| |

डिप्रेशन’ला ठेवा दूर कारण, जिंदगी अभी बाकी है मेरे दोस्त। जाणून घ्या खास टिप्स

हॅलो आरोग्य ऑनलाईन। Depression- डिप्रेशन म्हणजे नैराश्य. यात सगळं काही आवडेनासं होत. कुणाची साथ नको, एकटं राहावं वाटतं. बैचेन झाल्यासारखं होतं. आयुष्य सुरळीत चालू आहे. मात्र तरीही जगण्यात राम नाही आणि याचं कारणही कळत नाही. फक्त एवढंच कळतं की, काहीच चांगलं नाही. अशावेळी काय करावं आणि काय करू नये अशी काहीशी आपली परिस्थिती होते. या परिस्थितीमुळे अनेकजण मृत्यूला जवळ करतात. मात्र नैराश्यामुळे आयुष्य संपवणे हा पर्याय मुळीच नाही. त्यापेक्षा करण्यासारख्या अश्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या स्थितीपासून लांब ठेवतील आणि कालांतराने तुम्ही तुमचे आयुष्य पुन्हा आपल्या मर्जीप्रमाणे आनंदात जगू शकाल. चला तर जाणून घेऊयात अश्या काय गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे नैराश्यापासून सुटका मिळू शकते.

१) आवडीच्या गोष्टींची यादी करा.
– एखादी डायरी,पेन घेऊन तुम्हाला जे जे आवडत त्याची लहान मोठी जशी असेल तशी लिस्ट बनवा. यामध्ये तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे अश्या सगळ्या लोकांची नाव लिहा. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी लिहून काढा. तुमच्या खाण्याच्या आवडी, कपड्यांची पसंत आणि आवडते छंद सगळं काही लिहून घ्या. या लिस्टला मर्यादा घालू नका. स्वतःला थांबवू नका, फक्त लिहीत जा. शेवटी तुम्हालाच कळेल की, आनंदी होण्याकरिता तुमच्याकडे खूप पर्याय आहेत. मग उदास का राहायचं? उलट मस्त जगायचं.

२) नकारात्मक ते सकारात्मक व्हा.
– जेव्हा नैराश्य ग्रासते तेव्हा सगळ्यावरून मन उडून जातं. या स्थितीत नेहमी घरी बसून रहावं वाटत. काहीही करू नये, एकट कुठेतरी गप्प बसून राहावं वाटत. पण तुम्हाला या सर्व नकारात्मक गोष्टींच्या अगदी उलट सकारात्मक वागायचं आहे. जेव्हा वाटेल, अंगात त्राण नाही, तेव्हा एखादा खेळ खेळा, स्वयंपाकात नवीन काहीतरी ट्राय करा. जेव्हा घरी बसून टीव्ही बघावा वाटेल, तेव्हा काहीतरी मस्त प्लॅन करा. शॉपिंग, मूव्ही, भटकंती यापैकी काहीही करा पण मन सांगेल तसं उदास, एकटं राहू नका. उलट मित्र मैत्रिणींशी दिलखुलास गप्पा मारा. मुळात नैराश्यावर रामबाण आपण स्वतःच असतो फक्त खडबडून जागं होण्याची गरज असते.

३) नाचा, गाणे गा, मस्त मज्जा धुडघूस घाला.
– जेव्हा वाटेल, काहीचं चांगलं नाही. तेव्हा शारिरीक हालचाल करणे गरजेचे आहे. म्हणजे मरगळ जाईल. मग वाट कशाची पाहायची टीव्ही का व्हॉल्युम उसको तेज पसंत है, बेबी को बेस पसंद है। अर्थात कोणत्याही तुमच्या आवडत्या गाण्यावर झिंगाट नाचा आणि हे शक्य नसेल तर काळजी करू नका. रोज सकाळी फ्रेश वातावरणात फिरायला जा. योगा करा. व्यायाम करा. नाहीतर सगळ्यात बेस्ट झुंबा क्लासला जा. नवीन मित्र, मैत्रिणी बनवा आणि त्यांच्यासोबत मनसोक्त नाचा, गाणे गा. मज्जा करा. कारण जेव्हा मनाचे दरवाजे उघडतात तेव्हा जगण्याचा छंद जडतो.

४) जे कधीच केलं नाही ते आज करा.
– काही सुचत नसेल, आपण काहीच करू शकत नाही असे वाटत असेल तर सोप्पा उपाय म्हणजे, जे आजपर्यंत जमणार नाही, मी कसं करू? असे प्रश्न आणि शंका उपस्थित करत होते तेच काम हातात घ्या. होत नाही तोपर्यंत करा. कारण, प्रयत्नांती परमेश्वर. मॅच आवडत नाही मग बघा. नाचला नाही तर नाचा. गायला नसाल तर गा. जंगल सफारी, फोटोग्राफी, वनपीस, अश्या सगळ्या गोष्टी करा ज्या तुम्हाला कोणीतरी किंवा तुम्ही स्वतःला करण्यावाचून रोखले आहात.

