Food In Fridge
| |

शिळे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवताय..? तर ‘या’ बाबींचे पालन जरूर करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दगदगीच्या आयुष्यात प्रत्येक लहान गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ तरी कुणाकडे आहे..? अशीच काहीशी गत प्रत्येकाची झाली आहे. त्यामुळे विविध आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जीवन सोयीस्कर करण्याच्या मागे आपण धावत आहोत. आता पहा ना.. आजकाल सर्रास प्रत्येकाच्या घरात मिक्सर, वॉशिंग मशीन आणि फ्रीज या वस्तू दिसतात. त्यामुळे रात्री जेवण उरलं कि साहजिकच फ्रिजमध्ये ठेवले जाते.

अनेकदा हे जेवण फ्रिजमध्ये ठेवून आपण विसरून जातो आणि लक्षात येत तेव्हा खातो. पण मित्रांनो हि सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. तुम्हाला माहीत आहे का फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न किती तास फ्रेश राहतं आणि किती वेळानंतर ते खाऊ नये…? नाही ना..? म्हणूनच आज या प्रश्नांची उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत.

१) फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाहेर काढल्यावर लगेच खाऊ नये. तसेच हे अन्न फ्रिजमधून काढून लगेच गॅसवर तापवू नये आणि गरम न करता खाऊही नये. फ्रिजमधून पदार्थ बाहेर काढल्यानंतर २० मिनिटांनी सामान्य तापमानाला आल्यावर गरम करा आणि खा.

२) गव्हाची चपाती वा मैद्याचा पराठा फ्रीजमध्ये ठेवल्यास एका दिवसात खा. कारण एका दिवसापेक्षा जास्त वेळ हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक मूल्य खराब होते आणि यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात.

३) डाळ आणि कडधान्यांची उसळ फ्रीजमध्ये ठेवल्यास २ दिवसात खा. कारण दोन दिवसानंतर यामध्ये गॅस निर्माण होतो. ज्यामुळे अपचनाच्या समस्या होतात.

४) फ्रीजमध्ये शिळा भात ठेवल्यास दोन दिवसात संपवा. कारण त्यानंतर हा भात पोटाच्या विविध समस्या निर्माण करू शकतो.

५) कापलेली वा चिरलेली फळे फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर ती काही तासांमध्ये संपवा. कारण फळ कापल्यानंतर ते फ्रीजमधील वातावरणाच्या संपर्कात आल्याने लवकर खराब होते.

Fruits

६) फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, फळं आणि भाज्या जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी कच्चे फळ वा भाज्यांसोबत शिजवलेल्या भाज्या, दूध असे पदार्थ ठेवू नका. कारण कच्चे फळ आणि भाज्यांवरील जंतू शिजलेल्या पदार्थांना दूषित करतात.

Vegetables

७) फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या एका ठराविक काळासाठी स्टोअर करा. कारण प्रत्येक फळ आणि भाजीचा टिकण्याचा एक ठराविक कालावधी असतो. त्यानंतर हे पदार्थ स्वतः तरी खराब होतात. नाहीतर इतर पदार्थ दूषित करतात.