Stomach Worm
|

भाग 1: पोटात जंत होणे म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अगदी लहानपणापासूच तुम्ही जंताबद्दल ऐकले असाल. इतकेच काय तर अनेक जण जंताच्या त्रासातुनदेखील गेले असतील. हा आजार शक्यतो लहानपणीच होतो. कारण लहानपणी काय खायचे आणि काय नाही याबाबत फारशी समज नसते. असे काहीही खाण्याच्या सवयीमुळे लहान मुलांना हा आजार अगदी सहज होतो. पण मोठ्यांनाही जतांचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे या त्रासाविषयी पूर्ण कल्पना असणे अत्यंत गरजेचे आहे. तर त्यावर उपचार करणे सोपे जाईल. म्हणूनच आज आपण भाग १ मध्ये पोटात जंत होणे म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती ते जाणून घेणार आहोत. तर भाग २ मध्ये आपण जंतावरील घरगुती उपाय जाणून घेऊ.

० पोटात जंत होणे म्हणजे काय?

जंत म्हणजे कृमी. साधारण भाषेत याला कीड म्हणता येईल. वैद्यकीय भाषेत जंताचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्फीत कृमी, हुक कृमी, गोल कृमी असे प्रकार आहेत. जंताच्या स्थानावरुन त्याचा प्रकार निश्चित होतो. जंताचा त्रास हा वाळवीसारखा पसरत जातो. यात सतत पोटदुखी, पोटफुगी, अशक्तपणा असे त्रास जाणवतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
पण अनेकदा लक्षणे माहित नसल्यामुळे हा त्रास वाढतो आणि मुलांच्या आरोग्याचे नुकसान होते.
अनेकदा हा आजार काही औषधोपचारांनी बरा झाल्याचे निदर्शनास येते. मात्र हा आजार सहज पाठ सोडत नाही. त्यामुळे औषधे घेऊन आराम पडल्यानंतर लगेच औषधे बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांत बदल करून घ्या.

० पोटात जंत झाल्याची लक्षणे:-

१) पोटदुखी होणे –
जंताच्या त्रासात पोटदुखी होऊ लागते. हे सर्वसामान्य लक्षण असले तरीही प्राथमिक आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय पोटदुखी होत असेल तर त्वरित तपासणी करुन घ्या. पोटदुखी होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण जंत झाल्यानंर पोटदुखी वारंवार होते.

२) शारीरिक थकवा –
आपल्या आहारातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मात्र जंत झाल्यानंतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे थकवा येतो. शिवाय जंत आपण खाल्लेल्या आहारातील पोषण शोषून घेतात. परिणामी शारीरिक थकवा कायम राहतो.

३) आतड्याला सूज –
पोटात जंत झाल्यामुळे आतड्याला सूज येते. पोटात झालेल्या कृमीचा आकार वाढला की त्याचा त्रास आतड्याला होतो. यामुळे आतड्यांना सूज येते आणि पोटदुखी बळावते.

४) शरीरात रक्ताची कमतरता –
जंताचा त्रास झाल्यानंतर शरीरात रक्ताची कमतरता जाणवते. यामुळे शारिरीक क्रिया मंदावतात. तसेच रक्ताची कमतरता झाल्यामुळे ॲनिमियाचा त्रास होतो. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

५) मळमळणे –
पोटातील जंत जेव्हढे वाढतात तेव्हढा त्रास वाढतो. दरम्यान काहीही खाण्याची इच्छा मरते आणि पोटात अन्न नसल्यामुळे मळमळण्याचा त्रास होतो. यामुळे कारण नसताना मळमळ जाणवलयास जंताचा त्रास असण्याची शक्यता असते.

६) भूक मंदावते –
आतड्यांना सूज आल्यास पोटदुखी निर्माण होते. परिणामी शारीरिक थकवा वाढतो आणि काहीही खाण्या वा पिण्याची इच्छा होत नाही. शिवाय भूक मंदावते आणि भूक जाणवतदेखील नाही. त्यामुळे तुमचा आहार अचानक खूप कमी झाला तर जंताचा त्रास असण्याची शक्यता आहे.

७) शौचातून रक्त पडणे –
शौचातून रक्त पडत असेल तर हे लक्षण अतिशय घातक आहे. पोट साफ होत नाही म्हणून खूप ताण लावल्यामुळे शौचातून रक्त पडते. पण अगदी सहज शौचातून रक्त पडत असेल तर हे लक्षण पोटात जंतांची संख्या आणि वाढ अधिक असण्याचे गंभीर लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.

८) अचानक खूप वजन कमी होणे –
जंतांच्या त्रासामुळे भूक मंदावते आणि परिणामी पोटात भर पडत नाही. यामुळे अचानक वजन कमी होऊ लागते. शिवाय शरीर थकल्यासारखे वाटते. त्यामुळे जर तुमचे वजन अचानक कमी होत असेल तर तुम्हाला जंत झालेले असण्याची शक्यता आहे.