| |

शेवग्याची भाजी करेल हाय ब्लड प्रेशर कंट्रोल; कसे ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसांत न जाणे कित्येक विविध प्रकारच्या पालेभाज्या, रानभाज्या आणि अन्य भाज्या उगवतात. मुख्य म्हणजे त्या भाज्या चवीला अव्वल आणि आरोग्यास अत्यंत हितवर्धक असतात. या अनेक भाज्यांपैकी एक भाजी म्हणजे शेवग्याची भाजी. ही भाजी सहसा पावसाळ्याच्या दिवसांत खूप सहज बाजारात उपलब्ध होते. शिवाय या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. इंग्रजीत या भाजीला ड्रमस्टिक किंवा मोरिंगा असे म्हटले जाते. शेवग्याच्या झाडाची वाढ हि अत्यंत झपाट्याने होते.

शेवग्याच्या शेंगांप्रमाणे त्यांच्या पानाफुलांचाही आहारात वापर केला जातो. कारण शेवग्याची पाने, फुले आणि शेंगा औषधी गुणधर्मयुक्त आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने, अमिनो अॅसिड, बीटा कॅरेटिन अशी पोषक तत्त्वे असल्यामुळे उच्च रक्तदाबाचा विकार अर्थात हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आहारात शेवग्याच्या भाजीचा विशेष समावेश करावा.

  • जाणून घ्या शेवग्याच्या भाजीचे गुणकारी फायदे:-

१) शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळते. यामुळे पोट साफ होते.

२) शेवग्याच्या पानांमध्ये पीट्रिगोस्पेरमिन नावाचे एक तत्त्व असते. हे तत्त्व जीवाणू प्रतिबंधक म्हणून कार्य करते. यामुळे आतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते.

३) शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे आणि दातांच्या मजबुतीकरिता ही भाजी खाणे फायद्याचे ठरते. शिवाय हाडे ठिसूळ झाल्याची समस्या आढळल्यास शेवग्याच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

४) शरीरात वाढलेला अतिरिक्त मेद या भाजीच्या सेवनामुळे कमी होते. यामुळे वजनवाढीच्या समस्येवर शेवग्याची भाजी अत्यंत लाभकारी आहे.

५) शेवग्याचा पाला हा रक्तवर्धक आणि हाडांना बळकटी देणारा असतो. शिवाय मानसिक थकवा आणि शारीरिक जडपणा, पोटावरील भार या भाजीने कमी होतो.

६) शेवग्याच्या फुलांची भाजी संधीवातासाठी अतिशय गुणकारी आहे.

७) शेवग्याच्या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत.  ही भाजी पोटातील कृमींचा समूळ नाश करते.

८) ह्रदयविकार, रोगप्रतिकारशक्तीची कमतरता, मधुमेह, कर्करोग असे आजार असलेल्यांनी या भाजीचा आहारात समावेश केला असता या सर्व आजारांपासून मुक्तता मिळते वा होण्याचा धोका कमी होतो.

९) शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.

१०) शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.