| |

काढा एक आणि फायदे अनेक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेको वर्षांपासून विविध औषधी मिश्रित करून अनेको प्रकारचे काढे बनविले जात आहेत. हे काढे आपल्या शरीरासोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्यास सक्षम असतात. अगदी प्राचीन ऋषीमुनींच्या काळापासून औषधी वनस्पतींच्या साहाय्याने विविध औषधे तयार केली जात आहेत. हि औषधे काही पूड स्वरूपात तर काही काढ्याच्या स्वरूपात असतात. अश्याच एका काढ्याविषयी आणि त्यातील जिन्नसांची आपण माहिती करून घेणार आहोत. मात्र त्याकरिता तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल. चला तर जाणून घेऊयात काढ्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि औषधी गुणधर्मांविषयीची खास माहिती.

० काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

– पाच ते सहा तुळशीची पाने

– एक ते दोन वेलची

– कच्ची हळद

– एक चमचा लवंग

– एक चमचा काळीमिरी

– एक दालचिनीचा तुकडा

– आल्याचा तुकडा

– चार ते पाच मनुका

– एक मोठा खडी साखरेचा तुकडा ( पत्री खडी साखर)

० कृती – सर्वात आधी हळद धुवून किसून घ्या आणि आलं स्वच्छ करून त्याचा रस काढून घ्या. यानंतर अर्धा कप हळदीचा रस आणि ४ ते ५ चमचे आल्याचा रस ४ कप पाण्यात उकळत ठेवा. मग हळद आणि आल्यामुळे हे पाणी पिवळे दिसू लागेल. पुढे ५ -६ मिनीटांनी इतर सर्व साहित्य त्यात एक एक करून टाका. यानंतर १५ ते २० मिनिटे हे पाणी उकळल्यावर त्याचे प्रमाण आटून अर्धे होईल आणि काढा तयार होईल.

० कसे घ्याल?

– दररोज १ कप काढ्यामध्ये १ चमचा मध मिसळा आणि कोमट असतानाच काढा प्या.

० काढयामध्ये असलेले औषधी घटक आणि त्याचे फायदे – या काढ्यासाठी जे पदार्थ वापरण्यात आलेले आहेत त्या प्रत्येकाचे आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरास होत असतात. कारण त्यांच्यामध्ये असलेले नैसर्गिक आणि औषधी घटक आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात.

१) तुळशीची पाने – तुळशीमध्ये अनेक औषधी घटक असतात. यामुळे तुळशीला अमुल्य वनस्पती अथवा पवित्र वनस्पतीचा दर्जा मिळालेला आहे. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, लोह, फिरोफिल, झिंक, ओमेगा 3, मॅग्नेशियम, मॅगनीज असते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे इनफेक्शनचा धोकाही कमी होतो. नियमित तुळशीची पाने चघळल्यामुळे अथवा काढ्यातून त्याचा रस घेतल्यामुळे शरीर निरोगी राहते.

२) वेलची – हिरव्या अथवा मोठ्या काळ्या वेलचीचा वापर अन्नपदार्थांची रूची वाढवण्यासोबतच औषध म्हणून केला जातो. वेलची गरम असल्यामुळे तिचा वापर काढ्यासाठी करतात. ज्यामुळे सर्दी खोकला अथवा इनफेक्शन होत नाही. काढ्याप्रमाणे चहामध्येही वेलची टाकल्यामुळे घशाला आराम मिळतो.

३) कच्ची हळद – हळद ही अनेक आजारांवर गुणकारी असते. वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला झाल्यास हळदीचे दूध अथवा चहा घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे तिचा वापर काढ्यांमध्ये केला जातो. कच्चा हळदीमुळेसुद्धा रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे आजारपणापासून दूर राहण्यासाठी अॅंटि ऑक्सिडंट असलेली कच्ची हळद काढ्यातून घेणे फायदेशीर असते.

४) लवंग – सर्दी खोकला झाल्यास तोंडात लवंग ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण लवंगमुळे खोकल्याची उबळ कमी होते. लवंगमध्ये अँटिमायक्रोबायल आणि अँटिऑक्सिडंट असतात. शिवाय ती अॅंटि व्हायरलही आहे. त्यामुळे व्हायरल तापापासून संरक्षण होते. यातील पोषक घटकांमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि आजारांशी लढणे सोपे होते. यासाठी आयुर्वेदिक काढ्यामध्ये लवंग आवर्जून वापरावी.

