| |

आयुर्वेदात जांभळाला अनन्यसाधारण महत्त्व; का ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळा सुरू होताच प्रत्येकाने एकदा तरी हंगामी फळ असणारे जांभूळ खावेच, असे डॉक्टर आवर्जून सांगतात. ग्रीष्म ऋतूत आंबा अमृतफळ तर वर्षांऋतूत जांभळाला अमृतफळ म्हणतात. आयुर्वेदातही जांभळाला संपूर्ण फळ म्हणून संबोधले आहे. कोकणात याला रानमेवा असेही म्हणतात. तर काही ठिकाणी तर जांभळाला अमृताचीही उपमा दिली आहे. कारण, आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा हमखास उपयोग करतात.

मधुमेह, मुतखडा, अतिसार, मुरडा, संग्रहणी, यकृत अश्या बलमय रोगांवर जांभूळ एकदम जालीम उपाय आहे. शिवाय जांभूळ पाचक, यकृत उत्तेजक असते. यामुळे पांडुरोग (अ‍ॅनिमिया), कावीळ, रक्तदोष या आजारांवर जांभळातील नैसर्गिक लोहतत्त्व गुणकारी असतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कि जांभूळ आपल्या शरीरासाठी कसे गुणकारी आहे.

१) यकृत रक्षक – यकृता रक्षेसाठी व त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ७ ते ८ जांभळे त्याच्या चारपट पाण्यात भिजवून किमान १५ मिनिटे कमी आचेवर उकळून घ्या. त्यानंतर जांभळातील बियांसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करून हे द्रावण दिवसातून ३ ते ४ वेळा प्या. यामुळे रक्तात वाढलेली साखर कमी होते आणि रोगप्रतिकार क्षमता वाढून यकृत कार्यक्षम होते.

२) मधुमेहींची संजीवनी – जांभूळ बी १५० ग्रॅम, हळद ५० ग्रॅम, आवळा ५० ग्रॅम, मिरे ५० ग्रॅम, कडुनिंबाच्या पानांची पावडर ५० ग्रॅम, कारल्याच्या बियांची पावडर ५० ग्रॅम यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर २ चमचे घेतल्याने मधुमेह नियंत्रित राहतो. तसेच जांभळाच्या बियांचे चूर्ण मधुमेहावर सर्वोत्तम उपाय आहे कारण यात शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्याची क्षमता असते. दूध किंवा पाण्यासोबत ही पावडर सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मधुमेह लवकर आटोक्यात येतो.

३) रक्तदाब नियंत्रण – जांभळाच्या बिया किंवा त्याच्या अर्काचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब ३४.६% कमी होतो. त्यातील अँटि ऑक्सिडंट्समध्ये रक्तदाबविरोधी गुणधर्म असतात. शिवाय आतड्यातील अल्सर आणि गॅस्ट्रो इन्फेक्शन यांसह पचनसंस्था स्वच्छ करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त आहे.

४) गुणकारी जेली/ सिरप – जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली किंवा सिरप असे पदार्थ तयार करून वर्षभर टिकवता येतात. त्यामुळे हंगामाव्यतिरिक्त याच्या माध्यमातून आपण जांभळाचे सेवन करू शकतो. जांभळाच्या नियमित सेवनाने केस लांबसडक होतात. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

लक्षात ठेवा :
– रिकाम्यापोटी जांभळे खाऊ नयेत. कारण जांभळे खाल्ल्याने घसा व छाती भरल्यासारखी होते. यामुळे जेवण जात नाही.
– कच्ची जांभळे खाऊ नयेत. जांभळे खाताना कीड नसलेली, व्यवस्थित पिकलेली व स्वच्छ धुतलेली खावी.