| |

नखांचा रंग बदलणे असू शकते गंभीर आजाराचे लक्षण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो तुमच्या उत्तम आरोग्याच्या व्याख्येत शरीर, मेंदू, हृदय, किडनी, हाडं, रक्त वाहिन्या या प्रत्येक भागाचा समावेश असेल नाही का? कदाचित यात त्वचा आणि केसांचा देखील समावेश असेल. पण तुमच्या व्याख्येत नखांचा समावेश आहे का? नाही? मग करून घ्या. कारण आपली नखे आपल्या आरोग्यातील बिघाडाचे संकेत देत असतात. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. आपल्या हातापायाची नखे गंभीर आजारांचे वेळीच संकेत देत असतात. पण आपण या संकेतांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि इथेच फसतो. चला तर जाणून घेऊयात नखांचा बदललेला रंग हा कोणकोणत्या आजारांचे लक्षण असू शकते ते खालीलप्रमाणे:-

१) पिवळी नखे – नखांचा रंग पिवळा होणे हे बुरशीजन्य संसर्ग वा सिरोसिससारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

२) निळी वा राखाडी नखे – निळ्या वा राखाडी नखांचा अर्थ असा होतो की शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि शरीराला तात्काळ ऑक्सिजनची गरज आहे.

३) नखांमध्ये दिसणाऱ्या विविध गडद रंगाच्या रेषा – नखांमधील हा बदल त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळीच त्वचारोग तज्ञांकडून तपासणी करून घ्या. कारण या गडद रेषा मेलेनोमा असू शकते. हा त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात गंभीर प्रका आहे.

४) नखांभोवती लालसरपणा आणि सूज – जर आपल्या नखांभोवती लालसरपणा आणि सूज आली असेल तर हा त्वचेसंबंधित संसर्गजन्य रंगाचा संकेत असू शकतो. यासाठी लवकर उपचारांची आवश्यकता असते. वेळीच लक्ष न दिल्यास याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

५) हिरवट काळी नखे – नखांना बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यास नखे हिरवट काळी होतात. दरम्यान उपचार न केल्यास हे संक्रमण वाढते आणि याचे गंभीर परिणाम होतात.

६) गडद पांढरी नखे – गडद पांढरी नखे शरीरात रक्त कमी असणे आणि यकृत रोग व मधुमेह झाल्याचे संकेत देतात.

७) फिकट नखे – जर तुमच्या नखांचा रंग सर्व सामान्य नसेल आणि नखे फिकट व पातळ झाली असतील तर याचा अर्थ आहे कि तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी झाली आहे. शिवाय तुमचे शरीर अशक्तपणाशी सामना करीत आहे.

८) अर्धी गुलाबी, अर्धी पांढरी नखे – जर नखांचा रंग अर्धा गुलाबी आणि अर्धा पांढरा असेल तर तुम्हाला किडनी रोग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

९) नखांवर अंधुक लाल अर्धचंद्र – अशा स्वरूपाची नखे ल्युपस, हृदयरोग, अलोपेसिया एरियाटा, संधिवात, डर्माटोमायोसिटिस अशा आजारांचे गंभीर लक्षण असू शकतात.

१०) नखांवर पांढरा ठिपका – नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके तयार होणे म्हणजे शरीरात लोहाची कमतरता असणे. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि ऍनिमिया होऊ शकतो.

११) नखांचा तपकिरी वा गडद रंग – नखांचा तपकिरी किंवा गडद रंग थायरॉईड असण्याची शक्यता दर्शवतो. याशिवाय हे रंग कुपोषणामुळेदेखील असू शकतात.