| | |

चवीने कडू असणारे कडुलिंब आरोग्यासाठी अमृतासमान; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आयुर्वेदामध्ये कडूलिंबाला अत्यंत महत्त्व आहे. कडूलिंबाच्या वापराने बरेच मोठमोठे आजार बरे होतात. कडूलिंबाची पानं भले चवीला थोडी नव्हे थोडी जास्त कडू असतात. पण कडूलिंबात आढळणारे अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीक यांसारखे गुणधर्म कडूलिंबाला अतिशय उपयुक्त आणि खास बनवतात. मुख्य म्हणजे कडूलिंबाचे झाड हे एके असे झाड आहे, ज्या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या आजारावर अत्यंत गुणकारी आहेच. म्हणूनच अँटिबायोटिक घटकांनी समृद्ध असणाऱ्या कडुलिंबाला ‘सर्वोच्च गुणकारी औषधी’ म्हणून ओळखले जाते. चवीला कडू आणि व्याधींवर जालीम अमृतासमान कार्यरत असणाऱ्या कडुलिंबाकडे सर्व समस्यांवर उपचार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कडुलिंबाचे विशेष औषधी गुणधर्म.

  • कडुलिंबाचे फायदे :-

१) किडनी स्टोन – किडनी स्टोनची समस्या असल्यास कडुलिंबाची पाने जाळून त्याची रक्षा बनवावी आणि दररोज २ ग्रॅम रक्षा घेऊन कोमट पाण्यासह सेवन करावे. असे पाणी प्यायल्याने पथरी किंवा दगड गळून पडतो किंवा मूत्रविसर्जन मार्गाने बाहेर पडतो.

२) मलेरिया – मलेरियाचा ताप झाल्यास शारीरिक थकवा, अशक्तपणा जाणवतो. या तापात रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. याकरिता कडुनिंबाची साल पाण्यात उकळवा आणि त्याचा काढा बनवा. हा काढा दिवसातून ३ वेळा २ चमचे भरून प्यायल्याने मलेरियाचा ताप कमी काळात बरा होतो आणि अशक्तपणा जाणवत नाही.

३) शरीरावरील जखमा – कोणत्याही जखमेवर कडुलिंबाची पाने वाटून त्याचा लेप लावणे अत्यंत फायदेशीर आहे. यातील अँटिबॅक्टेरियल गुणधर्म जखमेतून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंचा खात्मा करतात. या शिवाय ऑलिव्ह ऑईल बरोबर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्याने जुन्यातली जुनी जखमदेखील बरी होते.

४) विषारी कीटकांचा चावा – विंचू ,गांधीळ माशी, मध माशी यांसारखे कोणतेही विषारी कीटक चावले तर कडुलिंबाची पाने बारीक वाटून कीटक चावलेल्या जागी त्याचा लेप बनवून लावा. यामुळे शरीरात विष पसरत नाही आणि लवकर आराम मिळतो.

५) शारीरिक वेदना / अंगदुखी – डोकेदुखी, दातदुखी, हाता पायात वेदना, छातीदुखी या समस्यांसाठी कडुलिंबाच्या तेलाने मॉलिश करणे फायद्याचे ठरते. शिवाय कडुलिंबाचे फळ कफ आणि कीटनाशक म्हणून वापरले जाते.

६) दातांचे आरोग्य – कडुलिंबाच्या दातूनने अर्थात कडुलिंबाच्या काडीने दात स्वच्छ होतात. यामुळे पायोरियाचा आजार असल्यास तो नाहीसा होतो. शिवाय कडुलिंबाच्या पानांचा काढा बनवून त्याने गुळण्या केल्या असता दात आणि हिरड्या अगदी रोगमुक्त राहतात आणि तोंडातुन येणाऱ्या दुर्गंधीची समस्या देखील नाहीशी होते.

७) त्वचेचे आजार – जर आपल्याला त्वचेचे आजार असतील तर यासाठी कडुलिंबाचे तेल फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या तेलात थोडासा कापूर मिसळून शरीरावर मालिश केल्याने त्वचेचा कोणताही रोग बरा होतो. मात्र समस्या अधिक कष्टदायी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

८) मुरूम – चेहऱ्यावर मुरुम असतील, तर पाण्यात कडुलिंबाची साल उकळवून त्या पाण्याने अंघोळ करणे किंवा अंघोळीच्यावेळी शरीरावर कडुलिंबाची साल घासून लावल्याने फायदा होतो. शिवाय कडुलिंबाच्या पानांचा लेप लावल्याने त्वचेसंबंधित समस्या निर्माण करणारे जंतु नष्ट होतात किंवा चेहऱ्यावर मुरूम जास्त येत असतील तर त्यासाठी कडुलिंबाच्या हळद मिसळून लावणे फायद्याचे ठरते.

९) खाज व खरूज – खाज किंवा खरूज यांसारखे त्वचेशी संबंधित मोठे त्रास जाणवत असतील तर कडुलिंबाची पाने दह्यासह वाटून लावल्याने लगेच आराम मिळतो आणि खाज, खरूजच्या त्रासातून मुक्तता मिळते.

१०) आधी व्याधी – कडूलिंबाच्या देठात खोकला, मूळव्याध, जंत या रोगांचा नायनाट करण्याचे सर्व गुणधर्म समाविष्ट आहेत. त्यामुळे हे दररोज चावून खाल्ल्याने किंवा पाणी उकळवून प्यायल्याने फायदा या समस्या दूर होतात.