Idli
| | |

सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी बनवा बेसन रवा इडली; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी किती आवश्यक असतो. मात्र याचसोबत हा नाश्ता कसा हवा? तर हेल्दी आणि टेस्टी. यासाठी आपण बरेच पदार्थ अगदी चवीने आणि आवडीने खातो. पण प्रत्येक पदार्थ बनवायला काही विशिष्ट वेळ जातो आणि आजकालच्या महिला घरासोबत ऑफिसचे कामदेखील अव्वलरित्या सांभाळतात. मात्र यामुळे त्यांच्या वेळेला कुठेतरी उन्नीस बीस व्हावं लागत. अशावेळी जर सकाळच्या गडबडीत त्यांचा थोडासा वेळ वाचला तर? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा एका नाश्त्याच्या पदार्थांविषयी सांगणार आहोत. जो खायला चविष्ट आणि आरोग्यासाठी पौष्टिक आहे. या पदार्थाचे नाव आहे बेसन रवा इडली.

– इडली दाक्षिणात्य पदार्थ जरी असला तरी तो आपल्या आहाराचा एक मुख्य घटक आहे. याचे कारण म्हणजे इडली पचायला हलकी आणि चवीबरोबर तब्येतीसाठीही उत्तम असते. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही इडली खाणे फायद्याचे आहे. पण आज आपण नेहमीच्या इडलीपेक्षा वेगळी आणि तितकीच पौष्टीक असणाऱ्या बेसनच्या इडलीची रेसिपी जाणून घेणार आहोत. हि इडली बनवताना फार वेळही लागत नाही आणि आरोग्याचे नुकसानही होत नाही. त्यामुळे टेन्शनची बातच नाही. बिंदास बनवा आणि भरपूर खा. जाणून घेऊया साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० साहीत्य –
१/२ कप बारीक रवा,
१ कप बेसन,
१/२ कप दही,
१/२ टीस्पून मीठ,
१/४ चमचा हळद पाऊडर,
१ चमचा मोहरी,
८ ते १० कढीपत्त्याची पाने,
१/४ चमचा जीरा पूड,
१ चमचा नारळाचा चव,
२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ,
मीठ चवीनुसार,
तेल गरजेनुसार.

० कृती – सर्वप्रथम एका पातेल्यात रवा, बेसन, हळद , मीठ आणि दही घेऊन याचे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. आता यात थोडे पाणी टाकून इडलीचे पीठ तयार करा. हे पीठ साधारण २० मिनिटे ठेवा. यानंतर इडली पात्रात इडली बनवा.
इडली झाल्यानंतर एका पातेल्यात त्या काढा. गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात कढीपत्ता, जीरे, मोहरीचा मस्त तडका बनवा आणि इडलीवर टाका. यानंतर नारळाचा चव आणि हिरवी मिरची वरून घाला.

० फायदे –
१) पचायला हलकी, खायला पौष्टिक
२) कमी वेळात उत्तम आहार
३) बराच वेळ पोट भरल्याची जाणीव आपल्याला इतर पदार्थ खाण्यास मनाई करते .
४) कमी तेलाच्या वापरामुळे जळजळ, पित्त वा मळमळ यांसारखे त्रास होत नाहीत.