Blood Donor Day
| |

जून 14 – जागतिक रक्तदाता दिन; जाणून घ्या रक्तदानाचे महत्व

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आज दिनांक १४ जून. आजचा दिवस अगदी नेहमीप्रमाणे असला तरीही खास आहे. कारण आजचा दिवस संपूर्ण जगात जागतिक रक्तदाता दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस साजरा करण्याचा केवळ एकच उद्देश आहे. तो म्हणजे लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे. कारण रक्तदान हेच श्रेष्ठदान. मात्र तरीही अनेक लोक स्वतः निरोगी असून रक्तदान करण्यास काढता पाय घेतात.  कारण अनेकांना रक्तदानाचे विशेष महत्व ठाऊक नाही आणि यामुळे रक्तदानाबाबत लोकांच्या मनात भीती आहे.

तर आज आपण जाणून घेऊयात कि रक्तदानाचे आपल्या आयुष्यात नेमके काय महत्व आहे.

१) सरासरी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात १० युनिट्स अर्थात ५ ते ६ लीटर इतके रक्त असते. दरम्यान रक्तदान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरातून एका वेळी केवळ १ युनिटच रक्त घेतले जाते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्त कमी होईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही.

२) कित्येकदा वाहनांच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असते. अश्या वेळी कधी कधी खूप रक्त वाहिल्याने या व्यक्तीला १०० युनिट रक्ताची आवश्यकता असते.  त्यामुळे आपण दान केलेले १ युनिट देखील त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी ठरू शकते, म्हणून रक्तदान करणे आवश्यक आहे.

३) रक्तदानामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया अनंत काळासाठी सुरळीत राहते. शिवाय आयुष्यात केवळ एकदा रक्तदान करून ३ लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात.

४) ‘ओ निगेटिव्ह’ हा ‘रक्तगट’ युनिव्हर्सल असल्यामुळे या रक्तगटाचे व्यक्ती कोणत्याही अन्य रक्तगटाच्या व्यक्तीस रक्तदान करून त्याचा जीव वाचवू शकते. यामुळे ‘ओ निगेटिव्ह’ रक्तदात्याला ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. मुख्य म्हणजे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी हा रक्तगट अत्यंत मदतयुक्त आहे. मात्र भारतात फक्त ७ टक्के लोकांचाच रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ आहे.

५) रक्तदानाची प्रक्रिया फार गंभीर नसते. ती अगदी सरळ आणि सोपी असल्यामुळे रक्तदात्यास सामान्यत: रक्तदान करतेवेळी कोणतीही अडचण येत नाही.

६) ज्याचे वय १८ ते ६० वर्ष आहे, अशी कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. मात्र आपणास कोठेही आजारपण दीर्घ काळ राहून गेले असल्यास रक्तदान करू नये. शिवाय जर कधी रक्तदान केल्यावर आपल्याला चक्कर येणे, घाम येणे, वजन कमी होणे किंवा इतर कोणतीही समस्या जाणवली असेल तर आपण रक्तदान करू नये.

७) रक्तदात्याचे वजन, पल्स रेट (हृदयाचे ठोके), रक्तदाब, शरीराचे तापमान याची तपासणी केल्यानंतर जर हे सामान्य असेल तरच डॉक्टर किंवा रक्तदान कार्यसंघ सदस्य आपले रक्त घेतात.

८) सर्वसामान्यपणे पुरुष ३ महिन्याच्या आणि महिला ४ महिन्याच्या अंतराने नियमितपणे रक्तदान करू शकतात.

लक्षात ठेवा – हे खरं आहे कि, प्रत्येकजण रक्तदान करू शकत नाही. आपण निरोगी असाल तरच रक्तदान करू शकता. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपला एक जीव अन्य जीवांना जगण्यासाठी आशेचा एक किरण देऊ शकतो.