|

तोंडाला पाणी आणणारी चिंच घेते आरोग्याची काळजी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आंबट गोड चवीची चिंच म्हणजेच कित्येकांचा अगदी जीव कि प्राण. तसेही चिंच म्हटलं की यांच्या तोंडाला जणू पाणीच सुटतं. चिंचेचा वापर प्रामुख्याने आहारातील अन्नपदार्थांमध्ये केला जातो. आंबट गोड चटणी, सॉस किंवा मग दाक्षिणात्य पद्धतीची डाळ, सांबार यांसारखे पदार्थ बनवताना किंवा ठराविक मिठाईचे पदार्थ बनवतानाही चिंचेचा वापर केला जातो. कारण, चिंचेच्या वापराने त्या त्या अन्न पदार्थाला एक विशिष्ट चव प्राप्त येते. अशा प्रकारे दैनंदिन आहारात चिंच वापरल्यास आपल्या आरोग्यालाही फायदे होतात.

चिंचेमध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पौष्टिक घटक असतात. जे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असतात. चिंचेमध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे चिंच खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला तर जाणं घेऊयात चिंच खाण्याचे फायदे.

१) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासही मदत करते.

२) रक्तदाबावर नियंत्रण – चिंचेत लोह आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तदाबाच्या समस्येत फायदा मिळतो.

३) वजन कमी होते – चिंचेमध्ये हाइड्रोसिट्रिक अॅसिड असते. त्यामुळे चिंचेचे सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होते. परिणामी वजन कमी होते.

४) अशक्तपणावर असरदार – चिंचेमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चिंचेचे योग्य प्रमाणात सेवन केले असता शरीरातील अशक्तपणा दूर होतो.

५) रक्तातील साखरेवर नियंत्रण – रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित करण्यासाठीही चिंच फायदेशीर असते.

६) पोटाचे विकार – प्राचीन काळापासून चिंचेचा वापर पाचक स्वरुपात केला जात आहे. कारण चिंचेच्या सेवनाने पोटाशी संबंधित विकार दूर होतात.

  • लक्षात ठेवा :
    – ज्यांना चिंचेची अॅलर्जी आहे त्यांनी मुद्दाम चिंच खाऊ नये.
    – चिंचेचं सेवन करताना अधिक प्रमाणात खाऊ नये.