५) काळी मिरी – काळी मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनिजं आणि विटामिन्स असतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी ६ चे भरपूर प्रमाण आहे. या विटामिन्सशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हेदेखील असते. या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. या सर्व पोषकतत्वांमुळेच रोगप्रतिकार शक्ती वाढते. म्हणूनच काढ्यामध्ये काळी मिरीचा वापर जरूर करावा.

६) दालचिनी – अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते शरीराला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. सध्या कोरोनापासून लढण्यासाठी दालचिनीचा वापर चहातूनही करावा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इनफेक्शनपासून वाचवणारी दालचिनी आयुर्वेदिक काढ्यात असायलाच हवी.

७) आले अथवा सुंठ – आल्याचा केवळ पदार्थांमध्ये चवीसाठी नव्हे तर प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही चांगला फायदा होतो. कारण आल्यात सर्वाधिक मिनरल्स आणि महत्त्वाची विटामिन्स असतात. तसंच आरोग्य निरोगी राखण्यासाठी यामध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटकांचा जास्त उपयोग होतो. आल्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, पोटॅशियम, मॅंगनीज, डाएटरी फायबर, कॉपर, लोह हे सगळे घटक असतात. जे शरीराला निरोगी ठेवतात. याबरोबरच आल्यामध्ये झिंक, पँटोथेनिक अॅसिडचाही अंश असतो. यामधून अनेक पोषक तत्व मिळतात. एका आल्यामुळे शरीरामध्ये आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात. आलं सुकले की त्यापासून सुंठ केली जाते. त्यामुळे काढ्यासाठी तुम्ही आलं अथवा सुंठ या दोन्हीपैकी काहीही वापरू शकता.

८) काळया मनुका – द्राक्ष सुकवून त्यापासून मनुका केल्या जातात. यातील काळ्या मनुकांना आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान आहे. कारण काळ्या मनुका शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात. काळ्या मनुकांमध्ये प्रोटिन्स, कॉपर, आर्यन, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स असतात. ज्यामुळे शरीर मजबूत आणि सुदृढ होते. काढ्यामध्ये मनुका टाकल्यामुळे काढ्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यातील औषधी घटक काढ्यात येतात. काढयातील इतर सर्व पदार्थ उष्ण असल्याने मनुका काढ्यात टाकल्याने काढा संतुलित राहतो.

९) खडी साखर अथवा पत्री खडी साखर – काढ्यात वापरण्यात येणारे सर्व पदार्थ कडूसर चवीचे आणि उष्ण प्रवृत्तीचे असतात. काढ्याची चव तोंडाला चांगली लागावी आणि त्यातील पोषक तत्त्व कमी होऊ नयेत यासाठी काढ्यात खडी साखर अथवा पत्री खडी साखरेचा वापर केला जातो. पत्री खडी साखर ही एक आयुर्वेदिक खडी साखर आहे. ज्यामुळे जुनाट खोकला बरा होतो.

१०) मध – मधातील अँटिमायक्रोबायल घटकांमुळे किटाणूंना मारण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढण्यासही मदत मिळते. सर्दी – खोकला यासाठी औषध म्हणून मधाचा चहामध्ये अथवा चाटण म्हणून वापर करावा. काढ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काढ्यामध्ये मध टाकून पिण्याने चांगला फायदा होतो.

११) गूळ – गूळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ ऊसापासून तयार केले जातात. मात्र या दोन्ही पदार्थांचे शरीरावर होणारे परिणाम वेगवेगळे असतात. गुळामुळे पदार्थ जितका गोड होतो त्यापेक्षा अधिक आरोग्यदायी होतो. गुळ उष्ण असल्यामुळे त्यातून शरीराला पुरेशी उष्णता मिळते. गुळात व्हिटॅमिन्स, लोह, ग्लुकोज, चुना, फॉफ्सरस, पोटॅशियम पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे गुळ शरीरासाठी पौष्टिक पदार्थ समजला जातो. गुणाने घशामधील इनफेक्शन कमी होण्यास मदत होते. यासाठीच काढ्यामध्ये गुळाचा वापर तुम्ही करायला हवा.