| | | |

भाग 2 : आमवातावर कोणते उपाय करावेत..?; जाणून घ्या नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आम व वात या दोषांमुळे होणारी सांधेदुखी म्हणजेच आमवात. यात आपण सेवन केलेल्या आहारावर जठराग्नीची प्रक्रिया झाल्याने प्राकृत आहाररस तयार होतो. दरम्यान काही कारणास्तव अग्निमांद्य निर्माण झाले असता हा तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो. यामुळे शरीरात आमनिर्मिती होते. याचे रूपांतर ऊर्जेतही होत नाही आणि मलमार्गातून उत्सर्जित देखील होत नाही. परिणामी याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

भाग १ मध्ये आपण आमवात म्हणजे काय आणि आमवात होण्याची कारणे व लक्षणे जाणून घेतली. यानंतर आता भाग २ मध्ये आपण आमवातावर कोणते उपाय करावे हे जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊ.

आमवातावर प्रभावी नैसर्गिक उपाय

 1. सकाळी उपाशीपोटी पाणी पिऊ नये. तहान असल्यास कमी प्रमाणात कोमट पाणी प्यावे.
 2. पाण्यात सुंठ उकळून काढा तयार करून तो उपाशी पोटी घ्या. यामुळे सांध्यातील सूज कमी होते.
 3. आमवाताच्या रूग्णांनी भूक लागल्यावरच जेवावे. सकाळी नाश्त्यामध्ये सूप, लाह्यांचा चिवडा, राजगिरा लाडू वा फळांचा समावेश करावा.
 4. रात्री हलका आहारा घ्या. एरंड तेल घातलेली ज्वारी वा नाचणीची भाकरी सोबत वेलींच्या भाज्या खा.
 5. जखडलेल्या सांध्यांना तेलांचा मसाज करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच कोणताही मसाज करा.
 6. दिवसा झोपणे आणि रात्रीच्या वेळी जागरण करणे शक्यतो टाळा.
 7. आमवात हा ऑटोइम्युन आजार असल्याने शरीरात बाधक घटक तयार होऊन सांध्यांचे नुकसान करतात. यासाठी प्राणायाम करा.
 8. आमवातातील रक्तकणांची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज डाळिंब, अंजीर, काळे मनुके, खजूर, यांचा आहारात समावेश असावा.
 9. थंडपेय किंवा अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा.
 10. मानसिक ताणामुळे वात वाढून आमवात बळावतो, अशावेळी ध्यानधारणा करा.

आमवातावर प्रभावी आयुर्वेदिक उपचार

 1. आमवात प्राथमिक अवस्थेत असल्यास आयुर्वेदिक औषधे, योगासने आणि पौष्टिक आहार घ्या.
 2. गुळवेल, सुंठ, हरितकी, एरंड तेल, गोमूत्र अशी बरीच औषधे आमवातावर प्रभावी आहेत. याच्या सहाय्याने पचनशक्ती सुधारून शरीरात आम बनण्याची प्रक्रिया थांबते. शिवाय सांध्याकडे शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. परिणामी सूज, वेदना कमी होतात.
 3. तीळ, डिंक, मेथी, सुंठ, आलं यांचा आहारात वापर केल्यास शरीरातील हाडे मजबूत बनतात आणि पचनशक्ती सुधारते. परिणामी आम्ल तयार होत नाही.
 4. सांध्यातील दुखणं कमी करण्यासाठी नियमित योगा करा. योगामुळे सांध्याच्या ठिकाणी आम टिकत नाही. यामुळे हाडांची झीज होत नाही. प्राणायाम, कपालभाती यांच्यासारख्या व्यायामामुळे शरीरातील अँटीबॉडीजदेखील नियंत्रित होण्यास मदत होते.
 5. आमवातावर पंचकर्म हा उत्तम उपाय आहे. शरीरातील आम बाहेर काढल्यामुळे सांध्यांची सूज, हाडांची झीज आणि वेदना कमी होतात. या प्रक्रियेत सांध्याच्या ठिकाणी रक्तमोक्षण क्रियेद्वारे रक्त काढून (जळू) शुद्ध रक्ताचा पुरवठा वाढविला जातो.