|

आई होण्यासाठीही वय असतं?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उच्च शिक्षण आणि उच्च विचारसारणी, तसेच बदललेले जीवनमान आपल्या आयुष्यावर बराच प्रभाव ठेवतात. आजकाल प्रत्येकाला खूप कमवायचं आहे. खूप मोठं व्हायचं आहे. यशाच्या शर्यतीत पहिलं यायचं आहे. यासाठी तरुण आणि तरुणी आपल्या यौवनातील अनेक वर्षे काम करून दाम मिळविण्यात घालवतात. यानंतर लग्न, घर, संसार. अश्या अनेक जोडप्यांना तुम्ही पहिले असाल ज्यांचे लग्न उशिरा झाले आणि मग मुलं होत नाहीये वा मुलासाठी अडचण येतेय. शिवाय लग्न होऊनही अनेक जोडप्यांना मुलं होत नाही. याच कारण म्हणजे फर्टिलिटीमध्ये समस्या असणे. याबाबत अनेकांना बरीच माहिती नसते. त्यातही बायोलॉजिकल क्लॉकबाबत कुणी माहिती ठेवत नाही. पण जेव्हा बाळासाठी प्लॅनिंग सुरू होते तेव्हा मात्र असे शब्द कानावर पडतात.

फर्टिलिटीची समस्या महिलांमध्ये तसंच पुरूषांमध्येही जाणवते. अनेक जण म्हणतात कि पालकत्वाला वा आई होण्याला काही वयोमर्यादा असते. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि होय यात तथ्य आहे. कारण महिलांच्या आणि पुरुषांच्या वयाचा गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. मात्र, याची समज दोघांना असणं गरजेचं आहे. तरच गर्भधारणा आणि गर्भावस्थेदरम्यान योग्य पर्याय निवडण्यास मदत होते.

० पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या वयाचा फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो?
– महिला निश्चित संख्येने स्त्री बीज (अंडी) घेऊन जन्माला येतात. जे वाढत्या वयानुसार फार वेगाने कमी होत जातात. यामुळे एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर स्त्री बीज संपायला सुरूवात होते. मुख्य म्हणजे, या अंड्याना पुन्हा तयार केलं जाऊ शकत नाही. तुलनेनं पुरूषांच्या शरीरात वीर्य सतत तयार होते. यावरून दिसून येते की गर्भधारणेसाठी महिलांनी विशिष्ट वयोमर्यादेतच प्रयत्न करायवे. कारण पुरूष वयाच्या ६० व्या वर्षीही वडील होऊ शकतात.

० वयाच्या दुसऱ्या दशकातील गर्भधारणा – तज्ञ सांगतात, हे वय मुलं जन्माला घालण्यासाठी उपयुक्त असते. कारण या वयात महिला जास्त फर्टाईल असतात. यामुळे वयाच्या दुसऱ्या दशकाच्या सुरूवातीला आणि शेवटी फर्टिलिटीमध्ये फारसा फरक जाणवत नाही.

० या वयात गर्भधारणा झाल्यास होणारे फायदे

१) महिलांच्या अंड्यांमध्ये अनुवांशिक असमानता होण्याची शक्यता कमी होते.

२) या वयात कोणताही अनुवांशिक आजार उदा, डाउन्स सिंड्रोम, थॅलेसीमिया या आजाराची लागण मुलांना होत नाही.

३) गर्भपाताचा धोका फक्त १० टक्के असतो.

४) मुलाच्या जन्माच्यावेळी वजन कमी न राहता व्यवस्थित विकास होतो.

५) आईला गर्भकालिन डायबिटिज, हायपरटेंशन याप्रमाणे अन्य समस्यांचा धोका कमी असतो.

० या वयात गर्भधारणा झाल्यास होणारे नुकसान

१) गर्भधारणेत कॉम्प्लिकेशनचा धोका जास्त असतो.

२) PCOD, PCOS वा गर्भाशय फाइब्रॉएड किंवा दुसरा कोणताही आजार असेल तर गर्भावस्थेदरम्यान कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो.

० पुरूषांच्या बाबतीत अधिक चिंता करण्याचं कारण नसतं. कारण..,
– पुरूषांमध्ये जर जीवनशैली खराब असेल तर इनफर्टिलिटीचा सामना करावा लागतो. यासाठी पुरूषांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला तर ही समस्या टाळता येऊ शकते. पुरूषांमध्ये सेक्सूअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन स्पर्मची गतीशीलता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

तिसऱ्या दशकातील गर्भधारणा – एका अभ्यासानुसार, वयाच्या तिसऱ्या दशकात स्त्रिया त्यांच्या पहिल्या प्रयत्नात गर्भवती होण्याची शक्यता ३०% अधिक असते. कारण जेव्हा स्त्री ३५ वयात पोहोचते तेव्हा अंड्यांची गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाल्यामुळे तिची प्रजनन क्षमता कमी होते. वयाच्या ३५शीनंतर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या वयात जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता जास्त असते.

० तिसऱ्या दशकात गर्भधारणा होण्याचे नुकसान

१) सी सेक्शनची भीती जास्त असते.

२) लहान मुलांमध्ये अनुवांशिक आजार होण्याची भीती असते.

३) गर्भपात होण्याची संभावना वाढते.

४) एक्टोपिक गर्भधारणा (एक्टोपिक गर्भधारणेमध्ये फर्टिलाईज्ड अंडी गर्भाशयाला जोडत नाही, उलट ते फॅलोपियन ट्यूब, उदरपोकळी किंवा गर्भाशयशी जोडतात.)

० वयाच्या चाळिशीनंतर गर्भधारणा – वयाची चाळीशी उलटल्यानंतर गर्भवती होणे अशक्य नाही. परंतु सोप्पेही नाही. कारण ४०-४४ वयोगटातील प्रत्येक ओव्हुलेटरी चक्रानंतर गर्भधारणेचे प्रमाण ५% कमी होते. यामुळे गर्भधारणेचा दर १% होतो.

० शिवाय या वयात पुरूषांचीदेखील प्रजनन क्षमता हळू हळू कमी होते. कारण शुक्रांणूंच्या संख्येत कमतरता जाणवते.

० महत्वाचे – मुलं होणं वा न होणं हि प्रकृती आहे. यामुळे नाराज होऊ नका. कारण विज्ञान फार प्रगत झाल्यामुळे आजकाल हवं तेव्हा बाळ प्लॅन करता येत. पण यासाठी आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात करिअरमुळे तुम्ही थोडं उशिरा बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर त्यांच व्यवस्थित नियोजन करा आणि मुख्य म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यवस्थित आहार घ्या. जेणेकरून आपल्याला कोणत्याही आरोग्यविषयक समस्येचा सामना करावा लागू नये.