| |

अरे बापरे! वायू प्रदूषण वाढत्या मृत्यू दराचे कारण; जाणून घ्या सविस्तर

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि प्रदूषण हि एक गंभीर आणि तितकीच भीषण समस्या आहे. जगभरात रोगराईप्रमाणे वाढते प्रदूषण देखील अत्यंत मोठी समस्या असल्याचे मानले जाते. मुळात त्याचे कारणही तसेच काहीसे आहे. आपल्या भारतातील वाढत्या प्रदूषणाचा धोका सातत्याने तीव्र गतीने वाढताना दिसतोय. याचा परिणाम थेट मानवी जीवनावर होत आहे. होय. वाढत्या प्रदूषणामुळे देशातील लोकांचं आयुर्मान घटू लागलं आहे अर्थात जगण्याचे वय कमी होऊ लागले आहे.

शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी संस्थेने केलेल्या एका संशोधनानुसार, भारताच्या वायू प्रदूषणाबाबत त्यांनी काही गोष्टी विशेष नमूद केल्या आहेत. दरम्यान या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, प्रदूषणामुळे भारतातील ४०% लोकांचे सरासरी आयुष्य साधारण ९ वर्षांनी कमी होऊ शकते. म्हणजेच, एखादी व्यक्ती ८० वर्षांपर्यंत जगू शकत असेल, तर भारतातील वायू प्रदूषणामुळे त्या व्यक्तीचे वय ९ वर्षांनी कमी होऊन ७१ वर्षे होईल. शिवाय या अभ्यासात असाही दावा केला आहे कि, उत्तर भारतातील ४८ कोटी लोकांना दररोज धोकादायक वायू प्रदूषणाचा सामना करावा लागतो. तर उत्तर भारतीय लोक ज्या हवेमध्ये श्वास घेतात ती जागा या संपूर्ण जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा दहा पट अधिक विषारी आहे.

मध्य आणि पश्चिम भारतातील लोकांची स्थिती पाहायची झाली तर त्यांचीही स्थिती काही बरी नाही. कारण २००० सालापासून महाराष्ट्र राज्य आणि मध्य प्रदेश राज्यातील हवेची गुणवत्ता इतर ठिकाणांप्रमाणे खालावली आहे. त्यामुळे येथील लोकदेखील वायू प्रदूषणामुळे हैराण आहेत. इतकेच नव्हे तर पूर्वीपेक्षा २ ते ३ वर्षे त्यांचेही आयुर्मान घटल्याचे दिसत आहे. तसेच या अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, भारत सरकारने Clean Air Policy (CAP) आणली तर भारतीयांचे वय सरासरी ५ वर्षांनी वाढेल.

माहितीनुसार, २०१९ सालामध्ये जगातील ९२ लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाला असून या मृतांपैकी १६ लाखांहून अधिक मृत्यू केवळ भारतात झाले आहेत. वायू प्रदूषण मूल्यांकन संस्था IQ Air यांनी जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांची यादी जाहीर केली असता या यादीमध्ये भारत देश तिसऱ्या स्थानावर आढळला आहे. अर्थात भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. इतकेच काय तर, या यादीत बांगलादेश पहिल्या क्रमांकावर तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी जगातील लोकांचे आयुष्य घटण्यामागे इतर समस्यांसह वायू प्रदूषण एक मोठे संकट असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे.