प्राणी यांची शरीरयष्टी वेगळी असली तरी सजीव ही संकल्पना दोघांच्याही बाबतीत खरी ठरते. आजच्या काळात माणसाने स्वत:च्या बुद्धिमत्तेवर अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी प्राचीन काळात मनुष्य संपूर्णत: प्राण्यांवर अवलंबून होता. प्राण्यांची शिकार करून मनुष्य आपला उदरनिर्वाह करत होता. कालांतराने मनुष्याने शिकाऱ्याची भूमिका बदलून अर्थार्जन करण्यासाठी प्राण्यांचे पालन करण्यास सुरुवात केली. इतिहासाच्या अभ्यासक्रमात शिकवलेला मनुष्य आणि प्राणी यांच्या परस्परसंबंधाचा हा अभ्यास आजही प्रत्येकाच्या तोंडपाठ असेल. मात्र काळ बदलतो तशाच जगण्याच्या आणि गरजेच्या व्याख्याही बदलतात.

अलीकडच्या काळात पाळीव प्राणी पाळण्याची संख्या वाढलेली दिसून येते. प्राण्यांची आवड, छंद, किंवा अभ्यास या उद्देशाने अनेकजण आपल्या घरी प्राणी पाळतात. या पाळीव प्राण्यांमध्ये कुत्रा आणि मांजर हेच प्राणी घरात जास्तीत जास्त पाळले जात होते. मात्र अलीकडे पाहिले तर अनेक घरांत आवड म्हणून ससा, मासे, काही पक्षी पाळलेले दिसतात. या प्रत्येक प्राण्यांची त्यांची स्वतंत्र वैशिष्टय़े असतात. कुत्रा पाळतानासुद्धा हल्ली परदेशी ब्रीड्ससाठी लोकांची जास्त पसंती आहे. डॉबरमॅन, लॅब्रेडोर, कॉकर स्पॅनिअल, जर्मन शेफर्ड यांसारख्या अनेक कुत्र्यांचे प्रकार घरोघरी पाहायला मिळतात. कुत्र्यांच्या प्रत्येक प्रकाराचे स्वतंत्र वैशिष्टय़ आहे. उदाहरणार्थ कॉकर स्पॅनिअल ही कुत्र्यांची जात संरक्षणासाठी नसते तर ती केवळ एक छंद, मौज म्हणून उपयोगी पडते. याउलट डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड हे कुत्र्यांचे प्रकार संरक्षण किंवा गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाहायला मिळतात.

प्राण्यांना प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते असे म्हणतात. याचाच अर्थ प्राण्यांनासुद्धा त्यांचा स्वभाव असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती ही मनुष्याच्या बाबतीतील म्हण प्राण्यांच्या बाबतीतही तितकीच खरी ठरते. आपली व्यक्ती कोण आणि परकी व्यक्ती कोण यातला फरक त्यांना कळतो. काही कुत्रे शांत तर काही अतिशय रागीट, काहींचा उपयोग केवळ घरापुरताच तर काहींचा उपयोग गुन्हेगार शोधण्यासाठी होतो. त्यानुसार या विशिष्ट कुत्र्यांची निवड केली जाते. मात्र या सर्व गोष्टी प्राण्यांनी आत्मसात करण्यासाठी त्या संदर्भातील शिकवण आपण त्यांना देणे गरजेचे असते.

मुक्या प्राण्यांवर दया करावी असे म्हणतात मात्र ही भूतदया आपल्या सोईनुसार नसावी. आपण शिकवलेल्या सवयी हे प्राणी शिकतात आणि त्यानुसार वर्तन करतात. काही प्राण्यांचे मालक आपल्या प्राण्याचे अतिशय लाड करतात तर प्राण्याला एकदा भरपूर खायला दिले की नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या दोन्ही परिस्थितीमध्ये प्राण्यांच्या मानसिकतेचा विचार करणे गरजेचे असते. प्राण्यांची स्वच्छता हा महत्त्वाचा भाग आहे. त्यांना आंघोळ कशी घालतात?  किंवा त्यांच्या स्वच्छतेविषयी माहिती करून घ्या.

पाळीव प्राणी केवळ घरातच ठेवणे अयोग्य आहे. त्याला वेळोवेळी बाहेर फिरवून आणणे गरजेचे आहे. या प्राण्यांच्या सहवासात आपल्या शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स तयार होतात. यामुळे  मनावरील ताण-तनाव दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे डिप्रेशन मधील व्यक्तीला बाहेर काढण्यास हे हार्मोन्स मोलाची कामगिरी बजावतात. कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळल्यामुळे आयुष्यात जर तणावाचे वातावरण असेल तर ते कमी होण्यास मदत होते. तसंच पाळीव प्राण्यांसोबत तुम्ही १० मिनिटं जरी घालवली तरी ताण-तणाव हलका होतो. पण या हौसेला एक दुसरी बाजू पण आहे. पाळीव प्राणी पाळल्यामुळे मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या पाळीव प्राणी पाळल्यानंतर असे काय होते. ज्यामुळे तुमचा जीव सुध्दा धोक्यात येऊ शकतो.

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रिवेंशन (CDC) कडून आलेल्या माहीतीनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. घरात जर तुम्ही पाळीव प्राणी पाळत असाल तर इन्फेक्शनचा धोका असू शकतो. असं इन्फेक्शन जे अॅन्टीबायोटीक घेतल्यानंतर सुध्दा बरं होणारं नसतं. सीडीसीच्या रिपोर्टनुसार ३० लोकांचे निरीक्षण करण्यात आले. त्यात बॅक्टीरीयल इन्फेक्शन झालेले अधिक होते. त्यात असे निदर्शास आले की इन्फेक्शन झालेल्या लोकांमध्ये पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांची संख्या अधिक होती. त्यांनी घरात पाळलेले प्राणी हे प्राण्यांच्या शॉपमधून आणले होते. प्राण्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना हे इन्फेक्शन झाले. त्या लोकांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. या रेअर इन्फेक्शनला कॅम्पाइलोबॅक्टर जेजुनी असे नाव आहे. तसंच ह्या प्रकारचं इन्फेक्शन कच्च किंवा अर्धवट शिजलेले चिकन खाल्ल्याने सुध्दा होतात. हे इन्फेक्शन झाल्यास अॅन्टीबायोटीक गोळ्यांचं सेवन करून सुध्दा फरक पडत नाही.

दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांमुळे होत असलेल्या आजारांचं प्रमाण वाढत चालले आहे. हे इन्फेक्शन बॅक्टेरीया हवेत पसल्यामुळे होतं. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कुत्र्यांना सर्वाधिक प्रमाणात कॅम्पाइलोबॅक्टर इन्फेक्शनचा सामना करावा लागतो. ह्या आजाराची लागण श्वासावाटे होते. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होऊन आजार पसरण्याचा धोका असतो. आणि महत्वाचे म्हणजे जर घरात जर लहान मूल असेल तर घरात प्राणी नसलेलाच बरा !!!