vaccine

मासिक पाळीच्या अगोदर किंवा नंतर लगेच कोरोना लसीकरण केले जाऊ नये?, खरं आहे का हे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । काही दिवसांपासून भारतात सगळीकडे कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी अनेक ठिकाणी कोरोनाच्या लसीचे डोस देणे सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी १ मे पासून १८ वर्षावरील लोकांना कोरोनाच्या लसी देण्यात येणार आहेत. पण त्याच पार्श्वभूमीवर एक मेसेज सगळीकडे फिरत आहे. हा मेसेज योग्य आहे कि अयोग्य याबाबत काही डॉक्टरांनी आपली मते मांडली आहेत.

काय आहे मेसेज ?

“मासिक पाळीच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर लस घेऊ नका. कारण मासिक पाळीदरम्यान आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. लशीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकार क्षमता कमी करतो आणि मग हळूहळू रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान लस घेतली तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळी काळात लस घेऊ नका.” असा मेसेज सगळीकडे, वायरल होत आहे. पण याबाबत तथ्य किती आहे ते माहिती करून घेऊया…

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार पहिल्या टप्यातील लस हि डॉक्टर, नर्स, अनेक वैदयकीय अधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांना देण्यात आली होती. काही दिवसापासून हि लस ४५ वर्षावरील सगळ्या लोकांसाठी खुली करण्यात आली होती. जवळपास १३ कोटी लोकांनी लस घेतली आहे.आता १ मे पासून सर्व १८ वर्षावरील लोकांना देण्यात येणार आहे. या लसीने महिलांच्या शरीरावर काही परिणाम होणार आहे का? या लसीचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे का ? यासंदर्भात गायन्कॉलॉजी डॉ. गायत्री देशपांडे यांच्याकडुन माहिती मिळवली असता, त्या म्हणाल्या कि, ” मासिक पाळी हि एक नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा असता कामा नये, ज्यावेळी नैसर्गिक स्थिती आहे, त्यावेळी मासिक पाळी जरूर आली जावी. पण मासिक पाळीचा आणि कोरोनाच्या लसीचा एकमेकांशी बिलकुल काही संबंध नाही. ज्यावेळी महिलांना वेळ मिळेल त्यावेळी महिलांनी नक्की लस घ्यावी. अनेक महिला घरातून तसेच बाहेर जाऊन पण काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळेत जर तुमची लसीची नोंदणी झाली असेल, आणि लस उपलब्ध असेल तर प्रत्येक महिलेने जरूर घेतली जावी. या लसीचे महिलांच्या शरीरावर कोणतेही अपायकारक परिणाम होत नाहीत.”

भारत सरकारनं ने पण दिलंय स्पष्टीकरण

सोशल मीडियावर मासिक पाळी आणि लसीकरणासंदर्भात मेसेज फिरू लागल्यानंतर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने यासंदर्भात फॅक्ट चेक जारी केलं.त्यात असं म्हटलं आहे की, मुलींनी तसंच महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच दिवस आणि नंतर पाच दिवस लस घेऊ नये असे मेसेज फिरत आहेत. ते मेसेजफेक आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका. हे सगळे मेसेज खोटे आहेत. त्या संदर्भांत कोणताही मेसेज अभ्यासपूर्वक दिला गेलेला नाही.