|

बाळाची चाहूल कशी ओळखालं?; जाणून घ्या गर्भधारणेची प्रमुख लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आईपणाची स्थिती अत्यंत आनंददायी असते. कारण आई होणे हा अनुभव एक भावना आहे आणि हि भावना आयुष्य बदलणारी आहे. त्यामुळे स्त्रीसोबत तिचे सारे कुटुंब या स्थितीशी जोडलेले असते. जेव्हा स्त्रीला आपण आई होणार आहोत याची सूचना मिळते तेव्हा तिच्या आनंदाची सीमा मोजता येईल इतकी लहान नसते. पण मैत्रिणींनो आईपण काही सोपं नाही हा! कारण यासोबत स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. हे सर्व बदल तिला मान्य करून आपला गर्भ वाढवायचा असतो. यात प्रामुख्याने मासिक पाळी न येणे हि स्थिती निश्चित गरोदर असल्याचा मूळ संकेत आहे. पण याशिवाय आणखी असे बरेच संकेत आहे ताजे स्त्रियांनी समजून घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात गरोदरपणाची प्रमुख लक्षणे कोणती ते खालीलप्रमाणे:-

० गरोदरपणाची प्रथम प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे:-

१) मासिक पाळी न येणे – मासिक पाळी न येणे वा थांबणे ह्याला गरोदरपणाचे मुख्य आणि प्रथम संकेत मानले जाते. जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तेव्हा तिच्या शरीरात प्रोजेस्टोरेन हार्मोन तयार होतात. ज्यामुळे मासिक पाळी थांबते.

२) सारखी लघवी येणे – शरीरातील प्रोजेस्टोरेन हार्मोनचा स्तर वाढल्यास गर्भवती स्त्रीला पहिल्या महिन्यात सारखी लघवी लागण्याची समस्या होते.

३) स्तन दुखणे/ कळ येणे – गर्भ धारण केल्यास महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलाव होतात. यामुळे पहिल्या महिन्यात स्तन दुखणे सुरू होते. यासह स्तन टाईट होणे तर काही महिलांच्या स्तनावर नसा दिसणे आणि काही महिन्यानंतर स्तनांचा आकार बदलणे अशीही लक्षणे दिसतात.

४) निप्पलचा रंग बदलणे – गर्भ धारण झाल्यास स्तनाच्या निप्पलवर अनेक बदल दिसतात. हार्मोनमधील बदलामुळे मेलानोसाइट्स प्रभावित होतात. ज्यात त्वचेचा रंग प्रभावित करणाऱ्या मेलेनिनचे उत्पादन होते आणि यामुळे निप्पलचा रंग आधीपेक्षा गडद होतो.

५) शारीरिक थकवा येणे – गर्भवती स्त्रीचे शरीर खूप लवकर थकते. अगदी काहीही काम न करता तिला थकवा येतो आणि शरीरात सुस्ती व ऊर्जेची कमतरता जाणवते.

६) मूड स्विंग – मूड स्विंग हे गर्भावस्थेतील एक प्रमुख लक्षण आहे. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात हार्मोन्स गतीने बदलतात. यामुळे अनेक स्त्रियांचा मूड सतत बदलतो. यात लहानसहान गोष्टींवर चिडचिड करणे, कधी खूप आनंदी होणे, कधी अतिशय भावनिक होऊन अगदी रडणे इत्यादी लक्षणे दिसतात.

७) छातीत जळजळ – गर्भवती स्त्रीला छातीत जळजळ होण्याची समस्या त्रास देते. पण या अवस्थेत ही सामान्य बाब आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु जर छातीत अधिकच जळजळ जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

८) अचानक भूक वाढणे – गरोदर स्त्रीमधील हार्मोन्स झपाट्याने बदलल्यामुळे तिला परत परत भूक लागते. शिवाय त्या स्त्रीची खाण्यापिण्यामधील आवड देखील बदलते. बहुतेकदा जी गोष्ट तिला आधी खायला आवडत नसे तोच पदार्थ ती मागून खाऊ लागते.

९) रक्तस्त्राव आणि शरीरात आकसणे – गर्भाशयात गर्भ तयार होतो तेव्हा महिलेला हलका रक्तस्राव होण्याची शक्यता असते. यासोबतच शरीर संपूर्ण आकसते. हे लक्षण गर्भधारणेच्या एक आठवड्यानंतर दिसणारे आहे. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्यास लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा कारण यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढते.

० गर्भधारणा ओळखण्याचा खात्रीशीर पर्याय
– जर वरील लक्षणे आपल्याला दिसत असतील आणि गरोदरपणाची संपूर्ण खात्री करून घ्यायची असेल तर आपण घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट किटच्या मदतीने खात्री करू शकता. आजकाल बाजारात सहज मेडिकलमध्ये अनेक प्रेग्नेंसी टेस्ट किट उपलब्ध आहेत. ज्यांच्या सहाय्याने स्वतः घरच्या घरी गरोदरपणाची तपासणी करता येते.
* यासाठी सकाळच्या पहिल्या लघवीतील काही थेंब टेस्ट किट मध्ये टाकून तपासणी करता येते.