| |

घरच्या घरी बनवा दंतरक्षक टूथपेस्ट; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले दात सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने निगा राखणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी आजकाल बाजारामध्ये निरनिराळ्या पद्धतींच्या आणि ब्रँड्सच्या टूथपेस्ट्स उपलब्ध आहेत. अगदी संवेदनशील दातांसाठी, लहान मुलांच्या दातांसाठी, श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी, हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अश्या कितीतरी विविध खास समस्यांसाठी या टूथपेस्ट बनविल्या जातात. आपण टीव्हीवर अनेकदा या टूथपेस्ट्च्या हटके जाहिराती पाहत असतो. यामुळे साहजिकच अश्या टूथपेस्ट घेण्याचा मोह होतो. पण असे आहे कि, या सर्वच टूथपेस्ट आपल्या दातांना अगदी पांढरे शुभ्र आणि निरोगी बनविण्याचे आश्वासन देतात पण कालांतराने पहिले पाढे पंचावन्न म्हणायची स्थिती निर्माण होते.

मुख्य म्हणजे या टूथपेस्टमध्ये रसायन वापरलेले असते जे दातांचे व हिरड्यांचे आरोग्य खराब करते. यामुळे महागड्या टूथपेस्टची खरेदी अंगलटच होते. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, अश्या टूथपेस्टपेक्षा घरगुती टूथपेस्ट लाभदायक आहे. आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा वापर करून घरच्या घरी दातांची काळजी घेईल अशी टूथपेस्ट बनवता येते. जी अगदी रास्त किमतींमध्ये उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून तयार होते आणि यात अनेको औषधी गुणधर्म समाविष्ट असतात. चला तर जाणून घेऊयात साहित्य, कृती आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० साहित्य
– १ टेबलस्पून झायलिटोल
– ३ टेबलस्पून बेकिंग सोडा
– १५ थेंब पुदिन्याचे तेल
– १ टेबलस्पून कडूलिंबाची पाने वाळवून त्यापासून तयार केलेली पूड
– ३ टेबलस्पून नारळाचे तेल

० कृती – वरील सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिसळून एकजीव करा आणि याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि दररोज दिवसातून दोन वेळा ब्रश करण्यासाठी वापरा.

० फायदे –

१) या टूथपेस्टमध्ये कडूलिंब असल्यामुळे दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे मिश्रण अतिशय उत्तम आहे.

२) या टूथपेस्टच्या वापराने हिरड्या बळकट होतात.

३) दातांमध्ये कीड उत्पन्न होण्याचा धोका नाहीसा होतो.

४) दातांवर आलेला पिवळेपणा दूर होतो.

५) तोंडाला दुर्गंध येत नाही.