| |

हातापायाला मुंग्या येतात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे आपले पाय वा हात सुन्न होतात. आपल्याला आपल्याच शरीराचे भाग जाणवेनासे होतात. या स्थितीला सर्वसाधारण भाषेत आपण मुंग्या येणे असे म्हणतो. तर वैज्ञानिक भाषेत पॅराथिसिया असे म्हणतात. काळ आपण या समस्येची प्रमुख कारणे आणि लक्षणे जाणून घेतली. यानंतर आज आपण या त्रासावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे उपाय तुम्हाला दैनंदिन जीवनात या समस्येपासून आपले संरक्षण करण्यास सहाय्य करतील.

० मुंग्या येऊ नये यासाठी घरगुती उपाय – जर तुम्हाला सतत मुंग्या येण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खाली दिलेले सोपे आणि घरगुती उपाय नक्की करून पहा. यामुळे नक्कीच काही प्रमाणात बरे वाटण्यास मदत मिळेल. चला जाणून घेऊया

१) शारीरिक हालचाल – आपल्या शरीराची पुरेशी हालचाल नसेल तर निश्चितच आपले शरीर एकाच ठिकाणी स्थिरावल्यास जड होते. परिणामी मुंग्या येण्याची समस्या उदभवते आणि कालांतराने बळावते. त्यामुळे शारीरिक हालचाल ही कोणासाठीही नेहमीच चांगली आहे. त्यामुळे ऑफिस असो वा घर काम बैठे असेल तर शक्य असेल तेव्हा उठून थोडे चाला म्हणजे तुम्हाला बरे वाटेल आणि मुंग्या येणार नाही.

२) लसूण – लसूण आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे उपाशी पोटी लसणीच्या २-३ पाकळ्या चावून किंवा चघळून खाल्ल्यास शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळेल. परिणामी मुंग्या येण्याची समस्या दूर होईल.

३) पिंपळाची पाने – पिंपळाच्या पानामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट घटक असतात. जे मुंग्या येण्यावर उत्तम इलाज आहेत. यासाठी पिंपळाचा अर्क काढून आवडीच्या तेलात मिसळून उकळा. हे तेल मुंग्या येणाऱ्या भागावर लावा आणि आराम मिळवा.

४) खोबरेल तेल – रात्री झोपताना खोबरेल तेलाने हातापायांचा मसाज केल्यास रक्तपुरवठा सुरळीत होतो. यामुळे खोबरेल तेलाचा मसाज केल्यास मुंग्या येण्याचा त्रास होत नाही.

५) गरम पाण्याचा शेक – गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे स्नायूंमधील नसा मोकळ्या होतात. तसेच रक्तपुरवठा खंडीत झाला असेल तर तो सुरळीत होतो. यामुळे एखादी गरम पाण्याची पिशवी घेऊन तुम्हाला मुंग्या येत असलेल्या ठिकाणी साधारण ५-१० मिनिटं शेक द्या. यामुळे मुंग्या येण्याचा त्रास कमी होईल.

६) दालचिनी पावडर – दालचिनी पावडरमध्ये पोटॅशिअम आणि मॅगनीज असते. ज्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो. परिणामी मुंग्या येण्याचा त्रास दूर होतो. यासाठी १ ग्लास गरम पाण्यात चमचाभर दालचिनी पावडर घ्या आणि याचे सेवन करा.

७) तूप – मुंग्या येण्याच्या त्रासावर तूप गरम करुन मसाज करा. यामुळे हा त्रासही दूर होईल आणि झोपही शांत लागेल.