| | |

जेवणातच नव्हे तर त्वचेसाठीही होतो कांद्याचा वापर; कसा? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मिळणारा हमखास पदार्थ म्हणजे कांदा. कांदा न खाणारे काही अपवाद आहेत मात्र कांद्याशिवाय जेवण ते काय? असे म्हणणारे अनेक आहेत. इतकेच नव्हे तर कांद्याचा वापर केसांच्या सौंदर्यासाठीही केला जातो, हे आपण जाणत असाल. यामुळे अलिकडे केस मजबूत करण्यासाठी त्याचा अत्याधिक वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? चेहऱ्याची त्वचा चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठीदेखील कांद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. होय. त्वचेसाठी कांदा लाभदायक ठरू शकतो कारण, कांद्यामध्ये एक विशेष एंजाइम असते. जे त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते. चला तर मग जाणून घेऊयात त्वचेसाठी कांदा वापरल्यास काय फायदे होतात ते खालीलप्रमाणे:-

१) चमकदार त्वचा – त्वचा निस्तेज दिसू लागली असेल तर यातही कांद्याचा फेसमास्क अतिशय लाभदायक ठरतो. यासाठी सर्वप्रथम कांदा बारीक करून त्याची पेस्ट बनवा. यानंतर आता कांद्याच्या पेस्टमध्ये ३ चमचे दही घालून चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून लावा. पुढे १५ मिनिटांनंतर ते धुवा. आपण हा प्रयोग आठवड्यातून १ दिवस करा आणि पहा तुमची त्वचा कशी उजळते.

२) मुलायम त्वचा – कोरड्या, रुक्ष त्वचेने त्रस्त असाल तर एकदा तरी कांद्याचा फेस मास्क बनवून वापरून पहाच. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा अतिशय तेजस्वी दिसतो. या फेस पॅकसाठी ३ चमचे दही आणि १ छोटा कांदा एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवून टाका. याचा वापर करून चेहऱ्यावरील डागदेखील काढले जाऊ शकतात.

३) मुरूम – मुरुमांचा त्रास असेल तर कांद्याचा फेसपॅक तयार करून एकदा चेहऱ्याला लावाच. यासाठी १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध आणि १ कांदा आवश्यक आहे. कांद्याची पेस्ट बनवा आणि लिंबाचा रस, मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या असलेल्या भागावरच लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

४) काळे ओठ – यासाठी कांद्याच्या रसात व्हिटॅमिन ई तेल मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी हे ओठांवर लावा. असे रोज केल्यास एका महिन्यानंतर काळे झालेले ओठ गुलाबी परिवर्तित होत असल्याचे दिसून येईल.