|

रिकाम्यापोटी राहणे करू शकते आरोग्याचे नुकसान; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बऱ्याच वेळा आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो कि भूक काय साधी तहानही जाणवत नाही. पण या कामाच्या नादात आपण आपले आरोग्य विसरतो आणि मग याचा गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागतो. अनेकदा काही लोक गडबडीत न खाता पिता थेट कामावर किंवा अन्य कार्यासाठी निघून जातात. यानंतर थोड्या वेळाने त्यांना जोरात भूक लागते आणि कामात असल्यामुळे त्यांचे खाणेही होत नाही. याचा परिणाम थेट त्यांच्या शारीरिक आरोग्यावर होत असते. यामुळे जर तुम्हीही बराचवेळ भूक मारून रिकाम्या पोटी काम करत असाल तर आताच सावध व्हा. जाणून घ्या परिणाम:-

१) अस्वस्थता/ अस्थिरता जाणवणे – काही लोकांना भूक सहन होत नाही आणि हे असे लोक बराच वेळ उपाशी राहिले तर त्यांना सतत भूक लागत असल्याची जाणीव होत असते. शिवाय काही ही न खाल्ल्याने त्यांना अस्वस्थता जाणवते, कामातील मन उडते. मळमळु लागते. कधीकधी उलटी सुद्धा होते. म्हणून घरातून नेहमी काहीतरी खाऊनच बाहेर पडावे.

२) उष्माघाताचा त्रास – बराचवेळ पोट रिकामी राहिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शरीराचा दाह साहवेना होतो आणि उष्माघाताचा त्रास संभवतो. इतकेच नव्हे तर काही लोकांना या उष्माघातामुळे आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती आहे.

३) शुद्ध हरपणे/ बेशुद्ध पडणे – रिकाम्यापोटी शारीरिक क्षमतेहून अधिक काम केल्यास शारीरिक थकवा वा अशक्तपणा येतो आणि माणूस बेशुद्ध पडतो. अशा परिस्थितीत शरीराला फायबर आणि कार्ब्सची अत्यंत आवश्यकता असते.

४ ) ऍसिडिटी – अधिक काळ उपाशी राहिल्यामुळे पोटात गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. ही समस्या जास्त झाल्यास हृदयावर त्याचा गंभीर प्रभाव पडतो. म्हणून अधिक काळ पोट रिकामी राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

५) रक्तातील साखर कमी होणे – बराच वेळ उपाशी राहिल्याने आपले शरीर थकून जाते. यामुळे शरीर थरथरणे किंवा अंगातील त्राण निघून जाणे असे काहीसे जाणवू लागते. याचाच अर्थ आपल्या शरीरातील साखरेची पातळी असंतुलित होत आहे.

६) रक्तदाब कमी होणे – बराच काळ रिकाम्या पोटी असल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. अनेकांना पाणी पिऊन भूक भागवण्याची सवय असते. मात्र शरीरास पाण्यासह कॅलरीचीदेखील गरज असते. यामुळे केवळ पाणी पिणे हा पर्याय नसून सोबत काहीतरी हलके खाणे गरजेचे आहे.