| | |

हिवाळ्यात गुळाचे पदार्थ देतात शारीरिक ऊर्जा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याचा मध्यान्ह म्हणजे कडाक्याची थंडी. हीच थंडी सध्या आपण सारे अनुभवत आहोत. अशा वेळी शरीराला उष्णतेची नितांत गरज असते. हि गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्पे आहे. यासाठी आपण आपल्या आहारात काही पदार्थ जाणीवपूर्वक समाविष्ट करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने गुळाचा समावेश असावा. याचे कारण म्हणजे गूळ स्वभावाने उष्ण असतो. यामुळे दररोज एक गुळाचा तुकडा जरी खाल्ला तरी शरीराला आवश्यक ऊर्जा प्राप्त होते. पण नुसता गुळाचा तुकडा खाणे अनेकदा कंटाळवाणे वाटते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत ज्यामध्ये गुळाचा वापर करून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. अगदी तुम्हीच नाही तर तुमची लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने हे पदार्थ खातील. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) गुळाचा चहा

साहित्य : दूध 1 कप, पाणी 1 कप, चहा पावडर 1 छोटा चमचा, गुळ 3 छोटे चमचे, छोटी वेलची 2, आलं 1 छोटा चमचा, तुळशीची पानं 3 ते 4

कृती : सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घ्या. उकळलेल्या पाण्यामध्ये चहा पावडर, आले, वेलची, तुळशीची पानं आणि गुळ एकत्र करा. मिश्रण उकळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून पॅनवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्या. असे केल्याने सर्व मसाले व्यवस्थित चहामध्ये एकत्र होतील. दुसऱ्या एका पातेल्यामध्ये दूध उकळून घ्या. दूध उकळ्यानंतर दोन्ही गॅस बंद करा आणि हे दूध चहामध्ये हळूहळू मिक्स करा. लक्षात ठेवा एकत्र ओतल्यामुळे दूध फाटतं, म्हणून हळूहळू हे एकत्र करा.

फायदे :
१) रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर – गूळ रक्त शुद्ध करण्यासह रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास सक्षम आहे.
२) पचनक्रियेसाठी लाभ – गुळातील पोषक तत्त्व पचनक्रियेसाठी लाभदायक आहेत.
३) वजनावर नियंत्रण – गूळ शरीरातील वॉटर रिटेंशन कंट्रोलमध्ये ठेवता येत. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

२) गुळाची चिक्की

साहित्य : शेंगदाणे 250 ग्रॅम, गूळ 200 ग्रॅम, पाणी १/२ कप, काही सुकामेवा

कृती : सर्वात आधी काढीत शेंगदाणे चांगले भाजून घ्या. त्यानंतर ते बारीक करून घ्या. आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ टाका आणि गॅसवर ठेवून शिजवा. आता तयार गुळाच्या पाकात शेंगदाणे घालून चांगले मिक्स करा. यासह एका प्लेटला तूप वा बटरने ग्रीस करा आणि हे तयार मिश्रण यावर ओता. यानंतर गरम असताना चमच्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित पसरा आणि त्यावर सुकामेवा घालून आवडीच्या आकारात कापून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे वेगळे करून हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.

फायदे :
१) हि चिक्की थंडीच्या दिवसात रोज खाल तर शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही.
२) गुळाच्या चिक्कीचे सेवन केल्यास शरीर उबदार राहते.
३) गुळाची चिक्की रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते.

३) गुळाचे लाडू

साहित्य : गव्हाचे पीठ 2 कप, आवश्यकतेनुसार पाणी, गूळ 1/2 कप, आवश्यकतेनुसार तेल, हिरवी वेलची, मीठ 1 चमचा, तूप 5 चमचे, ग्राउंड बदाम 1/4 कप, जायफळ 1 चिमूट, आवश्यकतेनुसार खसखस

कृती : हे लाडू बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात तूप घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. यानंतर, त्यात थोडे मीठ घाला आणि हळूहळू पाणी घालताना, पीठ मळून कणकेचा गोळा बनवा. यानंतर, एक पॅन गरम करा आणि त्यात तेल घालून कणिक गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर चुरमाचे गोळे तळून घ्या. त्याला एका प्लेटमध्ये बाहेर काढा. हे कणकेचे गोळे बारीक करून त्याची व्यवस्थित पावडर बनवा. आता एका मोठ्या वाडग्यात चाळणी आणि चमचा वापरून चुरमाचे मिश्रण बाहेर काढा आणि थंड करून घ्या. यानंतर, दुसरा पॅन गरम करा आणि त्यात तूप व गूळ घाला. आता गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. यानंतर मिश्रणात तुप, वेलची पावडर, एक चिमूटभर जायफळ आणि भाजलेले बदाम घाला. यानंतर पीठ मळून लहान लहान लाडू बनवा. त्यात खसखस समाविष्ट करा. आपले लाडू तयार आहेत.

फायदे :
१) हिवाळ्याच्या थंडीत हे लाडू खाल्ल्याने शरीराला चांगली उष्णता मिळते.
२) रोग प्रतिकारशक्ती सक्षम ठेवण्यासाठी गुळाचा लाडू खाणे उत्तम पर्याय आहे.
३) हा लाडू खाल्ल्यामुळे हिवाळ्यात रक्त गोठण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.