|

केसांच्या आरोग्यासाठी मदतयुक्त शिळा भात; कसा ते लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले केस निरोगी, काळेभोर आणि लांबसडक असावेत असं प्रत्येक महिलेला वाटत असते. मात्र बदलती जीवनशैली, अवेळी आहार आणि प्रदूषणामुळे केसांचे योग्य पद्धतीने पालन पोषण करणे अतिशय अवघड झाले आहे. शिवाय अनेक स्त्रिया केसांच्या सौंदर्यासाठी बाजारात मिळणारे विविध केमिकलयुक्त सिरम किंवा शाम्पू वापरतात याचाही केसांवर दुष्परिणाम देखील होतात. यामुळे अनेक महिला घरगुती उपायांवर भर देताना दिसतात.

आपण दररोज जेवणामध्ये भाताचा समावेश करतो. कधी कधी भात उरतो आणि मग बरेच जण तो फेकून देतात. तुम्हीही असेच करत असाल तर आजपासून उरलेला भात फेकणे एकदम बंद. कारण भाताचा वापर करून तुम्ही केसांना केरेटीन ट्रीटमेंट देऊ शकता. होय. तांदळामध्ये व्हिटॅमीन सी आणि व्हिटॅमीन ई शिवाय प्रोटीनदेखील असते. यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात. खरंतर केरेटिन हि एक पार्लर ट्रीटमेंट आहे. या ट्रीटमेंटने केसाचे आरोग्य सुधारते. मात्र हि ट्रीटमेंट अतिशय महाग असते. जी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला शिळ्या भाताचा वापर करून केरेटिन ट्रीटमेंट घरच्या घरी कशी करायची हे सांगणार आहोत

याकरिता साधारण मोठे ३ ते ४ चमचे शिजलेला भात घ्या. त्यात २ ते ३ चमचे दूध, बदाम किंवा घरात उपलब्ध असणारे कोणतेही तेल, एका मध्यम अंड्याचा सफेद भाग आणि १ ते २ चमचे दही घ्या. सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात उरलेला भात घेऊन त्यात दूध मिसळून हाताने हा भात मऊ करून घ्या. त्यानंतर अंड्याचा सफेद भाग आणि दही घालून या मिश्रणाची पेस्ट बनवा. पुढे यात बदामाचे तेल घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. पुढे केसांमध्ये भांग पाडून छोटे छोटे भाग बनवून केसांवर ही पेस्ट लावा.

ही पेस्ट लावताना केस मोकळे सोडा. यानंतर ४५ ते ५५ मिनिटांनी केस कोमट पाण्याने धुवून टाका. केस धुताना शाम्पूचा वापर करू नका. शक्य असेल तर दुसर्‍या दिवशी किंवा केस धुवून झाल्यावर एक तासानंतर केसांना पुन्हा एकदा सौम्य शाम्पूचा वापर करून धुवा मात्र त्यानंतर केसांना तेल लावू नका. या मास्कमुळे केस मऊ, चमकदार आणि अगदी सरळ होतात. आठवड्यातून किमान एकदा हा मास्क लावला तर तुम्हाला हेअर ट्रीटमेंटसाठी कोणत्याही महागड्या ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरजच भासणार नाही.

* लक्षात ठेवा : हा मास्क फक्त धुतलेलल्या केसांवरच लावायचा आहे.