| | |

हिवाळ्याच्या दिवसांत संत्री खाणे लाभदायक; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नागपूरची जगप्रसिद्ध संत्री कुणाला माहित नाहीत? चवीने आंबटगोड असणारे हे फळ थंडीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध असते. संत्री आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक मानली जातात. कारण संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, फायबर्स, मॅग्नेशियम असे अनेको पोषक घटक असतात जे शरीराची काळजी घेण्यास सक्षम असतात. तसेच संत्र्यामध्ये कॅलरिज कमी असतात. परिणामी वजन देखील नियंत्रणात राहते.
प्रामुख्याने संत्र्यामध्ये कॅलरिज ६०, फायबर्स ३ ग्रॅम, कार्बोहायड्रेड १५ ग्रॅम, साखर १२ ग्रॅम, प्रोटीन्स १ ग्रॅम, व्हिटॅमिन ए १४ मायक्रोग्रॅम, व्हिटॅमिन सी ७० मिग्रॅ, कॅल्शियम ५२ मिग्रॅ, पोटॅशियम २३७ मिग्रॅ इतक्या प्रमाणात आढळते. यामुळे संत्री खाणे आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारे लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊयात संत्र्याचे आरोग्यदायी लाभ खालीलप्रमाणे:-

१) रोगप्रतिकारशक्तीत वाढ – संत्र्यातील व्हिटॅमिन सी शरीरातील महत्त्वाच्या क्रिया सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतात. तसेच सर्दी, खोकला, नाक आणि कानाचे इनफेक्शन अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी असणं गरजेचं आहे. म्हणून आजारपणापासून संरक्षण मिळवण्यासाठी संत्री खा.

२) रक्तदाब नियंत्रणात – संत्र्यात व्हिटॅमिन बी 6 भरपूर असते. जे शरीरातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीला प्रेरणा मिळते. यातील मॅग्नेशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

३) मधुमेहींसाठी लाभदायक – मधुमेही कोणत्याही भीतीशिवाय संत्री खाऊ शकतात. कारण यामधील साखरेचे प्रमाण फार कमी आहे. शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

४) कर्करोग – संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अॅंटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग अशा अनेक कर्करोगापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. संत्र्यामुळे वाढणारी रोगप्रतिकार शक्ती कर्करोगाच्या पेशींना शरीरात वाढू देत नाही.

५) किडनी स्टोन – शरीरात सायट्रेटची कमतरता असेल तर मूतखड्याचा त्रास होतो. मात्र संत्र्यामुळे शरीरातील सायट्रेटचे प्रमाण वाढते. शिवाय संत्र्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे किडनी स्टोन वा मूतखड्याच्या त्रासापासून संरक्षण होते.

६) अॅनिमिया – लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो. संत्र्यामधून शरीराला व्हिटॅमिन सी भरपूर मिळते. ज्यामुळे शरीराला अन्नातून लोह शोषून घेणे सोपे जाते. मुख्य म्हणजे, व्हिटॅमिन सी शिवाय शरीर अन्नातील लोह शोषून घेऊ शकत नाही. यासाठी अॅनिमिया वा अशक्तपणा जाणवत असेल तर दररोज १ संत्रे खा.

७) PCOD – आजकाल अनेक महिलांना PCODचा त्रास जाणवतो. मात्र जर प्रत्येक महिलेने आहारात संत्र्याचा समावेश केला तर त्यांना हा त्रास नक्कीच होणार नाही. कारण संत्र्यामुळे महिलांच्या शरीराला आवश्यक पोषकमुल्य मिळतात.

८) डोळ्यांचे आरोग्य – संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे संत्री खाल्ल्याने अंधत्व वा दृष्टीदोष सहन करावे लागत नाही.

९) वजनावर नियंत्रण – वजन नियंत्रणात राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहार गरजेचा आहे. संत्र्यामध्ये फायबर्सचे प्रमाण जा्स्त असते. शिवाय यामुळे शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्री खाण्यास सुरूवात करा.