| | |

काय ओ! तुमचं डाएट फॅड तर नाही ना?; जाणून घ्या डाएट रुल्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले वजन वाढू लागल्याचे निदर्शनास आल्यावर सगळ्यात सोप्पी उपाययोजना म्हणजे ‘डाएट’ असे अनेकांना वाटते. पण मित्रांनो ‘डाएट’ वजन कमी करण्यास सहाय्यक असले तरीही आरोग्यावर मात्र विपरित परिणाम करु शकते यात काहीच शंका नाही. यामुळे वजन कमी होता होता आरोग्याचाही ऱ्हास होतो. परिणामी तब्येतीच्या तक्रारींमुळे केल्या जाणाऱ्या औषधोपचारांमुळे पुन्हा वजन अनियंत्रित होते. म्हणजे काय? तर पालथ्या घडावर पाणी. याचे कारण म्हणजे आपण फॉलो करीत असेल डाएट हे चुकीचे असणे. होय. डाएटसुद्धा चुकीचे असूच शकते. कारण अपुरी माहिती आणि निष्काळजीपणा यामुळे आपण डाएटची संज्ञा बदलून टाकतो आणि मनाचा कारभार करतो. खरतर यालाच ‘फॅड डाएट’ असे म्हणतात.

खरंतर फॅड डाएटची अशी काही व्याख्या नाही. पण तरीही सांगायचे झालेच तर, कोणताही आहार जो चांगल्या आरोग्यासाठी मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करत नाही आणि सहज व जलद वजन कमी करण्याचे वचन देतो. अशा डाएटला आपण फॅड डाएट म्हणू शकतो. अनेक लोक दुसऱ्याला एखाद डाएट सूट होतंय हे पाहून आपले डाएट मध्येच सोडून त्याचे डाएट फॉलो करू लागतात आणि इथेच सगळी गणित फसतात. आता आपलं डाएट फॅड आहे की लाइफ स्टाइल? यामुळे आपलं वजन कमी होईल ना? एक आठवड्याचं डाएट, पंधरा दिवसांचं डाएट, महिन्याभराचं डाएट फॉलो करुन वजन कमी करता येतं? कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवता येतं? अशा प्रश्नांची उत्तरं कोणतंही डाएट फॉलो करण्याआधी मिळवणं आवश्यक आहे. जर ही उत्तरं मिळत नसतील तर अमूक तमूक डाएटचं फॅड सोडलेलंच बरं, नाही का?

० फॅड डाएट टाळा.
– फॅड डाएट हे आपली ताकद आणि आपल्या वजनाच्या गुणोत्तरावर वाईट परिणाम करतं. हा परिणाम झाला की साहजिकच आपलं आरोग्य बिघडतं. म्हणून डाएट फॅड टाळणं गरजेचं. आता हे टाळायचं असेल तर त्यासाठी डाएट रुल्स फॉलो केलेच पाहिजे. आता हे डाएट रुल्स कोणते? तर चला जाणून घेऊया.

० डाएट रुल्स –

१. अमुक पदार्थ चांगला तमुक वाईट, हे बंद करा आणि आरोग्यवर्धक आहार घ्या.
– सध्याच्या डाएट फॅडमधे प्रथिनं व चांगले फॅटस योग्य आणि साखर व कर्बोदक अयोग्य खाण्यात मानले जातात. जेव्हा प्रथिनं, कर्बोदकं, फॅटस याच नजरेने पहिले जातात तेव्हा ‘न्यूट्रिशनिझम’ला साहजिकच पांठिबा मिळतो. दरम्यान आपण जेव्हा पदार्थांचे वर्गीकरण करतो तेव्हा सामान्य ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो. आपल्या आहारात वातावरण, स्वयंपाकघरातील चालीरिती, संस्कृती यांचं काहीच महत्त्व नाही, काहीच संबंध नाही अशा विचारांवर ठाम राहतो. पण खरतर अमूकच एक पदार्थ आरोग्यासाठी चांगला, वजन कमी करण्यासाठे उपयुक्त असं काहीही नसतं. आपलं डाएट हे आपल्या जीवनशैलीवर आधारलेले असते. आहारशैली ही जेव्हा सामान्य ज्ञान, स्वयंपाकघरातील चालीरिती, आपलं स्थानिक वातावरण आणि संस्कृतीला महत्त्व देणार असते तेव्हाच ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं हे लक्षात ठेवा.

२. याची पावडर त्याचा काढा सेवन करणे थांबवा आणि पोषक आहाराकडे वळा.
– आपले डाएट संस्कृतीशी अनुरुप नसेल तर याला फॅड डाएट म्हणता येईल. कारण डाएट फॅड हे आपल्याच संस्कृतीतला एक घटक उचलून त्यालाचं जास्त बढवून चढवून त्याचं महत्त्व आपल्या मनावर बिंबवले जाते. या पदार्थाची पावडर, चूर्ण खा वा त्या औषधांचा काढा प्या. यामुळे आपलं पचन चांगलं होईल, बॉडी डीटॉक्स होईल, वजन लवकर कमी होईल हे सगळं ऐकल्यावर जे या डाएटकडे वळतात त्यांचे डाएट फॅड डाएट आहे हे समजून जा. यापेक्षा आठवड्यातून एखादा उपवास करा पण उपाशी राहू नका. अनेकदा फॅड डाएटमधे एक वेळ जेवण करा असे सांगतात. पण यामुळे अशक्तपणा येतो, शरीरात पोषक घटकांची कमतरता होते. म्हणून उपवास असल्यास फळे, ज्यूस आणि नारळाचे पाणी तसेच ड्रायफ्रूट्स खा. याचा फायदा होईल.

३. हे खा नाहीतर ते. मोजून मापूनच खा? यापेक्षा खाण्याचे नियोजन करा.
– मोजून मापून खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते हा समजच चुकीचा आहे. तुम्ही किती पनीर खाल्लं, मटार खाल्ले, स्प्राऊट्स खाल्ले आणि किती दूध प्यायलात, तुमच्या पोटात तेल तूप किती गेलं या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवल्यास डोक्यात आकडे फिरतात. हे डाएट फॅड आहे असं समजा. स्वयंपाक ही एक कला आहे. तिला कॅलरीज आणि ग्रॅममधे कसकाय मोजता? हे वेगळं कि, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद, चवीपुरती मीठ, साखर, मूठभर शेंगदाणे या पध्दतीने स्वयंपाक होतो. कारण हे प्राचीन ढोबळ मोजमाप पद्धती आहे. पण आईला स्वयंपाकात करताना कॅलरी मोजून टाक आणि प्रथिने जरा जास्त घाल असे कसे सांगता येईल बर? यामुळे स्वयंपाक करताना सतत मोजमाप केल्यास चव आणि पोषण कमी तर आकड्यांमुळे तणाव पदार्थात प्रवेश करतो. यामुळे निरुत्साह, असमाधान, दु:ख, अनारोग्य आणि अवेळी म्हातारपण येत. यापेक्षा आपण खात असलेल्या गोष्टींचे योग्य नियोजन करा. जसे कि, आपण एकावेळी खूप खाण्यापेक्षा सकाळी – दुपारी- संध्याकाळी- रात्री असे चार भाग करा आणि पोटाच्या गरजेप्रमाणे खा.

४. आपल्या डाएटचा आपल्याच लोकांना त्रास होऊन देऊ नका.
– आपण एखादे डाएट फॉलो करत असाल तर यामुळे आनंद आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीवर याचा गंभीर परिणाम होत आहे हे विसरून जातो. जसे कि, आपली मुले. जर तुम्ही स्तनदा माता असाल तर तुमच्या कमी आणि मोजून मापून खाण्याच्या फॅडमूळे तुमच्या मुलाच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय नवर्‍याला, आईला, आजीला वाईट वाटत राहते कि आपल्याला त्रास होत असेल. यामुळे तेही उपाशी आणि अर्धपोटी राहतात. असं तू खाऊच कसं शकते? एवढ्यानं भूक कशी भागेल? आजारी पडशील अशी वाक्यं आपलं डाएट बघून जर आपले जवळचे सतत सतर्क करीत असतील तर आपले डाएट चुकत आहे हे समजून घ्या.