| |

वॉटरप्रूफ मेकअप त्वचेसाठी सुरक्षित आहे?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेकअप म्हणजे जणू तरुण युवतींचा जीव कि प्राण. लग्न, बारसं, पार्टी, इव्हेन्ट काहीही असलं तरी स्त्रिया हमखास आपला चेहरा इतर स्त्रियांपेक्षा सुंदर, तेजस्वी आणि मोहक दिसावा म्हणून प्रयत्न करीत असतात. पण पावसाच्या दिवसात मेक अप करायचा म्हणजे डोक्याला तापच. कारण, पावसात भिजल्यानंतर अनेकदा आय लायनर, शॅडो, ग्लो आणि अगदी लॅशेस खराब होतात आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. यावर अगदी उत्तम पर्याय म्हणून स्त्रिया आपला मोर्चा वॉटर प्रूफ मेकपकडे वळवतात. घाम असो किंवा पाऊस यामूळे तासनतास मेहनत घेऊन केलेला मेकअप खराब होऊ नये यासाठी आजकाल बाजारात वॉटर प्रूफ मेकअपला खूप मागणी आली आहे. पण अनेकदा तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल, कि आपण वापरत असलेला वॉटरप्रूफ मेकअप आपल्या त्वचेला हानी तर पोहचवणार नाही ना? काय? तुमच्याही मनात हा प्रश्न सारखा घोळत असेल तर वॉटर प्रूफ मेकअप वापरण्याआधी हा लेख पूर्ण जरूर वाचा आणि जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर. खालीलप्रमाणे:-

० वॉटरप्रूफ मेकअप किट वापरणे त्वचेसाठी सुरक्षित आहे?
– खूप वेळ मेहनत घेऊन संयमाने केलेला मेकअप त्वचेतील घाम अथवा तेलामुळे खराब होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ मेकअप मध्ये वापरण्यात येणारे घटक हे त्वचेसाठी हानिकारक असू शकतात. पण, वॉटरप्रुफ मेकअप मधील काही घटक जे तुमच्या त्वचेमधील पिगमेंटेशन झाकण्यासाठी वापरले जातात ते जर केमिकल-फ्री असतील तर ते वापरणे सुरक्षित असू शकते. पण काही वेळा अशा वॉटरप्रूफ मेकअप प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स मोठ्या प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे असे मेकअप किट आपल्या त्वचेसाठी सुरक्षित असू शकत नाही.

० वॉटरप्रूफ मेकअपमुळे चेहऱ्यावर कोणते परिणाम होतात?
– अॅनिमल व व्हेजीटेबल बेस वॅक्स, पॉलिमर व वॅक्स प्रमाणेच वॉटरप्रूफ मेकअपच्या साहित्यामध्ये सिलिकॉनचा वापर केला जातो. ज्यामुळे त्वचेतील छिद्रे बंद होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. इतकेच नव्हे तर त्वचेवर पुरळसुद्धा येते आणि त्वचा खराब होऊ लागते. यासोबत अॅलर्जीदेखील होऊ शकते. शिवाय वॉटरप्रूफ फॉऊंडेशनमध्ये सिलिकॉन असते आणि दररोज फाउंडेशन चा वापर चेहरा लवकर निस्तेज बनवते. यासह वॉटरप्रूफ मस्कारामध्ये कंडीशनिंग घटक असलेले तेल न वापरल्यामुळे याच्या वापराने डोळ्याच्या पापण्या कोरड्या होण्याचा धोका असतो. याशिवाय पापण्यांची त्वचा खराब होऊ शकते.

० वॉटरप्रूफ मेकअप कसा काढावा?
– सुंदर दिसण्यासाठी आणि पाण्यामुळे खराब होऊ नये म्हणून चेह-यावरील जाड वॉटरप्रूफ मेकअप करावा लागतो. त्यामुळे तो काढताना चांगल्या गुणवत्तेचे महागडे क्लिनझर वापरावे लागते. जसे कि,
वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरावे. यासाठी डोळे व डोळ्यांच्या पापण्यांवर थोडेसे ऑलिव्ह ऑईल लावावे. हे तेल थोडावेळ तसेच राहू द्या आणि काही मिनीटांनी तो भाग स्वच्छ धुवा.
याशिवाय चेहरा व मानेवरचा वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी कोल्ड क्रीम वापरणे फायद्याचे ठरते.

० टीप – मेकअप केल्यावर घाम येत असेल तर त्यासाठी वॉटरप्रूफ मेकअपऐवजी रेसिस्टंट मेकअपचा पर्याय निवडा. कारण वॉटर रेसिस्टंट मेकअप वॉटरप्रूफ मेकअपपेक्षा हलका असतो. त्याचा परिणाम अगदी वॉटरप्रूफ मेकअप सारखाच असतो. मात्र त्याचे वजन हलके असल्यामुळे त्याचा अधिक पोत चढवावा लागत नाही.