Eating Disorder
| | |

भाग 1: ‘इटिंग डिसऑर्डर’ म्हणजे काय?; जाणून घ्या प्रकार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो एखाद्या गोष्टीचा, प्रसंगाचा सतत विचार करण्यामुळे चिंता, टेन्शन, नैराश्य अशा प्रकारचा विकार होऊ शकतो. हा विकार साधारणपणे अगदी सामान्य वाटतो. मात्र हा आजार अतिशय गंभीर आहे. कारण या एकमेव आजारामुळे अन्य गंभीर आजार होण्याची शक्यता नव्हे तर खात्री आहे. यामुळे विविध मानसिक आजार होतात. ज्यामध्ये खाण्याचा विकारदेखील होऊ शकतो. या विकाराला ‘इटिंग डिसऑर्डर’ असे म्हणतात.

खाण्याचा विकार झालेल्या रुग्णाला त्याच्या खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी वा त्याचे वजन, आकार याबद्दल गरजेपेक्षा जास्त काळजी असण्यावरून ओळखले जाते. आज आपण भाग १ मध्ये हा आजार नेमका काय आहे आणि त्याचे प्रकार काय आहेत हे जाणून घेणार आहोत.

० ‘इटिंग डिसऑर्डर’ म्हणजे काय?

‘इटिंग डिसऑर्डर’ हा एक गंभीर प्रकारचा मानसिक आजार आहे. इटिंग डिसऑर्डरचा रुग्ण हा त्याच्या खाण्याबाबतच्या वागणुकीवरून समजतो. एकतर हा रुग्ण गरजेपेक्षा जास्त अन्न खातो वा इतके कमी खातो की त्याचा जीव धोक्यात येतो. हा खानपानाशी संबंधित डिसऑर्डर कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो.

अनेकदा हा आजार पौगंडावस्थेत वा तरुण वयात होतो. या खाण्याच्या विकाराचे अनेक प्रकार आहेत. सर्व प्रकारचे खाण्याचे विकार योग्य उपचाराने पूर्ण बरे होऊ शकतात. पण हे योग्य वेळी ओळखले नाही तर जीवघेणेही ठरू शकते.

० ‘इटिंग डिसऑर्डर’चे प्रकार

१. एनोरेक्सिया नर्वोसा

हा इटिंग डिसऑर्डरचा असा प्रकार आहे ज्यात त्रस्त रुग्ण खाण्यापासून दूर पळतो. त्याला वजन कमी करण्याचे वेड लागते. साधारण १ ग्रॅम वजन वाढलं तरीही तो अस्वस्थ होतो आणि विचित्र वागू लागतो. अन्नाकडे तर पूर्ण पाठ फिरवतो. यामुळे अनेकदा रुग्णाचा जीव धोक्यात येतो.

२. बुलिमिया नर्वोसा

इटिंग डिसऑर्डरच्या या प्रकारात रुग्ण अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करतो. ते हि लपून आणि जबरदस्तीने खातो. पुढे खाल्लेले अन्न पचवण्यासाठी, गरजेपेक्षा जास्त व्यायाम करणे, खाल्ल्यानंतर उलट्या होणे वा काटेकोर आहाराचे पालन करून ते संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही खाणे सोडत नाही. जास्त खाणाऱ्या रुग्णांना त्यांच्या शरीरयष्टीबद्दल किंवा वजनाबद्दल अनेकदा लाज वाटते. पण अन्न समोर येताच त्यांचा ताबा सुटतो.

३. बिंज ​इटिंग डिसऑर्डर

इटिंग डिसऑर्डरच्या या प्रकाराने ग्रासलेला रुग्ण थोड्या थोड्या वेळात भरपूर खातो. म्हणजे असे कि, त्याला अनेकदा भूक नसतानाही तो रुग्ण इतका आहार घेतो की त्याला शारीरिक त्रास होऊ लागतो. या रूग्णांमध्ये अनेकदा अपराधीपणा, असंतोष, आत्म- द्वेष आणि नैराश्याची समस्या बळावल्याने दिसून येते.

४. इमोशनल ओव्हर इटिंग डिसऑर्डर

इटिंग डिसऑर्डरच्या या प्रकारात नैराश्य आणि अति विचाराने त्रस्त व्यक्ती अधिकच अन्न खातो. जीवनातील प्रत्येक अडचणीचे समाधान तो फक्त अन्नात शोधतो. काही वेळा वेळीच उपचार न मिळाल्यास हे रुग्ण आत्महत्येसारखे पाऊस उचलू शकतात.

आपण भाग २ मध्ये इटिंग डिसॉर्डरची लक्षणे आणि कारणे जाणून घेणार आहोत तर भाग ३ मध्ये प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊ.