right side of chest pain
|

भाग 1 : अचानक छातीची उजवी बाजू दुखते?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। छातीत वेदना होणे हि बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे. त्यामुळे छातीच्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. यात प्रामुख्याने छातीच्या डाव्या बाजूला वेदना वा कळ जाणवल्यास हे लक्षण हृदय विकाराच्या झटक्याशी संबंधित आहे हे समजावे. मात्र अनेकांना अनेकदा विविध कारणांमुळे छातीच्या फक्त उजव्या बाजूत वेदना वा कळ जाणवते. या स्थितीची अनेक कारणे असू शकतात. पण छातीत उजव्या बाजूला दुखणे हे हृदयाशी संबंधित विकार वा हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असेलच असे नाही. म्हणूनच आज आपण अचानक उजव्या बाजूला छातीत दुखण्याची नेमकीकारणे काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

अचानक छातीची उजवी बाजू दुखण्याची कारणे आपण भाग १ मध्ये जाणून घेणार आहोत. तर यानंतर भाग २ मध्ये आपण या स्थितीवर काय उपचार करू शकतो हे जाणून घेऊ.

० छातीची उजवी बाजू दुखण्याची कारणे

1. छातीत दुखापत होणे – जर आपल्या छातीवर बाह्य वा अंतर्गत दुखापत झाली असेल तर छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवण्याची शक्यता आहे. याशिवाय पेक्टोरॅलिस स्नायूंच्या परिधानामुळे छातीत उजव्या बाजूला दुखते. यात संबंधित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. दरम्यान, जर छातीच्या उजव्या बाजूला सूज दिसत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा. हे दुखापतीचे प्रमुख चिन्ह आहे.

2. अपचन – अपचनाच्या समस्येमुळे छातीच्या उजव्या बाजूला वेदना होऊ शकतात. शिवाय घशात वा छातीत अन्न अडकल्यासारखे वाटते. तसेच घशाच्या मागील बाजूस आंबट चव येऊ शकते. दरम्यान छातीत जळजळ निर्माण होऊन वरच्या भागात वेदना होऊ शकते. तसेच अस्वस्थता जाणवू शकते.

3. पित्ताचा त्रास – अरबट चरबट खाल्ल्यामुळे पोटात आम्ल साचते आणि पित्ताचा त्रास होतो. यात ॲसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या उजव्या बाजूला वेदना होतात. दरम्यान पोटात तयार होणारे आम्ल अर्थात ऍसिड जेव्हा अन्ननलिकेकडे सरकते तेव्हा ऍसिड रिफ्लक्स होते. याची लक्षणे म्हणजे पोटदुखी, तोंडाला आंबट चव, छातीत जळजळ इ.

4. स्नायूंवर ताण येणे – स्नायूंमध्ये ताण वाढल्यास छातीच्या उजव्या बाजूला वेदना होतात. अनेकदा हे काही आघातामुळे होऊ शकते. अशी समस्या सामान्यपणे खेळाडूंमध्ये खेळताना दिसून येते. याशिवाय जे लोक जास्त व्यायाम करतात, त्यांनाही हा त्रास होतो. यात स्नायूंवर दाब पडल्याने छातीच्या उजव्या बाजूला वेदना होतात. असे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांकडून औषध घ्या आणि जड कामे टाळा.

5. ताणतणाव आणि नैराश्य – एखाद्या गोष्टीचा अतिविचार केल्याने वा अति काळजी व्यक्त केल्यामुळे मेंदूवर ताण येतो. यामुळे नैराश्याची समस्या उदभवते. परिणामी छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवू शकतात. दरम्यान चक्कर येणे, घाम येणे, मूर्च्छा येणे, श्वास लागणे इ. प्रमुख लक्षणे दिसून येतात.

6. इतर – छातीच्या उजव्या बाजूला दुखण्याची इतरही कारणे असू शकतात. ती टाळण्यासाठी व्यायाम आणि आहाराचे योग्य संतुलन ठेवा.

० कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित सावध व्हालं..?

अचानक घाम येणे, 
अशक्तपणा जाणवणे, 
चक्कर येणे, 
उलट्या होणे, 
श्वास घेण्यात अडचण येणे, 
छातीवर ताण येणे, 
असह्य वेदना, 
मान- पोट- पाठ इत्यादींमध्ये तीव्र कळ जाणे अश्या कोणत्याही तीव्र लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 
त्वरित सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या.

छातीच्या उजव्या बाजूला दुखणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असेलच असे नाही. मात्र दुखापत झाल्यामुळे किंवा पोटाशी संबंधित समस्यांमुळे देखील अशा वेदना होतात. यांकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक त्या चाचण्या करा.