Weight Gain During Menstruation
| |

भाग 1: मासिक पाळीच्या काळात वजन का वाढतं..?; जाणून घ्या कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मासिक पाळी हि अशी स्थिती आहे जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण मासिक पाळी हा श्राप नव्हे तर एक वरदान आहे. मासिक पाळीत स्त्रियांना अनेक विविध प्रकारचे त्रास होतात. अधिक रक्तस्राव, पोटफुगी, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, थकवा, मरगळ आणि अजून अनेक समस्यांमधून स्त्री जात असते. पण एकही हुंकार न काढता ती हे सहन करते कारण या मासिक धर्मामुळे तिच्या शरीरात होणारे बदल तिला आईपणाकडे एक पाऊल घेऊन जात असतात.

दरम्यान मासिक पाळीत स्त्रियांचे वजन वाढते. हि अतिशय सामान्य बाब आहे. पण यामुळे कपडे घट्ट होणे, शरीर जड झाल्यासारखे वाटणे, तोल जाणे अशा समस्यांना स्त्रीला तोंड द्यावे लागते. मासिक पाळीत प्रत्येक स्त्रीचे वजन वाढते. याचे कारण म्हणजे मासिक पाळीत स्त्रीच्या शरीरातील संप्रेरकांमध्ये बदल होत असतो. दरम्यान त्यांच्यात असंतुलन निर्माण होते. यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्त्रियांचे वजन साधारण १ ते २ किलो प्रमाणे वाढल्याचे दिसते. शिवाय हार्मोन्समधील या बदलांमुळे मासिक पाळीत व्यायाम केल्यास पाळीचा त्रास होतो हा एक गैरसमज आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये हलका फुलका व्यायाम जरूर करा.

० मासिक पाळीच्या दिवसात वजन वाढण्याची कारणे

१. मासिक पाळीदरम्यान संप्रेरकांमध्ये बदल होऊन त्यात असंतुलन निर्माण होते. यामुळे पोटावर सूज येते. पाय आणि कंबर दुखू लागतात. तसेच पाळीत ॲस्ट्रोजन हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे शरीरात द्रवपदार्थ साचतात. परिणामी शरीरातील पाण्याच्या वाढलेल्या पातळीमूळे वजनात वाढ होते.

२. मासिक पाळीदरम्यान हार्मोन्स पटपट बदलतात. यात खूप वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा पध्दतीने खाल्ल्याने शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात. पण यामुळे खूप कॅलरीज आणि कोलेस्ट्राॅल हाय होते. परिणामी वजन वाढतं. 

३. मासिक पाळीदरम्यान हार्मोन्समधील बदलांमुळे अस्वस्थता वाढते. ताण येतो. थकवा येतो. दरम्यान उत्साही राहण्यासाठी अधिक प्रमाणात काॅफी/ चहा/ ग्रीन टी प्यायल्याने शरीरात कॅफिनची मात्रा वाढते. यामुळे शरीरात पाणी जास्त साठतं आणि पोट फुगल्यासारखं वाटतं. 

४. पाळीच्या दिवसात व्यायाम करणे बंद केल्यास शारीरिक कष्ट कमी होतात. पाळीत व्यायाम केल्याने त्रास होतो या समजामुळे असे वागले जाते. तसेच पाळीच्या दिवसात अनेकजणी नुसतं बसून वा झोपून राहतात. यामुळे शरीर सुस्त होते. शारीरिक हालचाली कमी होतात. जागच्या जागी खाणपिण वाढतं. परिणामी वजन वाढतं.

५. मासिक पाळीच्या काही दिवसआधी आणि मासिक पाळीच्या दिवसात शरीरातील प्रोजेस्ट्राॅन हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे काहीही खाल्लं तरी पोट फुगतं आणि ॲसिडिटी होते. बध्दकोष्ठता होते. याचाच परिणाम वजनावर होतो.

आज आपण भाग १ मध्ये मासिक पाळीच्या काळात वजन का वाढते याची कारणे जाणून घेतली. यानंतर आपण भाग २ मध्ये मासिक पाळीदरम्यान किती वजन वाढू शकते आणि ते वजन वाढू नये म्हणून काय करावे हे जाणून घेऊ.