| |

आता डाएटसाठी खाण – पिण सोडायची गरज नाही; असे करा आहाराचे व्यवस्थापन

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजची पिढी चुकीची आहार पद्धती आणि वाईट जीवनशैलीच्या पूर्णतः आहारी गेली आहे. यामुळे शरीरातील स्थूलपणा आणि अन्य रोगांना आमंत्रण मिळते. अनेकांनी तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीला डाएटिंगच्या चौकटीत जखडून ठेवले आहे. डाएटिंगच्या नावाखाली हे लोक शरीरास आवश्यक असणारी पूरक तत्त्वे ग्रहण करीत नाहीत. यामुळे अन्य आजार बळावतात. तर आज आपण पाहणार आहोत कि डाएटिंगच्या नावावर पोटाला चिंता काढण्यापेक्षा आहाराचे योग्य व्यवस्थापन कसे करावे. जाणून घ्या पुढील प्रमाणे :-

१) अनेकांना दिवसभर पोट रिकामी ठेवून एकाच वेळी भरपूर खाण्याची सवय असते. तर असे करणे पोटावरील चरबी वाढवते. त्यामुळे एकाचवेळी जास्त अन्न ग्रहण करण्यापेक्षा दिवसभर थोडे थोडे अन्न खा. दर दोन तासांनी पचण्यास हलके असेल असे खाणे सुरु ठेवा.

२) दिवसाची सुरुवात प्रोटीन शेक किंवा दुधाच्या चहाऐवजी दोन ग्लास कोमट पाणी पिऊन करा. यानंतर थोड्या वेळाने ग्रीन टी किंवा लेमन टी प्या आणि लेमन टीमध्ये साखरे ऐवजी मधाचा वापर करा.

३) सकाळच्या न्याहारीत अंकुरलेले (मोड आलेले) धान्य, टोफू, सोया दूध, सोयाबीन किंवा उकडलेली २ अंडी अशी उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ घ्या.

४) दर दोन तासानंतर एखादे फळ स्वच्छ धुवून खा. शक्यतो नेहमी हंगामी फळे खाणे योग्य. टरबूज, खरबूज, लीची, मोसंबी, संत्रे, सफरचंद, केळी, रताळे, करांदे इ. तंतुमय फळे खा.

५) तसेच दुपारच्या जेवणातील कार्ब्सचे प्रमाण शक्य तितके कमी करा. आहारात दोन चपाती, डाळ, भाजी इत्यादी पदार्थ घ्या आणि साधा भात खाणे टाळा. आपण भट खाण्यास इच्छुक असाल तर ब्राऊन राईसचे सेवन करा किंवा आठवड्यातून एकदा मध्यम वाटी साधा भात खाऊ शकता. शिवाय आहारात दही आणि आठवड्यातून एकदा खिचडीचा समावेश करा.

६) दररोज अधिकाधिक द्रव आहार घ्या. दुपारच्या जेवणानंतर किमान दोन तासांनी नारळाचे पाणी, ताक, फळाचा रस इ. पेय प्या.

७) संध्याकाळच्या वेळी शरीरास ऊर्जाप्राप्तीसाठी हलका नाश्ता म्हणून आपण व्हेज सँडविच, पोहे, उपमा, ओट्स कॉर्न, भाजलेले चणे इ. पदार्थांपैकी एक घेऊ शकता.

८) रात्रीच्या जेवणात दुधी, तोंडली, घोसाळे इत्यादी पाणीदार भाज्या खा. तसेच एका वेळी १ ते २ मध्यम चपातीच खा. रात्रीच्या जेवणानंतर २ तासांनी झोपेच्या १ तास आधी विनामलाई १ कप कोमट दूध हळदीसोबत घ्या.

लक्षात ठेवा –

अ) आहार व्यवस्थापना व्यतिरिक्त शरीरासाठी व्यायाम महत्त्वपूर्ण आहे. वेळेचा अभाव असल्यास किमान सकाळी आणि संध्याकाळी ३० मिनिटे चालल्याने शारीरिक हालचाल होते व शारीरिक प्रक्रिया सुरळीत होण्यास लाभ होतो.

आ) जंक फूड, फास्ट फूड, शुगरी ड्रिंक पिणे टाळा. कमी तेलातील अन्न ग्रहण करा. बटर ऐवजी पिनट बटर वापरा.

इ) दररोज महिलांनी २ ते २.७ लिटर आणि पुरुषांनी ३ ते ३.७ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.