| |

चविष्ट सीताफळ खाण्याचे फायदे तितकेच तोटे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता थंडीचे दिवस जवळ येऊ लागले आहेत आणि हिवाळ्याच्या थंडीत सीताफळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. बाहेरून हिरवा आणि आतून पांढरा रंग असणारे हे फळ चवीला अत्यंत चविष्ट असते. याशिवाय सीताफळ हे एक पौष्टिक फळदेखील आहे. कारण सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्र्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नसíगक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार, सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे.

परंतु मित्रांनो, सीताफळ कितीही आरोग्यदायी असले तरीही कुठे ना कुठे याचे थोडेफार का होईना तोटे आहेतच. अनेकदा असे होते कि एखाद्या पदार्थाबाबत व फळाबाबत अर्धी माहिती असल्यामुळे आपल्या आरोग्यात बिघाड होतो. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत कि सीताफळ खाण्याचे मुख्य फायदे आणि तोटे काय आहेत? खालीलप्रमाणे:-

० सीताफळाचे फायदे

१) सीताफळात अनेक अँटीऑक्सीडेंट असतात. एसिमिसीन आणि बुलाटासिस नावाचे अँटीऑक्सीडेंट सीताफळात असल्यामुळे हे कँन्सर विरोधी गुणधर्मयुक्त फळ आहे. हे अँटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला प्रदूषणापासून लढण्यास मदत करतात.

२) दररोज १ सीताफळ खाल्ल्यामुळे १०% पोटॅशिअम आणि ६% मॅग्निशिअम शरीराला मिळते. हे दोन्ही घटक रक्तवाहिन्या योग्यरित्या काम करण्यास मदत करतात. तसेच सीताफळ हदयरोगापासून संरक्षण करते.

३) सीताफळ फायबरचा एक चांगला स्रोत आहे. शिवाय यामध्ये सोल्यूएबल आणि इनसोल्यूएबल हे दोन्ही फायबर घटक समाविष्ट आहेत. जे पचनप्रणालीत सुधार करण्यासाठी मदत होते. यामुळे बद्धकोष्ठत्यापासूनही आराम मिळतो.

४) ज्यांच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील वा घाबरल्यासारखे वाटत असेल, छातीत धडधडणे, दडपण येणे अशी लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे.

० सीताफळाचे तोटे

१) सीताफळामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. त्यामुळे जास्त सीताफळ खाल्ल्यास आतड्यात सूज येऊ शकते. तसेच फायबर जास्त असल्यामुळे जुलाब आणि उलट्या अश्या समस्या होऊ शकतात.

२) सीताफळाच्या बिया अत्यंत विषारी असतात. त्यामुळे या त्वचा आणि डोळ्यांसाठी वाईट असतात. अभ्यासानुसार, सीताफळाच्या बियांची पावडर त्वचेवर वापरल्यामुळे वेदना आणि लाल चट्टे या समस्या उदभवतात. तसेच गंभीर डोळ्यांची समस्या होऊ शकते.

३) सीताफळात खूप कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू शकते. तसेच यात साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते जास्त खाऊ नका. मधुमेहींनी सीताफळ खाल्ल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

४) ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. कारण अश्या आजारांत सीताफळ खाल्ल्यास घश्याच्या ग्रंथींना सूज येऊ शकते.

० खाण्यायोग्य सीताफळ कसे निवडावे?
– जेव्हा सीताफळ खाण्यासाठी निवडायचे असेल तेव्हा असे फळ निवडा की जे जास्त नरम नसेल. जसे कि, काही फळे खूपच जास्त पिकलेली किंवा काळी पडलेली असतात. अशी फळे घेऊ नका. तसेच खाण्यासाठी समान रंगाचे सीताफळ निवडा.