| | |

मोगऱ्याचे सुगंधी फुल त्वचा आणि केसांची घेई काळजी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोजच्या दगादगीच्या आयुष्यात त्वचा आणि केसांची देखभाल करणं फार कठीण असतं. दररोजची धावपळ, बदलती जीवनशैली आणि चुकीची खानपान पद्धती यामुळे केसांची आणि त्वचेची पुरती वाट लागते. अर्थात त्वचा आणि केस जणू निर्जीव होऊन जातात. मग पुन्हा आधीसारखे तेज मिळवण्यासाठी आपण न जाणे कित्येक केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा वापर करतो. पण आजकाल अश्या महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा घरगुती औषधोपचारांची मदत घेतल्यास तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. कारण त्वचा आणि केसांसाठी घरगुती उपाय उत्तमरित्या काम करतात. कधी कधी आपल्याला माहित असलेले पदार्थ किंवा फळ वा फुल आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असते. जसे कि, मोगऱ्याचे फुल. होय. मोगऱ्याचे फुल आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यास सक्षम आहे.

मोगरा अतिशय सुगंधी असून त्याचे असंख्य आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक फायदे आहेत. शिवाय औषधी गुणधर्म असल्यामुळे या फुलाचा उपयोग वर्षानुवर्षे केला जात आहे. आशियाई आणि पूर्व संस्कृतीमध्ये मोगऱ्याच्या फुलाचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जात आहे. केस आणि चेहऱ्यासाठी हे फुल अतिशय लाभदायक असून मोगऱ्याचा डिओड्रंटमध्येही वापर केला जातो. चला तर जाणून घेऊयात मोगऱ्याचे फायदे:-

१) नैसर्गिक सुगंध – आयुर्वेदात मोगऱ्याचे एक विशिष्ट स्थान आहे. कारण मोगऱ्यापासून तयार केले जाणारे तेल हे सौम्य तितकेच सुगंधित असते. जे एखाद्या नैसर्गिक सुगंधित द्रव्याप्रमाणे कार्यरत असते. त्यामुळे मोगऱ्याच्या तेलाचा वापर अत्तर, साबण, परफ्यूम, अगरबत्ती, रुम फ्रेशनर, कार फ्रेशनर इ. तयार करण्यासाठी केला जातो. याशिवाय मोगऱ्याचा सुगंध मानसिक थकवा दूर करण्यासाठी आणि वातावरणात प्रसन्नता निर्माण करण्यासाठी लाभदायक भूमिका निभावतो.

२) उजळ त्वचा – चेहऱ्यावरील मुरूम, डाग किंवा स्ट्रेच मार्क्स यापासून सुटका हवी असेल तर मोगऱ्याचे तेल, पेट्रोलियम जेली किंवा नारळाच्या तेलासह त्वचेवर लावा. यामुळे कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. इतकेच नव्हे तर त्वचेचा रंग आणि पोतदेखील सुधारतो. यासाठी मोगऱ्याच्या देठांची पेस्ट तयार करून फेसमास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावा.

३) कोमल ​​त्वचा – ऋतूनुसार आपल्या त्वचेत बदल होत असतो. यामुळे त्वचा काळवंडणे, घामोळे येणे, खाज सुटणे, शरीरावर काळे चट्टे पडणे असे कित्येक त्वचा विकारांचा त्रास होतात. सूर्यकिरणांमुळे त्वचा निस्तेज होते. अश्यावेळी मोगऱ्याच्या तेलाचा वापर करून त्वचा कोमल, मऊ आणि नितळ होऊ शकते. यासाठी पाण्यामध्ये मोगऱ्याच्या तेलाचे काही थेंब मिसळून आंघोळ करा. यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि शरीराला दुर्गंध येत नाही.

४) ​त्वचेच्या विकारांवर प्रभावी – सूर्यकिरण आणि प्रदूषणामुळे त्वचा खराब होते. सूर्यकिरणांमुळे त्वचेवर वृद्धत्वाच्या खुणा दिसतात. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येतात. मोगऱ्याचा चहा शरीरावरील जखमा आणि व्रण दूर करण्यास मदत करतात. याशिवाय मोगऱ्याच्या तेलामुळे त्वचा लाल होणे, सूर किरणांमुळे त्वचा जळणे आणि त्वचेशी संबंधित अन्य समस्या दूर होण्यास मदत मिळते.

५) नैसर्गिक कंडिशनर – मोगऱ्याची १० ते १५ फुले पाण्यात भिजवून या पाण्याने केस धुवा. हे पाणी नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करते. ज्यामुळे केस मऊ होतात. शिवाय मोगऱ्याच्या तेलाने केसांचा मसाज केल्यास केस कुरळे आणि सुंदर होतात.

६) मजबूत केस – केसांना मुळापासून मजबूत करायचे असेल तर, मोगऱ्याच्या पानांचा रस काढून केसांच्या मुळांना लावावा. यामुळे केस निरोगी आणि मजबूत होतात. इतकेच काय तर यासोबत केसगळती, कोंडा इ. केसांच्या समस्या कमी होतात. मोगऱ्याच्या पानांचा रस काढून नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास केस लांब, दाट आणि जाड होण्यास मदत मिळते.