| | |

आता घरच्या घरी बनवा इंटरनॅशनल हेल्दी ब्रेकफास्ट; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याकडे प्रामुख्याने सकाळच्या नाश्त्यामध्ये कांदेपोहे, उपमा, शिरा, इडली, मेदुवडा, वडा सांबार, मिसळ पाव आणि अजून बरेच जिभेला पाणी सुटतील असे पदार्थ बनवले जातात आणि अगदी आवडीने खाल्ले जातात. यातील प्रत्येक पदार्थामध्ये उत्तम चव आणि भक्कम आरोग्य देणारे घटक आहेत. पण रोज रोज तेच तेच खाऊन लहान मुलं तर कंटाळा करतातच अगदी मोठे पण नाकं मुरडतात. मग अशावेळी मुद्दाम नाश्ता टाळला जातो. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तर गृहिणींनो टेंशन घ्यायची गरज नाही. जर रोजच्या नाश्त्यामुळे घरातल्यांचा मूड बिघडला असेल तर फार वेळ न घालवता थेट थोडा इंटरनॅशनल तडका द्या म्हणजे तुम्हीपण खुश आणि सगळ्यांचा टम्मीपण खुश. चला तर जाणून घेऊयात इंटरनॅशनल हेल्दी आणि टेस्टी नाश्त्याचे सोप्पे प्रकार खालीलप्रमाणे:-

१) कॅलीफोर्नियन ब्रेकफास्ट – बेनिडिक्ट

० साहित्य :
– ब्रोश लोफच्या २ मोठ्या स्लाइस
– अवकॅडोची पेस्ट १ मोठा चमचा
– अंडी २
– टोमॅटो २ छोटे स्लाइस केलेले
– लाल, पिवळी, हिरवी सिमला मिरची ५० ग्रॅम
– नटमेग पावडर १ चिमूट
– फायलो पेस्ट्री १ शीट
– कोणतेही मोसमी फळ १०० ग्रॅम
– हॉलेन्डाइज़ सॉस गरजेनुसार

० कृती – सर्वात आधी ब्रोश ब्रेडच्या स्लाइस टोस्ट करून घ्या. आता एका छोट्या भांड्यात पाणी उकळून घ्या आणि यात अंडी शिजवून घ्या. आता ग्रिल केलेल्या ब्रोश ब्रेडवर टॉमेटोच्या स्लाइस ठेवा आणि त्यावर नटमेगसोबत सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे मिक्स करून हे मिश्रण घाला. यावर दुसऱ्या स्लाइसवर अवकॅडो पेस्ट लावून घ्या. आता यावर अंडे ठेवून आवडीनुसार हॉलेन्डाइज़ सॉस आणि फायलो पेस्ट्री शीट ठेवा. तुमचं तयार बेनिडिक्ट फाइलो बास्केट कप आणि मोसमी फळांसोबत खायला एकदम तयार.

२) स्पॅनिश ऑमलेट विद नाचोज़

० साहित्य :
– कांदा १ चमचा
– हिरवी मिरची १ चमचा
– लसूण ३ कळ्या
– हिरवा कांदा १ मोठा चमचा
– पिवळी, लाल सिमला मिरची १ मोठा चमचा
– उकडलेल्या बटाट्याचे तुकडे १ मोठा चमचा
– अंडी ३
– मीठ आणि काळी मिरी स्वादानुसार
– पीसा डि गॅलो २ चमचे
– ग्वुकामोल १ मोठा चमचा
– सार क्रीम १ मोठा चमचा
– नाचोज़ १०

० कृती : एका फ्राय पॅनमध्ये मध्यम आचेवर कांदा, हिरवी मिरची आणि लसूण मस्त गोल्डन फ्राय करून घ्या. आता ह्यामध्ये थोडी काळी मिरी आणि मीठ घाला. हे मिश्रण खमंग परतल्यास बाजूला ठेवून द्या. आता बटाट्याचा बेस बनवून त्यावर कापलेल्या बटाट्याचे काप ठेवा आणि ते पॅनमध्ये ठेवा. त्यावर अंडी फेटून घाला. आता ह्याच्या टॉपवर पिझ्झाच्या टॉपिंग्ज्सप्रमाणे भाज्या आणि थोडी काळी मिरी पेरा. ह्यामध्ये आता टोमॅटो सॉस आणि टबॅस्को सॉस घाला. आवडत असेल पारमेजन चीजसुद्धा घाला. आता वरून झाकण ठेवा आणि २ मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. यामुळे चीज चांगल्या रीतीने मेल्ट होईल. आता तुमचं ऑम्लेट तयार. आता पिझ्झाकट देऊन सर्व्हिंग प्लेटमध्ये घ्या आणि सर्वात शेवटी नाचोज घालून पीसा डी गॅलो व ग्वुकामोलने सजवा. यानंतर सार क्रीम घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.

३) रशियन ब्रेकफास्ट सलाड

साहित्य:
– मटार १/४ कप
– गाजर १/४ कप सोलून लहान चौकोनी तुकडे
– शिजलेला बटाटा १/४ कप सोलून लहान फोडी
– पाती कांदा १/४ कप
– काकडी १/४ कप सोलून लहान चौकोनी फोडी
– टोमॅटो १/४ कप
– लाल सफरचंद १/४ कप चौकोनी लहान फोडी
– अननस १/४ कप चौकोनी लहान फोडी
– साखर २ टेस्पून
– मोहोरी पावडर १/४ टिस्पून
– व्हाईट सॉस २ टेस्पून
– मेयॉनिज (एगलेस) २ टेस्पून
– मिरपूड १/४ टिस्पून
– कोथिंबीर सजावटीसाठी

० कृती: सर्वात मटार आणि गाजराचे तुकडे वाफवून घ्या. आता व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडर एकत्र करून निट मिसळा. आता सर्व चिरलेल्या भाज्या व फळे एकत्र एका वाडग्यात घ्या. व्हाईट सॉस, साखर, मोहोरी पावडरचे मिश्रण त्यात घालून हे निट मिक्स करा. यात मेयॉनिज घालून मिक्स करा. वरून थोडी मिरपूड घाला. आता सर्व्हींग बोलमध्ये सर्व मिश्रण घालून फ्रिजमध्ये किमान अर्धा तास थंड करा. फ्रिजमधून बाहेर काढून थंडगार सलाड सर्व्ह करावे.