| | |

फक्त काही वेळाची शतपावली ठरू शकते हितवर्धक; कशी ते त्वरित जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकजण अख्खा दिवस होणाऱ्या दगदगीमुळे अत्यंत थकून जातात. कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या शरीरातील त्राण पुरते निघून गेलेले असतात. यामुळे एकदा का रात्रीचे जेवण उरकले कि ही मंडळी थेट अंथरुणाची वाट धरतात आणि कधी गुडूप होतात तेच कळत नाही. खरंतर दिवसभराच्या थकव्याने डोळ्यावर झोप येणे अत्यंत साहजिक आहे. मात्र रात्री जेवणानंतर अंथरुणात घोरत पडणे शरीरासाठी अत्यंत त्रासदायक असते. याचे अनेक गंभीर परिणाम आपल्या शरीरास भोगावे लागू शकतात. त्यामुळे रात्री जेवल्यानंतर अगदी काहीच वेळात आटोपणारी शतपावली करणे हे शारीरिक स्वास्थ्यदृष्ट्या अत्यंत गरजेचे आहे. अत्यंत गरजेचे म्हणण्याचे कारण हे कि शतपावलीमूळे अनेक हितवर्धक फायदे होतात. हे फायदे कोणते..? असा प्रश्न पडला असेल तर पुढे वाचून ते जाणून घ्या.

मुख्य म्हणजे शतपावली हि रात्रीच्या जेवणानंतरच केली जाते. दिवसभराच्या विविध शारीरिक क्रियांनंतर रात्रीचे जेवण शक्यतो हलकेच असावे. यानंतर १० ते १५ मिनिटांत उरकणारी शतपावली अर्थात चालणे अत्यंत गरजेचे आहे. याचे मुख्य कारण असे कि रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ चालल्याने आपल्याकडून खाल्ले गेलेले अन्न योग्यरीत्या पचते. ज्यामुळे पित्त वा गॅस यांचा त्रास उदभवत नाही. जेवल्यानंतर चालल्यास पचनक्रियेत देखील सुधारणा होते. यामुळे पोटदुखी, आम्ल्पित्त, कफ आणि जळजळ होणे यांसारख्या तक्रारी जाणवत नाहीत. परिणामी शरीरास आवश्यक असलेली गहननिद्रा अर्थात चांगली झोप प्राप्त होते.

या व्यतिरिक्त रात्री जेवल्यानंतर नियमित थोडा वेळ चालल्याने मेटाबॉलिजम रेटदेखील सुधारतो. ज्याचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात फिटनेस आणि डाएटवर सखोल प्रभाव पडून शारीरिक फायदा होतो. शिवाय शतपावलीमुळे मन ताजेतवाने होते, मनातील वाईट विचारांचे प्रमाण कमी होते आणि रात्री स्वप्नविरहित निवांत झोप येते. मुख्य म्हणजे शतपावली करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडलेच पाहिजे, असे कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाही. त्यामुळे तुमच्या घराची गॅलरी, टेरेस किंवा अगदी अंगणातही तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे आरामात चालू शकता. सगळ्यात महत्वाची बाब अशी कि शतपावली करतेवेळी फोनवर बोलणे टाळले पाहिजे. कारण यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये वाढ होऊन धाप लागण्याची शक्यता असते. शिवाय यातून दम्याचा त्रासही संभवतो.