५) थोडं क्रिएटीव्ह व्हा.
– जेव्हा मन अस्वस्थ असेल, काय करू कळत नसेल तेव्हा, मनात नसलं तरीही इमॅजिनेशन आणि क्रिएटीव्हीटीकडे एक पाऊल उचला. यामुळे तुम्ही उत्साही व्हाल. काहीतरी कविता- गोष्ट- लेख- संवाद लिहा. क्राफ्टींग करा. जुन्या नव्या रेसिपीजचे कॉम्बिनेशन करा. घरात काही बदल करा. पण तुमच्यातील क्रिएटीव्हीटीला जागृत करा. मग बघा एकदा मन रमलं कि त्याला वाईट विचार करायला वेळच मिळणार नाही.

६) सुंदर कल्पना करा आणि स्वप्नांमध्ये हरवून जा.
– स्वप्न उत्सुकतेने घडवणे आणि पाहणे हेच खरे आयुष्य. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळं संपलं तेव्हा तुम्ही पाहिलेली स्वप्न आठवा. कारण स्वप्नं कधीच शांतपणे झोपू देत नाहीत. ती स्वप्नं पुन्हा पुन्हा पडतात, सत्य दाखवतात, वास्तवाची ओळख करून जिद्दीने उभे राहण्याची ताकद देतात. त्यामुळे विचार करा आणि कोणती स्वप्नं तुम्हाला पूर्ण करता येतील त्यांच्यामागे लागा आणि नैराश्याला लाथ मारून मोकळे व्हा.

७) निसर्गात रमून जा.
– निर्सगाच्या सानिध्यात प्रत्येक समस्येचे समाधान असते. त्यामुळे जर काय करायचं कळत नसेल तर थेट ‘बॅग भरो और निकल पडो’. अगदी दूर जाणे शक्य नसले तरी एखाद्या समुद्रकिनारी जाऊन अनवाणी चालून पहा, नदी किनारी जाऊन थोडा वेळ घालवा, वाळूत पाय घट्ट रोवून लाटांसोबत खेळा. हिरव्या हिरव्या गवतावर निपचित पडून बागेतील फुलांचे सौंदर्य न्याहाळा, आकाशात उंचावर विहार करणाऱ्या पक्षांच्या थव्याकडे पहा. हे सारं काही अनुभवा मग पहा जगण्याची दुसरी बाजू कशी समोर येते ज्यावर तुम्ही अतोनात प्रेम करू शकता.

८) नाय, नो, नेव्हर विसरुन जा.
– जेव्हा आपल्याला काही आवडत नाही, तेव्हा आपण नेहमी म्हणतो नाही, नको किंवा एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर आधीच आपण पळ काढू पाहतो आणि नकार घंटा वाजवू लागतो. हा ना ना चा पाढा विसरून जा. प्रत्येक वेळी मला नाही जमणार, मला नाही येत, ते नको, मला सुख नाही, मला आनंदच मिळत नाही, सगळं वाईट आहे, मला काहीच आवडत नाही, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. या सगळ्या शब्दांकडे दुर्लक्ष करा. आत्तापासूनच नाय, नो, नेव्हरची नकार भाषा वाचणे आणि बोलणे वगळून टाका. मग बघा, जिंदगी क्या चीज है।

९) स्वीकार करा.
– जर परिस्थितीत बदलणे शक्य नसेल तर मनःस्थिती बदला. अर्थात आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा. नेहमी परिस्थितीला बोल लावण्यापेक्षा आहे ते चांगलं आहे पण त्याहूनही सुंदर मी बनवेन असा विचार करा. जी आहे तशी परिस्थिती स्वीकारा आणि नैराश्यापासून स्वतःची सुटका करा. परिस्थितीला आपलंस कराल तर आनंदी राहण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही.

१०) चेकअप करून घ्या.
– वरील कोणत्याही गोष्टींमुळे काही फरक जाणवला नाही तर ही समस्या मुळापासून गंभीर असू शकते. कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे, कशाचीच ईच्छा न होणे, थकल्यासारखे वाटणे, निरूत्साही वाटणे ही सारी नैराश्याची मुख्य आणि गंभीर लक्षणं आहेत. त्यामुळे वेळीच चेकअप करून औषधं घ्या, चुकवू नका आणि मुख्य म्हणजे मेडिटेशन करा. यात काहीच वाईट नाही. त्यामुळे नैराश्यापासून लवकरात लवकर सुटका होते. नैराश्य मानवी जीवनाला लागलेली कीड आहे त्यामुळे ती लवकर मुळापासून उपटून टाकणे महत्वाचे आहे. म्हणून, वेळीच लक्ष द्या आणि दुर्लक्ष करू नका.