| | | |

जांभूळ बी मधुमेहींसाठी संजीवनी; जाणून घ्या वापर आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हा आजार असा आहे जो उघड दिसत नाही मात्र माणसाच्या शरीराला आतून पोखरत असतो. एकदा का मधुमेह झाला कि आयुष्यभर त्याची सोबत राहते असे अनेक जण सांगतात. पण मित्रांनो वेळीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले असता मधुमेह काय कोणताही आजार तुमच्या शरीराच्या आसपास देखील येऊ शकत नाही. यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमची जीवनशैली आणि आहार. मधुमेहींना आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण आहारातील काही घटक हे आपल्या शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास सक्षम असतात. तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल आणि जांभळाच्या बियांचे सेवन मधुमेहींच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. हो. तुम्ही बरोबर वाचताय जांभळाच्या बियांचे सेवन हे खरोखरच मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.

जांभळाच्या गरासह त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, लोह, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे जांभळाच्या बिया फेकू नका आणि तुम्ही जर मधुमेहाने ग्रासलेले असाल तर अजिबातच फेकू नका. कारण या बियांमध्ये मधुमेहाशी दोन हात करण्याची क्षमता आहे. याशिवाय कॅन्सर, तोंडातले व्रण, ऍनिमिया, संधिवात, यकृताच्या समस्या अशा अनेक आजारांवर मात करायची असेल तर जांभळाच्या बियांचे चूर्ण फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊयात जांभळाच्या बियांचे चूर्ण कसे बनवायचे आणि कसे वापरायचे? यासह त्याचे फायदेदेखील जाणून घेऊ खालीलप्रमाणे:-

० जांभळाच्या बियांचे चूर्ण बनविण्याची पद्धत – जांभळाच्या बिया गरापासून वेगळ्या करा आणि पाण्याने धुवून एका स्वच्छ कपड्यावर पसरवून उन्हात वाळवा. साधारण ३ ते ४ दिवसांनी वाळलेल्या बियांवरील तपकिरी त्वचा आणि आतून बाहेर आलेले हिरव्या रंगाचे बी काढून पुन्हा २ दिवसांसाठी उन्हात वाळवा. आता वाळलेल्या जांभळाच्या बियांची मिक्सरच्या सहाय्याने बारीक पावडर करा. आवश्यकता असल्यास ही पावडर चाळा वा अशीच हवा बंद डब्यात साठवा.

० वापर – दररोज सकाळी उठल्यानंतर, १ चमचा जांभळाच्या बियांची पावडर १ ग्लास कोमट वा साध्या पाण्यातून रिकाम्या पोटी प्या.

० फायदे –

१) रक्तातील साखरेवर नियंत्रण – मधुमेहींसाठी त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित असणे अत्यंत गरजेचे असते आणि यासाठी जांभळाच्या बिया प्रभावशाली ठरतात. यासाठी कोमट पाण्यातून १ चमचा जांभूळ बीचे चूर्ण रिकाम्या पोटी प्या. आयुर्वेदानुसार जांभळाच्या बिया रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करतात आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. याशिवाय जांभळाच्या बिया स्टार्चचे ऊर्जेत रूपांतर करतात आणि जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे या मधुमेहाच्या लक्षणांची तीव्रता कमी करतात.

२) रक्तदाबावर नियंत्रण – आपल्या शरीराला पीडित करणारी आणखी एक व्याधी म्हणजे रक्तदाबाची समस्या. आजकाल या व्याधीने ग्रासलेल्या लोकांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असालं तर जांभळाच्या बिया तुमच्यासाठीही वरदान ठरू शकतात. कारण जांभळाच्या बियांमध्ये ‘लिकोरिस ऍसिड’ नामक अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळते. जे रक्तदाब पातळीतील सतत होणारे चढ- उतार रोखतात.

३) पचन संस्थेसाठी लाभदायी – जांभळाच्या बिया थंड प्रवृत्तीच्या असल्यामुळे पचनाशी संबंधित अनेक समस्यांवर मात करणे सोप्पे जाते. शिवाय जांभळाच्या बियांमध्ये असणारे फायबर पोट साफ करते आणि बद्धकोष्ठता होऊ देत नाही. याव्यतिरिक्त जुलाब, आमांश, तोंडाचे व्रण, जळजळ आणि आतड्यांतील व्रण या समस्यांवरदेखील जांभळाच्या बिया उपयुक्त ठरतात.

४) ऍनिमियावर मात – जांभळाच्या बियांमध्ये फ्लैवनॉयड्स असते. जे रक्त शुद्ध करून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकतात. परिणामी शरीर डिटॉक्स होते. जांभळाच्या बियांमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे ऍनिमियावर मात करता येते.

५) जांभळाच्या बियांचे इतर फायदे
– जांभळाचे बी लिव्हर आणि ह्दयाला हेल्दी बनवते.
– जांभळाच्या बियांमध्ये आढळणारे कॅल्शियम हाडांना मजबुती देते.
– मुली आणि महिलांमध्ये आढळणाऱ्या PCOS आणि PCOD’मध्ये जांभळाच्या बियांचा फायदा होतो.