| | |

भेंडीचे पाणी बहू गुणकारी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भेंडी ही एक भाजी आहे जी फार लोक आवडीने खात नाहीत. कारण भेंडी थोडी बुळबुळीत असते. पण चवीला अत्यंत उत्कृष्ट असते. त्यामुळे न खाणार्यांपेक्षा चवीने खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भेंडीला लेडी फिंगर आणि ओकरा म्हणूनही ओळखले जाते. हि भाजी जवळजवळ प्रत्येक हंगामात उपलब्ध असते. भेंडीचे लोणचे, सूप आणि भाज्या अशा अनेक प्रकारांमध्ये सेवन केले जाते. पण तुम्हाला या भाजीचे विशेष औषधी गुणधर्म माहित आहेत का?

तर मित्रांनो भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फायबर असे अनेक पोषक घटक समाविष्ट आहेत. शिवाय यात भरपूर प्रमाणात अँटी- ऑक्सिडंट्स देखील आढळतात आणि त्यात प्रथिने, चरबी, कर्बोदकांमधे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, तांबेदेखील असते. यामुळे भेंडी खाणे फायदेशीर मानले जाते. पण भेंडीच्या भाजीपेक्षाही गुणकारी भेंडीचे पाणी आहे. होय. भेंडीचे पाणी. कारण यात फक्त भेंडीचे सर्व गुण उतरलेले असतात. जे आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरतात.

० भेंडीचे पाणी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
– चार ताजी भेंडी
– एक कप पाणी

० भेंडीचे पाणी बनवण्याची पद्धत – आधी भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर भेंडीच्या कडा कापून घ्या आणि त्यास मध्यभागी कापून एक कप पाण्यात भिजवून ठेवा. हि भेंडी रात्रभर भिजत राहू द्या आणि सकाळी या पाण्यातून भेंडी पिळून घ्या. यात परत एक कप पाणी घाला. भेंडीचे आरोग्यदायी पाणी तयार.

० भेंडीचे पाणी सेवन करण्याची पद्धत – दररोज सकाळी उपाशीपोटी वा न्याहारीपूर्वी हे पाणी प्या. साधारण ७ दिवस सातत्याने या पाण्याचे सेवन करावे लागेल आणि दिवसातून एकदाच हे पाणी प्यावे लागेल.

० भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

१) मजबूत रोग प्रतिकारशक्ती – भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार करण्याची क्षमता वाढते आणि यामुळे आपण फार लवकर आजारी पडत नाही. तसेच आपल्या शरीरात रोगांशी लढण्याचे सामर्थ्य वाढते. यामुळे कोणताही संसर्ग आपल्या आरोग्याचे नुकसान करू शकत नाही.

२) मधुमेहावर नियंत्रण – भेंडीचे पाणी मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. कारण भेंडीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते. आपल्या रक्तातील साखर जास्त असेल तर भेंडीच्या पाण्याचा प्रयोग किमान २-३ आठवड्यांसाठी करावा.

३) हृदयाची काळजी – भेंडीच्या पाण्यात पेक्टिन नामक घटक असतो. हा घटक कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. याशिवाय रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारा पेक्टिन हृदयविकाराचा धोका कमी करतो. ज्यामुळे आपण हृदयविकारापासून आपला बचाव होतो.

४) पोटाच्या समस्या दूर – भेंडीच्या पाण्यामध्ये विरघळणारे फायबर समाविष्ट असते. हे फायबर आपल्या पोटाशी संबंधित विकारांवर प्रभावीरित्या कार्यरत असते. यामुळे भेंडीचे पाणी प्यायल्यास पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि फुशारकीसारख्या पोटातील समस्या दूर होतात आणि त्यामुळे पचन तंत्राचे कार्य सुरळीत होते.

५) बद्धकोष्ठता दूर करा – भेंडीच्या पाण्यात असणारे फायबर पोटाच्या समस्यांवर रामबाण उपायाप्रमाणे काम करते. यामुळे भेंडीचे पाणी प्यायल्यास पोट पटकन साफदेखील ​​होते आणि बद्धकोष्ठतेची तक्रार जाणवत नाही.

६) अशक्तपणावर परिणामकारक – ज्या लोकांच्या शरीरात रक्त कमी असते, अश्या लोकांना सतत अशक्तपणा जाणवतो. अश्या लोकांनी भेंडीच्या पाण्याचा प्रयोग नक्की करावा. कारण शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी भेंडीचे पाणी मदत करते.

७) कोलन कर्करोगाचा धोका कमी – कोलन कर्करोग दूर करण्यासाठी भेंडीचे पाणी प्या. कारण हे आतड्यांमधून विश्लेषणे काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे. भेंडीचे पाणी उत्तमरीत्या आतड्यांमधील कार्यक्षमता वाढवते. ज्यामुळे साहजिकच कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो.

८) डोळ्यांसाठी फायदेशीर – भेंडीच्या पाण्यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरेटिन मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारतात. यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी भेंडीचे पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे.

९) गर्भधारणेत महत्वाचे – गर्भवती महिलांनी भेंडीचे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे तितकेच फायदेशीर आहे. कारण त्यात फॉलिक एसिड भरपूर प्रमाणात आढळते, जे बाळ आणि आई दोघांसाठीही खूप महत्वाचे आहे.

१०) वजन कमी होते – भेंडीच्या पाण्यात कॅलरी कमी असतात. शिवाय भेंडीच्या पाण्यामध्ये फायबरचे प्रमाणदेखील जास्त असते. जे आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून धरते मात्र आपले वजन वाढू देत नाही.